[१४]                                                                ।। श्री ।।                                                               १३ सप्टंबर १७५३

 

पुरवणी ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना. छ११ माहे जिलकाद सोमवारी५९ नासरजंगपेठेहून निघोन शहर दाखल व्हावयास आलों. गोलकुंडा किल्ला पाठींमागे टाकून कारवानासमीप येतां तेथे चौकीवर नवाबजंगफरजंग६० मुसाबुसी यांचा हरकारा सेवकाचा मार्ग लक्षीत बैसला होता. त्याची भेट होतांच बोलिला कीं तुमचेच खबरेकरितां मजला येथें बैसविलें आहे. नवाब तुमची वाट पहात आहेत, ऐसें बोलोन जलदीनें खबर पोंचवावयास गेला. सेवक कारवानाचें सिरें यास येऊन मुचकुंदा नदीचे पुलासमीप गोसावी यांचा मठ होता. रम्या स्थल पाहोन स्नानसंध्येस उतरलों. दोघे लढाईत व दोघे जासूद नवाबाकडे पाठविले. मागितलें कीं आमची सलाम सांगावी आण आह्मास राहावयास जागा शहरामध्यें मागोन जागा करार करतील तो पाहोन येणें. येथोन निघोन शहरांत जाऊन लढाईत जासूद नवाबाकडे गेले. नवाब चारमहालीमध्ये राहिले आहेत. खबर पोंचतांच बहुत संतोष मानून तोफा मारविल्या. लढाईत जासुदास पांच रुपये इनाम दिधला. सेवकास राहावयास जागा तयार करविला. राजश्री दीनानाथ गोविंद यास बोलावून आणून सेवकाकडे पाठविलें. मागितलें कीं वकील कोठें उतरले आहेत तो जागा पाहोन आजचा रोज त्यांस तेथेंच असों देणें. आजचे रोजांत जागा तयार होईल. उदैक रुमीखानास पाठवून त्यांस भेटीस आणावूं ह्मणोन सांगोन पाठविलें. म।।निले आह्मास भेटले. बोलिले कीं तुमचे येण्याची प्रतीक्षा बहुत करीत होते. तुह्मी आले ऐकोन बहुत संतोष पावले. यांचा मनोभाव श्रीमंत स्वामींच्या ठायीं द्दढतर आहे. आज तुह्मी येथेंच राहुटी देऊन राहावें. उदैक रुमीखानास घेऊन येतों. समारंभें भेटीस नेऊन+ ऐसें बोलोन गेले. छ१२ रोजी भोमवारीं प्रात:काळीं राहुटीमध्यें सेवकाने बिछाना टाकून सिद्धता केली. बिडे, पान वगैरे साहित्य आणिलें. प्रात:काळचा घटिका सासात दिवस आला तों दिनानाथपंत रुमीखानाकडे आले. रुमीखानाची स्वारी तयार जालियावर पंत म।।निले सेवकाजवळ आले. बोलिले कीं रुमीखान भेटीस येतात त्यांस वस्त्रें दिलीं पाहिजेत. बोलिलों कीं खान म।।निलेच्या वस्त्रांविषयी हुजूर विनंति केली होती, परंतु सिरिस्ता नाहीं ह्मणोन दिलीं नाहींत. प्रस्तुत प्रसंग संपादिला पाहिजे. तर नवाबास दहा वस्त्रें दिधलीं आहेत. त्यांजमध्यें लाल दुपटा सवाएकसष्टांचे आंखचा आहे तो द्यावा. ऐसा करार करोन दुपटा काढऊन ठेविला. इतकेयांत रुमीखानाची स्वारी आली. पालखींत बसोन आले. बराबर दोन-तीन कसेबरखंदाज, गाडदी व निशाण व वाद्यें ऐसे समारंभानें आले. भेट जाली. बहुत संतोष पावले. समाधानाच्या गोष्टी केल्या. स्वामीच्या प्रतापाचें स्तोत्र बहुत केलें. रामदासपंताचे६१ दुराचरण आठविलें. नवाबगजफरजंग यांचा स्वामीच्या ठायीं निखालस स्नेह तेंहि वृत्त सांगितलें. तदनंतरें त्यांस दुपटा पांघरविला. विडे, पान देऊन त्यांजबरोबर सेवक व दिनानाथपंत ऐसे निघाले. खान म।।