[६३] ।। श्री ।। ३ एप्रील १७५७.
सेवेसी विज्ञापना. त।। छ १३ रजब पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. कृष्ण जोशी यांचें पत्र शहरींहून पुण्यास छ १२ रजबूम आलें. त्यांत दिल्लीकडील मजकूर. पठाण दिल्लींत येऊन अमिरांच्या घरावर चौक्या बसवून द्रव्य कुल घेऊन रयतीस उपद्रव फार दिल्हा. आणि तिसा करोडीचें वित्त जमा करून पुत्रासमागमें दहा हजार फौज देऊन लाहोरावरून आपल्या देशास रवाना केलें. आणि पठाण दिल्लीच्या बाहेर निघाला. समागमें गाजुद्दीखान व कमरद्दीखान याचा लेक१३४ व बंगाल्याचे राजाचा वकील ऐसे तेथून कुच करून बलभगडाजवळ आले. तेथून जें कुच केलें ते मथुरेजवळ गेले. आंत पांच हजार जाट होते ते बाहेर आले; आणि यासीं युद्ध उत्तम प्रकारें घेतलें परंतु, पठाण भारी. त्यास कटून मेले. आणि दोन हजार जाट पळून गेले. आणि पठाणाच्या लोकांनीं मथुरेवर हल्ला केला. त्यास दीड प्रहर लूट व कतलाम झाली. मग द्वाही अलमशाहाची फिरविली. पंचवीस लक्ष वित्त घेऊन आपला अंमल बसवून मथुरेहून फौज गोकुळवृंदावनास पाठविली कीं लुटून घेणें. त्यास, तेथे बहिरागी दोन चार हजार १३५ नागे जमा होऊन युद्ध घेतले. दोन हजार बैरागी मेले व दोन हजार पठाणाचें मनुष्य मेलें. इतक्यांत पठाणास जुगुलकिशोर वकील याणें सांगितलें की फकिरांचे स्थल आहे तेथें पैशाची जात नाहीं. तेव्हा पठाणानें स्वार पाठवून आपले लोक फिरवून आणविले. कुल बैरागी मेले, परंतु गोकुळनाथ वाचविले. जुगुलकिशोर पठाणापाशी पेश आहे. तेथून पठाण कुच करून आगरेयाजवळ आला. आग-याची रयत बाहेर येऊन भेटली. पांच लक्ष रुपये खंडणी द्यावी असा तह जाहाला. त्यास रुपयाचा भरणा होणें तर रयतीस कठीण जालें. वायदाहि टळला. तेव्हा पठाणाने आग-यावर हल्ला करून लुटून पस्त केलें व किल्ल्यास मोर्चे लावून किल्ला१३६ हस्तगत केला. गाजुद्दीखान किल्ल्यावर जाऊन किल्ला घेतला. शहरांत द्वाही पातशाहाची फिरविली. पठाण पांच सात दिवस येथे राहून कुच करून आठ कोस पुढें आला. तेथे मुक्काम दहावीस आहेत. दिल्लीची रयत पळून मथुरेस आली, मथुरेहून आग-यास आली. आग-यांत पठाण येणार ह्मणून कुल मातबर लोक होते ते व गरीबगुरीब ऐसे आग-याहून राजश्री नारो शंकर व समशेर बहादर यांचे लष्करांत आले. त्यास, पठाण आग-यास आला, ते या फौजांनीं कुच करून झांशीच्या रोखें आल्या.