[२०]      पै ।। छ १० र।।वल                                     ।। श्री ।।                                                               ५ जानेवारी १७५४

 

पु ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना. माधवसिंग जयनगरास आले. सरकारची७५ फौज जयनगरासमीप आठदहा कोशांचे अंतरायानें आहे. जाबसालास माधवसिंगाकडून वकील आले आहेत ह्मणोन सराफेयांत लिहिलीं आलीं. आढळलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. मुसाबुसी यांचे अंतर्याम तो सरकारतर्फेसी नि:कपट आहे. परंतु प्रस्तुत नौनिगादास्त करीत आहेत. सुरतेकडून बंदुका वगैरे सामान येत आहे. मुसा मरलोहि फुलचरीस गेला. पुढें काय मनसबा करणार आहेत कळत नाहीं. राजश्री नागोराव राहुजी प्रस्तुत येथें मुसाबुसी व शहानवाजखान वगैरे यांजवळ जाबसालांत आहेत. म॥रनिलेचा सेवकाचा परिचय नव्हता. राजश्री शामजीपंत टकले यांहीं सेवकांस सांगितलें कीं नागोरावजी सरकारतर्फेचे आहेत. सालगुदस्ता यांहीं सरकारकामांत कोसीस बहुत केली. हुजूरहि रुजू आहेत. तुह्मास हरयेक गोष्ट पुसणें तर यांस पुसावी. सांगतील ह्मणोन बोलिले. व नागोरावजी प्रस्तुत येथें बहुत पेश आहेत. स्वामीचे प्रतापाचा स्तव बहुत करीत असतात. म॥रनिले येहीं सेवेसी विनंतिपत्र लेहून दिल्हें तें सेवेसी पाठविलें आहे. त्याजवरून विदित होईल. नागोराव याचे पत्राचें उत्तर पाठवावयाची आज्ञा करावयास स्वामीधणी समर्थ आहेत. मार्गशीर्षमासांत ये जागा तीन वेळां पर्जन्यवृष्टी जाली. पौषमासींहि सप्तमी इंदुवारीं७६ पर्जन्यवृष्टी जाली. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. राजश्री परशरामपंत वर्तमान लिहीत असतील. त्या गोष्टी प्रमाणांत आहेत. सेवकास आढळले मजकूर विनंति लिहिली आहे. राजश्री शामजी गोविंद येथून छ२ र॥वलीं स्वार होऊन हुजूर आले आहेत. येथील सविस्तर वर्तमान विदित करितील. सेवेसी श्रृत होय हे विज्ञापना.