समागमें रयत आली होती ते याच उभयतांनीं लुटून घेतली. मोठा विश्वासघात केला! पंचवीस लक्षांचें वित्त घेतलें. हल्लीं, झांशी जवळ येऊन पडले आहेत. उभयता मिळोन फौज दहा बारा हजार आहे व पठाणाजवळ फौज पन्नास हजार चांगली आहे. गाजद्दीखान व खानखानांची फौज वेगळी आहे व आराबाहि आहे. खजाना पन्नास लक्ष रुपये समागमें आहेत. पठाणाचा नायब दिल्लींत बसला आहे तो फौज वरचेवर ठेवीत आहे. तेहि फौज याजला सामील होणार ऐसें दिसते. पठाण बंगाल्यास जाणार व #दक्षणेसहि येणार. मूळ झांशीस लवकर येतो ऐशी बोली आहे. जाट आपल्या गढींत बसले आहेत. पंरतु भयभीत बहुत आहेत. श्रीमंत राजश्री दादासाहेब व मल्हारजी होळकर वगैरे सरदार कुल ज्यावहेजवळ होते. त्यास ज्यावहेपासून लाख रुपये खंडणी घेतली. उपरांतिक उदेपुरच्या राजाचा भाऊ होता तो येऊन भेटला. ह्मणूं लागला कीं माझा विभाग राजा देत नाहीं, त्यावरून ज्यावह परगणा व राणीखेडा ऐसे दोन्ही महाल श्रीमंतानीं लुटून पस्त केले. दहा बारांचें वित्त तेथून निघाले, आणि तेथेंच मुक्काम करून राहिले आहेत. समागमें फौज चाळीस हजार आहे. वरचेवर जमा होत आहे. पठाण बहुत भारी आहे. जर पठाण झांशीस आला तर कठीण आहे. पठाणावर प्रस्तुत कोणी जावें असें दिसत नाहीं. राजश्री अंताजी माणकेश्वर यांणीं लढाई चांगली घेतली. परंतु पठाणाची फौज भारी यामुळे उपाय नाहीं. परंतु आपलीशी करून पळून आले. अंताजी माणकेश्वर याचा पुत्र पडला. परंतु पठाणास हात चांगला दाखविला. हल्लीं श्रीमंतांपाशीं आहेत. राजश्री बापूजीपंत वकील दिल्लीहून पळून मथुरेस आले. तेथून निघोन राजश्री नारो शंकर याच्या लष्करांत आले. त्याचे बंधु दामोदर महादेव झाशीस होते. काही भ्रम झाला होता.
त्यांचा काल जाहला. बापूजी महादेव झांशीस आहेत. मनसूरअल्लीरखानाचा लेक गंगापारच आहे. ऐसें वर्तमान सराफियांत आलें. त्याजवरून लिहिलें असे. जर श्रीमंत राजश्री नानासाहेब जातील आणि त्यांचें पारपत्य उत्तम होय तर उत्तमच आहे, नाहीतर पठाण दरमजल माळव्यांत आला तर बहुत खराबी आहे. पुढे जें श्रीस कर्तव्य असेल तें होईल. नवाब सलाबतजंग कलबर्गीयावर आहेत. त्यास शहरीं येणार आहेत. छ २७ तारखेस येथे दाखल होणार आहेत. याप्रमाणें पुण्यास लिहिलें आहे तें वर्तमान सेवेसी लिहिलें आहे. दुसरें पत्र कृष्णाजी भैरव थत्ते यांचे छ १२ रजबीं आलें. त्यांत मजकूर कीं पठाणानें गाजुद्दीखान यास हरोली दिल्ही व पन्नास हजार फौज नवी दिल्लीमध्यें चाकर ठेविली. तोफखाना तमाम सांगातें घेतला. शाहाजादा सांगातें घेतला. मथुरेंत कत्तल केली. अलमशाहाची द्वाही फिरविली. येथून आग्र्यास आला. एक मुक्काम केला. रयत लोक जाऊन भेटले. पांच लक्ष रुपये खंडणी घ्यावीशी केली, कोणास उपद्रव दिल्हा नाहीं. समशेरबहादर आग्र्यास होते तेथून निघाले. श्रीमंत राजश्री दादासाहेब व मल्हारजी होळकर उदेपुराकडे जावहाकडे गेले. लाख रुपये तेथील खंडणी केली. पठाण झांशीस येणार, तेथून पुढें कोठें येईल हें न कळे. याप्रमाणे वर्तमान१३७ लिहिलें. आलें तें सेवेसी लिहिलें आहे. विदित जालें पाहिजे. सेवेसी श्रुत होय, हे विज्ञापना.