[३००]                           ।। श्री ।।                          नोव्हेंबर १७६३.

सेवसि शिरसाष्टांग नमस्कार विनंति. येथील क्षेम असो. विशेष. श्रीमंत राजश्री भाऊसाहेब करारेयास आश्विन व॥१३ स प्रगट नरवरीं होऊन राजश्री विश्वासराव लक्षुमण याणीं घेऊन आले. तेथून पत्रें सर्व गृहस्तास आलीं. राजश्री कासी नरसी यांस आलीं. व विसाजी गोविंद यांस व बापूजी नारायण नरसीगडवाले यांस आलीं. खासे यांचींच पत्रें नांवचीं आलीं. खासे अक्षर लिहित नाहींत, ह्मणून राजश्री काशी नरसी मात्र न मानीत. वरकड चोहोंकडे बंदोबस्त होत चालला. सर्वांस घरोघरीं परस्परें तेथून पत्रें आपलीं आपलीं येतात, कीं श्रीमत करार; गुंता किमपि नाहीं. सर्व जनांमध्यें दुसरा अर्थ दिसोन येत नाहीं. तेथून कासीद जोडी दोन आल्या, ते कागद वाचून कासीदास मुखमार्जन शिवीगाळी होतात. कचेरींत थट्टा कीं स्वर्गद्वार मोकळें झालें. ज्या बायकांचे पुरुष वारले असतील, त्याणीं डोई वाढवावी ! नानाप्रकारें वल्गना होतात. श्रीमंत स्वामीची आज्ञा आली कीं चार लक्ष रुपये व हत्ती घोडे वगैरे सरंजाम दो लक्षाचा घेऊन हुजूर सत्वर येणें. त्यांचें उत्तरहि पाठवीत नाहींत. सर्व लटकें ह्मणतात. बापूजी नारायण विसाजीपंत यांसहि पत्रें आलीं कीं हुजूर येणें. राजश्री बापूजी नारायण कार्तिक शु॥ १३स निघोन करारेयास जाणार. राजश्री गणेशे संभाजी सिरोंजेस होते ते करारेयास गेले. पावतील. दतियावाले व वोडशावाले यांचे पांच येऊन पोंचले. कांही खजिनाहि आला. करा-याचे झासीचे मध्यें दिनारा मातबर जागा दुर्घट आहे. तेथील राजा येऊन भेटला. मामलत केली. कासी नरसी यास पत्र आलें, तें श्रीमंत राजश्री बाळाजीपंत बाबाकडे पाठविलें आहे. दोन त्याची नकल मीं पाठविली आहे. पावेल मोर्तबांत लेखनसीमा अक्षरें आहेत. विदित होय. प्रस्तुत कासी नरसी सागरांत आहेत. ते बाहेर जात आहेत. तयारी होत आहे. तिकडे जातों ह्यणून ह्मणत आहेत. पहावें. खाशाचे दस्तुरचें पत्र येत नाहीं, यामुळें गुंता किंचित दिसतो. परंतु राजश्री विश्वासराव लक्षुमण मातबर माणूस. ते इतकें करणार नाहींत. येथून कोणी मातबर शहाणा माणूस कारकून पाठवून मग करणें तें करावें, ह्मणून मीं पांच चार वेळां ह्मटलें. परंतु त्यांचे विचारास येत नाहीं. देशीं पत्रें श्रीमंतास गेलीं आहेत. संशय धरावा असें किमपि दिसत नाहीं. अक्षर मात्र येत नाहीं. वरकड लिहिणेंयाची पद्धत वगैरे खुणांमध्ये अंतर किमपि नाहीं. संशय किमपि नाहीं. विदित होय. राजश्री विश्वासरावजींचाहि आकस यांजवर आहे. गणेश संभाजीस तों पिटून बाहेर घातला आहे. राजश्री बापूजी नारायण यांची तों मामलतच नरसीगडची जबरदस्तीनें घेतली आहे. राजश्री चिंतो केशव यांजपाशीं होतें तें बेइजत करून अडीच हजार रुपये सान्याचे हवाला करून घेतले; ह्मणून तो याकडून निघोन गणेश संभाजीकडे सडा गेला आहे. गणेश संभाजीनें आपली दिवाणगिरी दिली. तेहि करारेयास जाणार. यांसी सर्वांसीं विरुद्ध. स्वार प्यादा सर्वांसीं कज्या. सलुक आपल्यामध्यें व बाहेर कोठें नाहीं. राजश्री जनकोजी शिंदे ह्मणून पेशजी गेले. त्यांचे वर्तमान तहकीक कळत नाहीं. तें लिहावयासी आज्ञा केली पाहिजे. झालें वर्तमान कच्चें पक्कें लिहिलें आहे. सेवेसी विदित होय. हे विज्ञापना.