[१६] ।। श्री ।। १७ सप्टंबर १७५३
पु ।। श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-
कृतानेक विज्ञापना. छ १८ जिलकादीं दोन प्रहरां नवाब गजफरजंग मुसाबुसी यांचे भेटीस गेलों ते समयीं सरकारचे पत्राचे जाब तयार करून थैली करून सेवकाजवळ रवानगीस दिली. ते समईं बोलिले कीं आह्मास रकुनुदौला६९ नसिरजंग यांहीं पत्र पाठविलें तें तुह्मी आइकिलें आहे; त्याची नक्कल रावसाहेबांस पहावयास पाठवितों. सेवक बोलिला कीं उत्तम आहे. मग तेच समईं अबदुल रहिमानखान येहीं त्या पत्राची नक्कल करून सरकारचे थैलीत घालून सेवकाजवळ दिली व बोलिले की तुह्मी रावसाहेबांजवळोन आलेस हें वर्तमान नवाब सलाबतजंग व रुकुनुदौला नसिरजंग यांस कळलें असेल व लोकांचे लिहिलेयावरून कळेल, परंतु आह्मास लिहिलें पाहिजे; काय ल्याहावें? सेवक बोलिला कीं आह्मास पुसता तर इतकें ल्याहावें कीं आह्मी दूरदस्त होतों; मागें कितेक वसवासाच्या गोष्टी जाल्या; याजकरितां आह्मी रावसोंबांस लेहून वकील आणविला. वकील आलियावर रावसाहेबांचे तर्फेनें कितेक वसवास होता तो दूर झाला याजवरून संतोषी जाले. बोलिले कीं याप्रमाणें लिहितों, व बोलिले कीं औरंगाबाजेहून सफीउल्लाखान व परशरामपंत ऐसे थालनेरास रावअजम रघुनाथराव७० यांजकडे जाबसालास गेले आहेत. तुह्मी रावसाहेबांस लिहून पाठवावें कीं साहेबीं रावअजम रघुनाथराव यांस लिहून पाठवावें कीं मोगलाकडून जाबसालास वकील आले आहेत, त्याजवळ जाबसाल न करावा. नवाब गजफरजंग मुसाबुसी यांचे मारीफत जाबसाल करावा लागतो. तह त्यांचे मारीफत जाला ह्मणून लिहून पाठवून जाबसाल मौकूफ करवावा. आह्मीहि नवाब सलाबतजंग व रुकुनुदौला यांस लिहितों कीं आह्मी रावसाहेबांस लिहून रघुनाथराव यांस लेहविलें की जाबसाल करणें तो गजफरजंग यांचे मारिफत करावा लागतो. त्याचे मारिफत जाबसाल होईल. शहरातून जाबसालास वकील औले असतील त्यामारिफत त्याजवळ जाबसाल न करावा. त्याप्रमाणें तिकडून आमचे मारीफतीखेरीज जाबसाल होणार नाहीं. तुह्मीहि याप्रमाणेंच अमलांत आणावें. आह्मी औरंगाबाजेस आलियावर जें करणें तें करूं ह्मणोन लिहून पाठवितों. आह्मी आपले मारीफतीखेरीज कोण्हाचें७१ चालों देत नाहीं. मध्यें कोणी जो दिगर करील त्यास तंबी करूं ह्मणोन बोलिले. त्याजप्रमाणें सेवेसी विनंति लिहिली आहे. मुसाबुसी येथून विजयादशमी जालियाउपर कुच करितील. कुच करून निघालियावर स्वामीचे दर्शनलाभास यावें हा त्यांचा इरादा आहे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे हे विज्ञापना. मुसामुसी यांही सेवेस पत्राची थैली दिली ते जासुदाबराबर सेवेसी पाठविली आहे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे हे विज्ञापना. रुमीखानांहीं सेवकाची व गजफरजंग याची भेट केली आणि घरीं आले. आजारी पडिले आहेत अद्याप बाहेर निघाले नाहींत. जाबसालासमईं हाजीर नव्हते. सेवेसी श्रुत जालें पाहिजे हे विज्ञापना. मुजफरखान७२ गाडदी यांही मुसाबुसी यांस पत्र पाठविलें होतें, त्यांचें उत्तर म।।रनिले येहीं लेहून सेवकाजवळ रवाना करावयास दिधलें तें रवाना केलें आहे. मुजफरखानास प्रविष्ट होय ते आज्ञा करावयास स्वामी समर्थ आहेत. हे विज्ञापना.