[२४] पै ।। छ २७ र।।खर ।। श्री ।। २० जानेवारी १७५४
श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-
कृतानेक विज्ञापना. मोगलाचा कुच काळेचौतरेयाहून पुण्याचे रुखें इंटखेडेयावर जाला होता. छ ९ र॥खरीं ईटखेडेयावर आले. येथें मनसबा घाटत होता कीं रावप्रधान सालगुदस्ताहि करनाटकांत गेले. सालमारींहि तिकडेच मुतवजे जाले. तेव्हां आह्मी मुलुकगिरी कशाची करावी? याजकरितां पुण्याचे रुखें दबाव टाकीत जावें ह्मणजे सहजेच माघारे फिरोन येतील. पुण्याकडे काय ह्मणोन दबाव टाकिला ह्मणतील तर त्यांस जाब आहे कीं तुह्मी आह्मा शिवाय काय ह्मणोन कर्नाटकांत जाता? सालगुदस्तां तुह्मी गेलेत. सालमा।री आह्मी जाऊ.७८ ऐसे ऐसे मनसबा करीत होते. फार करून न्यामदुल्लाखान तहवरजंगाचा विचार होता. सामर्थ्य तो नाहीं. परंतु उगेच मनसबे करीत होते. सेवक मुसाबुसीजवळहि बोलिलों. ते बोलिले कीं आह्मी सहसा हे गोष्ट होऊ देणार नाहीं. प्रस्तुत धारूरचे घाटें जावयाचा करार केला. ईटखेडेयावर सात मुकाम होते. छ १६ रबिलाखरीं शनवारीं ईटखेडेयाहून कूच केलें. सातारेयाचा डोंगर डावा टाकून पांच कोश जळगांवावर मुकामास आले. कुचाचे समई सैदलष्करखान शहरांतून दोन-तीनशे स्वार व पांचसातशें गाडदी इतके जमावानसी आले. नवाबाजवळोन वराडात जावयास रुखसत जाले. नवाब स्वार होऊन निघालेयावर सैदलष्करखान मुसाबुसीचे डेरेयास आलें. मुसाबुसी येहीं खानास घोडा येक व वस्त्रें दिलीं. तदनंतरें खानांहीं ईटखेडेयाचे मुकामी डेरा उभा केला होता. त्या डेरेयास मुसाबुसी आले. तेथें चार घटिका होते. खानांहीं वस्त्रें दिलीं. मग खान शहरांत गेले. मुसाबुसी मुकामावर आले. आज रविवार छ१७ रोज लष्करचा मुकाम जाला. अद्याप शहरांतून बहुत लोक येणें आहेत. करनाटकांत जावयाचे दिवस राहिले नाहीं. हैदराबादेस छावणीस जातील असे दिसतें. अद्याप नवाबाची फौज जमा जाली नाहीं. फौजेचा दंगा चुकला नाहीं. ख्वाजे न्यामदुलाखान अद्याप काळेचौतरेयावरच आहेत. त्यांचा कुच जाला नाहीं. मुसाबुसी यांहीं खानास घोडा व एक शिरपेच दिधला. तसाच खानांहीं मुसाबुसीस घोडा एक व शिरपेंच दिधला म्हणोन अबदुलरहिमानखान बोलत होते. मसलहतीचा विचार अबदुलरहमानखान यांस पुशिला कीं कर्नाटकांत जावयाचे दिवस राहिले नाहीं; काय विचार केला? बोलिले कीं तूर्त कृष्णातीर पावेतों जातों, पुढें विचार करणें तो केला जाईल. सेवेसी श्रुत जालें पाहिजे हे विज्ञापना.