[१८]      पै ।। छ २६ मोहरम                                           ।। श्री ।।                                                               १६ नोव्हेंबर १७५३

 

श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना मुसाबुसी सेवकाजवळ बोलिले कीं नवाब सलाबतजंग यांहीं रुकुनुदौला यांचे मसलहतीनें आमचा गिल्ला७४ गोरंदोर यास बहुत लिहिला कीं मुसाबुसी यांहीं आमचा मनसबा खराब केला; मुलुक गनीमास दिधला; गनीमाचा घावडाव यांस कळत नाहीं; गनीमास दबाऊन हालखुद राखावें तेव्हां गनीम रास येतील; राव प्रधान यांस येक सुबा दरोबस्तव आणिखी मुलुक दिधला. याजकरितां मुसाबुसी यांस खुबवजा ताकीद करून रवाना करावें ह्मणोन कैवजां लिहिलें. आह्मांवर येतराजी व्हावी आह्मी फिरोन न यावें, ऐसाच सलाबतजंग व रुकुनदौला यांचा मनसबा होता. आतां आमचे गोरंदोर थोर. त्यांस सारा मजकूर उमजला होता. सबब त्यांहीं जबाब लेहून पाठविला कीं मुसाबुसी आहेत ते आमचे बेटे आहेत. त्यांहीं राव प्रधान यांसीं सुलुख केला तो तुमचे रजामंदीनें जाणोनच केला. त्यांहीं जें केलें तें फिरत नाहीं. तुह्मी त्यांचे कराराप्रमाणें रावप्रधान यांसीं सुलुख राखाल तर बेहतर बात आहे. कांहीं नौदीगर करून बिघाड करूं म्हणाल तर आह्मी तुमचे रफीक नाहीं, रावप्रधान यांचे रफीक आहों, ह्मणोन लिहिलें व आह्मांसहि लिहिलें त्याजवरून सलाबतजंग व रुकुनदौला बहुत पस्तावलें कीं आह्मांस सर्व प्रकारें भरंवसा तुमचा असतां तुह्मी ऐशा गोष्टी करिता. अज्याईब आहे! हालीं सलाबतजंग यांहीं रुकुनदौला यांचे मसलहतीनें आम्हांस कितेक समाधानाच्या गोष्टी लिहिल्या कीं तुमचा गिल्ला लिहिला नाहीं. गनीमाचा घावडाव तुम्हास कळत नाहीं. तुम्ही येतच आहां. तुमची आमची मुलाजमत लौकरच होईल. जें करणें तें तुमचे मसलहतीनें करूं म्हणोन कैवजा लिहिलें. ऐसें बोलोन तें पत्र सेवकास वाचूनहि दाखविलें. त्यानंतर बोलिले कीं आह्मी लोक कोणे करीनेयाचे व मोगललोक व मोगलाईचे मराठे सरदार कोणे करीनेयाचे हे रावसाहेब बेहतर जाणत असतील व रावसाहेब आह्मास कलमीं करीत असतात कीं मोगल लोक मनांत खोटे, बाहेर नीट, याजवरून रावसाहेब खुब जाणतात. आह्मी लोक एकवचनी, जो करार केला तो केलाच, त्यांत तफावत होऊं देणार नाहीं. आपले सुखुनाबद्दल दौलतेनसी व ज्यानानसीं कोसीस करूं. मोगल लोक काबुची आहेत. रावसाहेबांचे दौलतेची रोजबरोज तरकी होते, हे गोष्ट त्यांस खुष लागत नाहीं. वेळ पाहोन दगा करावयास जपतच आहेत. ईलाज न चाले; तेव्हां खुशामतीसहि हजीर. ऐसे या लोकांचे करीने आहेत. रामदासपंताचे हंगामेयांत काय काय दगाबाजी केली तें अलमावर रोशन आहे. रावसाहेबांचे ताळे बुलंद ह्मणोनच ते बाजी सर केली. सालगुदस्तां महाराव येहीं मल्हारराव होळकर यांस फोडावयाचा मनसबा केला. लेकिन शेवटास न गेला. मग पस्तावोन खुशामतीस लागले. पुढेहि दगाबाजीस चुकणार नाहींत. आह्माजवळहि येखलास करावयास चाहतात. आतं आह्मी कोणास पछाणत नाहीं व आह्मास दगाबाजीचा येखलास करितां येत नाहीं. आह्मी रावप्रधानसाहेबांस मात्र जाणतों. रावसाहेबांचे दौलतेची तरकी पाहोन खुशवख्त होतो व याहून तरकी व्हावी ऐसें चाहतों. याजकरितां रावसाहेबीं या लोकांस नजरेंतच धरावें. रावसाहेबांचा व आमचा येखलास एक विचार असतां दुसरेयाची गुंजाईष आहे ऐसें नाहीं. हे गोष्ट तर काय? कित्येक उमदे उमदे मनसुबे खातीरख्वाह होतील. तूर्त आह्मी शहरास जात आहों. यख्तीयार आमचाच आहे. आह्मी रावसाहेबांजवळ निखालस येखलास राखितों. ह्मणूनच दिलांतील मजकूर खोलून बोलतों. व पेस्तरहि जे काम करणें तें रावसाहेबाचे इतिलासिवाय करणार नाहीं. आह्मी रावसाहेबांजवळ येखलास केला तो थोडके रोज चालावयाचा केला नाहीं. पुस्तदरपुस्त जचालावा ह्मणोन केला. आह्मी गेलों, आमचा भाऊ दुसरा आला, तर हाच करार आहे. इतकें बोलोन सेवकास बोलिलें कीं रावसाहेबांचे तर्फेनें आह्माजवळ वकिली तुमची आहे. तुह्माशिवाय दुसरा वकील आह्मी चाहत नाहीं. परशमरामपंत वकील रावसाहेबांचे नवाब सलाबतजंगाजवळ आहेत त्यांस आह्मी बहुत चाहते होतो. आतां त्याजवळोन तफावत दिसोन आला. याजबद्दल आमचे दिल त्यास चाहत नाहीं. तफावत कोण तो ह्मणाल तर आह्मी हैदराबादेस आलों, तसेच औरंगाबादेस येत होतों. आह्मास लेहून पाठविलें कीं तूर्त न यावें, तेथेंच राहावें. येथें आलियानें रुकुनदौला यास वसवास येईल ह्मणोन कैवजा लिहिलें. आह्मी सचोटीचा माणूस जाणून राहिलों. पेस्तर रुकुनदौला याचे मारिफत सुलह करून मग आह्मास लिहिलें कीं आतां तर काम जालें; तुह्मी आले असतेत तर खूब होतें. याजवरून दगाबाजी कळली व आणीकहि कित्येक गोष्टी आहेत. याजबद्दल त्यास आमचे दिल चाहत नाहीं. याप्रमाणें तुह्मी रावसाहेबांस लेहून पाठविणें ह्मणोन बोलिलें. त्यावरून सेवेसी विनंति लिहिली आहे. सदर्हू विनंतिपत्र अक्षरशा सार्थ७४ मुसाबुसी यांहीं आईकिलें. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. छ १९ रोजीं शहरांतून नथमल दी॥ सैदलस्करखान व गुलाममहमदखान ऐसे उभयता मुसाबुसी याजकडे आले आहेत. गोटाबाहेर राहिले आहेत. अद्याप भेट जाली नाहीं. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.