फिरंगीहि येतच आहेत. फिरंगी न आले तरी चिंता नाही. आह्मी भोसल्याचे पारपत्य उत्तम प्रकारें करतों. उभयता निंबाळकराचा मजकूर. त्यासी अबदालीची१४८ खबर दाट होती. यास्तव रा॥ जानोजी निंबाळकरास रुखसत करतेवेळेस व रा॥ हणमंतरायाची भेटी जाली तेव्हां सांगितलेच आहे जे पुढें तुह्मांस मातबर फौजेनशी यावें लागेल. त्यांनीही कबूल केलेच आहे. हें वर्तमान पूर्वीहि लिहिलेच आहे. आतांहि उभयतां निंबाळकरांस फौजेविशी पत्रे पाठविलींत. अशास तुह्मी लिहिल्याप्रें॥ फौज त्यांनी आणावी हें तरी कळतच आहे; परंतु त्यास लिहिले आहे. अलबत पहिलेपेक्षां सवाई दिढी फौजा घेऊन येतील यात संशय नाही. पहिलेपासूनहि मातबर फौजेनशीच चाकरी करीत आलेत व पुढेंहि ते चाकरी चांगलीच करून दाखवितील. कळलें पाहिजे. मोठा मनसबा अबदालीचा हाता. तें अरिष्ट सांप्रत जगदीशें वारलेंच आहे. हे विनंति, रवाना छ १३ रमजान.
विनंति नवाब समसामजंगास श्रीमंत आपले परम मित्र जाणतात. सरकारच्या कुल जाबसालाचा जिम्मा त्यांचा आहे. यांत संशय नाही ह्मणोन लिहिलें. अशास, शाहानवाजखानबहादर हेहि आपणांस श्रीमंताचें नायब असें मानतात. व हरघडी हेच ह्मणतात कीं श्रीमंताकडून त्या दौलतीत श्रीमंत भाऊसाहेब व या दवलतींत मी श्रीमंताशी अंतर करणार नाही.
जें काम श्रीमंताचें तें आमचें व आमचें तें श्रीमंताचें. जें काम पुणेंस पडेल तें करावेंच ऐसी निष्ठा यांची श्रीमंताचे पायाशीं आहे. सर्वस्वी श्रीमंताचाच ह्मणवितों. हे विनंति.
शाहनवाजखानांनीं वडिलांचें नाव घेऊन ह्मणों लागले जे तुह्मीं त्यास लिहिणें जे श्रीमंतास आमचे तरफेनें पुसावें जे साहेबास आमचा करार कीं नवाबांनीं कृष्णापार न व्हावे व इकडे गंगापार न व्हावें. श्रीमंतांनींहि चार दिवस इकडे तिकडे कालक्रमणा करून कृष्णा न उतरतां पुण्यास जावें. याचा सबब अबदालीचीच आवई येऊन ठहरली होती ऐसें असतां बावजुद अबदालीची गडबड दिवसेंदिवस अधिक ऐकत असतां मुलूक आपला खालीं टाकून श्रीरंगपट्टणास आपपश्चात् न विचारिता गेलेत. जगदीशकृपेनें अबदालीहि गेला आणि मोहीमहि सर जाली ह्मणोन उत्तम जालें. येखादी नेक बाद होय तरी कैसे? श्रीमंत दादासाहेब व रा॥ मल्हारजी बाबा होळकर यांजपाशीं फौज जमाव होत नाहीं. दहा पंध्रा पावेतों फौज होती; परंतु त्याचीहि फौज मोठी लढाक होती. या फौजेनें अबदालीचे फौजेवर चालून जाणें तरी कळत आहे; परंतु ते दक्षणेस चाललेच येते तरी त्याच्यानें कांहीं न होतें. त्याचे फौजेचे तोंडावर न येवत ऐसें असतां श्रीरंगपट्टणास जावयाचा कस्तम केला. हे सलाह काय१४९ जाणून केली होती हें कळलें पाहिजे. तरी हे श्रीमंतांस विदित करून उत्तर याचें आलें पाहिजे. हे विनंति.