[२९९] श्रीशंकर. २४ जानेवारी १७६३.
राजाश्रिया विराजित राजमान्य राजश्री
जनार्दनपंत बाबा स्वामीचे सेवेसि.
पोष्य काशी नरसिंह कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता॥ माघ शु॥ १० मु॥ आमानगज नजीक पर्णे जाणून स्वकीव लिहीत गेले पाहिजे. विशेष. कृपा करून पत्र पाठविलें. पावलें. बहुत समाधान झालें. याच प्रकारें सर्वदा पत्र पाठवून संतोषवीत जावें. इकडील वर्तमान सविस्तर राजश्री कृष्णाजीपंतीं लिहिलें आहे. सविस्तर तपशीलवार त्याजवरून कळेल. श्रीमंत राजश्री भाऊसाहेबांकडील वर्तमान लिहावें ह्यणोन लिहिलें. त्यास आपण परस्परें तिकडे ऐकतच आहां, त्याचप्रमाणें आहे. अधीकोत्तर लिहावें तर प्रमाणांत दिसत नाहीं. राजश्री गणेश१ संभाजी प्रस्तुत त्याजकडे गेले आहेत. थोडीबहुत नरवरवाल्याची फौज समागमें आहे. या प्रकारचें वर्तमान आहे. आह्मांस बुंदेले यांणीं बोलाविलें मदतीस, ह्मणोन येथें आलों आहों. एक दो रोजीं भेटी होणार, पुढें विचार जो होईल तो लिहून पाठवूं. आपणाकडील वरचेवर कुशलोत्तर कृपा करून लिहीत असावें. सुजातदौले यांनीं करोलीचे घाटीं पूल बांधोन बेणी बहादर कासम आली खां यांस पंचवी तीस हजार फौजेनसी बुंदेले यांजवर पे॥ गहोंरा व कालिंजर पावेतों जप्ती केली. राजे पर्णेयांत आहेत. कबीले सर्व डांगेंत तेजगड प्रांते पे॥ राहतां कालिंजर, आजेगड, मडफा, जैतपूर ठाणीं मात्र राहिलीं. बुंदेलखंड त्याणें घेतलें तमाम रजवाडे बोडसे, दतीया, मदावर इनतखानसुद्धां त्यास मिळाले. सर्वांच्या चित्तीं सिरोंजेपावेतों घेऊन यावें. मोंगलाचा जोरा भारी जाहला आहे. याजउपरि हे जागा राहतां मुशकील आहे. असो. ऋणानुबंध असेल त्याप्रमाणें घडोन येईल. आह्मीं श्रीमंत स्वामीस व उभयतां चिरंजिवांस इकडील साद्यंत वर्तमान वरचेवर लिहीत गेलों. त्यांचे मर्जीस फौज पाठवून बंदोबस्त इकडील कांहीं करावा तें येत नाहीं. यास आमचा काय उपाय? जशी मर्जी असेल तसें करून. आपण प्रसंगीं आहेत. कळेल त्याप्रमाणें विनंति करावी. आजपावेतों जिवाभ्य श्रम करून खावंदाचा नक्षा राखिला आहे. पुढें सर्व मर्जी त्यांची. सिरोंजेस आले ह्मणजे उज्जेनपावेतों जागा गेली. फौजा माळवियांत नाहींत हें पूर्तें यवनानें पाहून काम करीत आहे. आणि फौजाहि देशीहून येत नाहींत. कर्णाटक प्रांतीं जात आहेत. हे सर्व खबर बातमी मोंगलानें पाहोन मनसबा केला आहे. तुह्मांस कळावें ह्मणोन लिहिलें आहे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.