[३०१] ।। श्री ।। नोव्हेंबर १७६३.
पुरवणी सेवेसि शिरसाष्टांग नमस्कार. विनंति विज्ञापना. काशीहून उत्तर आले नाहीं. आलें ह्मणजे पाठवीन. वरकड वर्तमान तपशिलवार पेशजी लिहिलें आहे. त्यावरून सेवेसि श्रुत जालें असेल. हल्लीं तपशिलवार लिहावें तरी स्वामीस पत्र पावेल न पावेल. यास्तव न लिहिलें, या उभयतांमध्ये हर्षामर्षच चालिला आहे. वरकड गोष्टींविशीं तरी स्वामीची आज्ञा येईल त्याप्रमाणें करीन. दिवसेंदिवस माणस नजरेंत नाहीसें दिसतें. राजश्री खंडो शामराज येथें आले. त्यांस एकांती आह्मीं बहुत प्रकार पुशिले. हातचे अक्षर मात्र लिहीत नाहीं. तें अभिमानास्तव मात्र कीं कोणास कशास पत्र लिहावें, ऐसें भाषण करितात; दुसरा अर्थ किमपि नाहीं. देशींहि पत्रें श्रीमंत सौभाग्यवतीबाईस गेलीं आहेत. व येथें श्रीमंत करारेयांत ज्यांचे स्थलीं आहेत, त्याणी विनंति करून चुलतेयास आपलें पत्र पाठविले आहे. येकांतीं करून कोणास प्रगट नाही. गृप्तरूपेंकरून पाठविलें आहे. तेथें विदित जालें असेल. व एक पत्र श्रीमंत मोरो बल्लाळ जोशी आहेत त्यांस गेलें आहे. गुप्तरूपें तेहि येणार, ऐसी बातमी आहे. पहावें. स्वामीस विदित असेल. राजश्री जनकोजी शिंदे देशीं गेले. भेटी श्रीमंताची जाली. उपरांत मनमानें ऐसें वर्तमान लोकांनी येथें उठविलें आहे. लिहिलें कोणाचें आलें नाहीं. त्यास सविस्तर सर्व लिहावयासी आज्ञा केली पाहिजे. आपले वर्तमान पेशजी लिहिलें आहे. त्याप्रमाणे आज्ञापत्र पाठवावें. त्याप्रमाणें मी करीन. विस्तारें काय लिहूं ? करारेयाचे मजकुरांत गुंता किमपि नाहीं. सेवसि विदित होय. एकोणिसाचे सालचे हिशेब अद्याप कोणाचे घेतले नाहींत. आणविले आहेत. पहावें. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.