[१७] पै ।। छ २६ मोहरम ।। श्री ।। १६ नोव्हेंबर १७५३
श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-
विनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेऊन स॥नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीनें सेवकाचें वर्तमान त॥छ २० माहे मोहरम पावेतों यथास्थित असे. येथील वर्तमान त॥ छ १३ मोहरम सविस्तर विनंतिपत्रीं लिहून जासूदजोडी सेवेसी पाठविली. त्या विनंतिपत्रावरून सविस्तर वृत्त सेवेसी विदित होईल. मुसाबुसी मजलदरमजल छ १९ मोहरमीं राक्षसभुवनास गौतमीचे उत्तरतीरीं मुकामास आले. छ१८ रोजीं गेवराईचे मुकामीं नवाब सलाबतजंगांहीं सीतुरस्वार पाठविला; मुसाबुसी यांस लिहिलें कीं जलद येऊन पोंहचणें. मुसा भरलो फरासीस दहा स्वारांनसी हैदराबादेहून दोन मजला करून भालकीवर मुसाबुसी याजवळ आला. तें वर्तमान पूर्वीं सेवेसी विनंतिपत्रीं लिहिलें आहे. त्याजबराबरील फरंगी मागाहून येत होते. ते फरंगी शंभर, त्याजमध्यें चार सरदार, ऐसे छ १७ रोजी आले. मुसाबुसी मागें येतां मौजे पिंपळनेर बीबीचें येथील गांवकरी यांनीं मुसाबुसी यांचा बैल संदुकांचा नेला. मागाहून गारदी येत होते त्यांस कळतांच गांवचे पाटलास सदर्हू बैल सुध्दां घेऊन आले. पाटलाजवळोन दीडशें रुपये गुन्हेगारी घेऊन सोडिला. सेवेसी श्रुत होय. ख्वाजे न्यामदुलाखान यांजकडे हस्तनापुरचें वर्तमान लिहिलें आलें. बोलत होते कीं जयसिंग याचा लेक§ पातशाहास भेटला त्याचे मारीफतीनें जाटहि७३ पातशहास मिळाले. फेरोजजंग याचा लेक वजिराजवळ युध्दप्रसंग करीत आहे. अद्याप लढाई काईम आहे. कितेक हत्ती व उंट वजिराचे फेरोजजंगाचे लेकानें आणिले. वजीर सफैजंग लढाई लढत नाहीं. याजकरितां फैसला होत नाहीं. प्रस्तुत पातशहाचा जोरा आहे ह्मणोन बोलत होते. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. मुसाबुसी कितेक गोष्टी बोलिले ते मजकूर अलाहिदा विनंतिपत्राचे पुरवणींत लिहिलें आहेत. त्याजवरून त्यांहीं सेवेसी पत्र दिल्हें. ते थैली सेवेसी पाठविली आहे त्याजवरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.