निलेनें अवघे आपले लोक उभयतां सेवकांचे घोडेयांपुढे लावून आपली पालखी घोडेयांमागें चालविली. याप्रमाणें समारंभानें भेटीस आणिलें. नवाबनेंहि चारमहालीमध्यें समारंभ केला. तमाम गाडदी फरंगी कमरबस्ता करून दुतर्फा उभे केले होते. चारमहालीचे तलावाचे पाळीवर एकीकडे वीस तोफा गाडियावर मांडिल्या आहेत;६२ दुसरेकडे वीस गाडे दारूचे संदुखाचे आहेत; गरनाळाचे कितेक गोळे पडले आहेत; उभयतां सेवक व खान म।।रनिले चारमहालीस आलियावर खान म।।निले येहीं उभयतां सेवकांस पुढें करून आपण पाठीमागें राहोन पाश्चात६३ चक्रामधोन माडीवर दर्शनास नेले. सेवकाबराबरील लोक अवघेच समागमें घेतले. कोणास मना केलें नाहीं. माडीवर गेलों. वरती फिरंगीयांची मजालीस केली होती. खुरशा मखमालजरबाबी मढोन मांडिल्या होत्या. उभयतां सेवकांकरितां दोन खुरसिया नवाबाचे खुरसीनजीक ठेविल्या होत्या. नवाबा* अंदर होते. सेवक खुरसीयांवर बैसलों. क्षणैकानें नवाब आले. सेवकास भेटले. सन्मान करून बैसविलें. सेवकानें एक मोहोर व पांच रुपये नजर दाखविली. ते कबूल केली. तदनंतरें उभयतां स्वामीची दुवा सांगोन पत्राची थैली होती ते रुजू केली. ते स्वहस्तें घेतली. त्याउपर सरकरांतू वस्त्रें दिल्हीं. तीं सनगें दहा. त्याजपैकीं दुपटा रुमीखानस दिला. बाकी नव सनगें होतीं. ते खानामध्यें घालून रुजू केलीं. बहुत संतोष मानून मान्य केलीं. स्वमुखें स्वामीचा कुशलार्थ पुशिला. घटिका एक बैसले होते. तदनंतर उठोन खलवतांत सेवक उभयतांस घेऊन गेले. बोलिले कीं रावसाहेबांजवळ आमचा दुसरा विचार नाहीं. आह्मी एकवचनी आहों. जो स्नेह संपादिला त्यांत दुसरा विचार नाहीं. प्रस्तुत मजकूर बोलावें तर तुह्मी श्रमाने आले आहां यास्तव तुह्मी आश्रमास जावें. उदैक परस्परें बोलणें तें बोलोन सैद लश्करखान व रावअजम यांचा सांप्रत स्नेह कसा आहे तो सांगावा. सेवक बोलिला कीं स्नेह राहणें तो खरेपणावर राहतो. दगाबाजीचे कर्तृत्वास स्नेह कळतच आहे. प्रस्तुत त्यांचे स्नेहाचा विचार असाच कांही आहे. सविस्तर विदित केला जाईल. या गोष्टीवरून संतोष पावोन सेवकास रुखसत केलें.ते समयीं बोलिले कीं हिंदुस्थानचे राजेयांची आह्मांस६४ पत्रें आलीं आहेत ऐसे बोलोन खुरसीवर सातआठेक पत्रांच्या थैल्या होत्या. त्या हातीं घेऊन दाखविल्या. बोलिले कीं आह्मांस रावसाहेबांजवळ प्रपंच नाहीं. इतकें बोलिले. मग विडे दिधले. अत्तर लाविला; गुलाबदानी स्वहस्तें घेऊन गुलाब सेवकाच्या आंगांवर घातला. ते समयीं सेवकास चार वस्त्रें-येक दुलोसी चिराव, गोशपेश व पटका सफेद दुलोसी किनारेयाचा व महमुदी जरीबुटेयाचा-ऐशीं दिलीं. नवाबानें आपले खजमतगाराजवळ देऊन सेवकाचे बिराडीं पोंचवावयास सांगोन रुखसत केले. उभयतां सेवक निघोन शहरामध्यें बागांत बंगला आहे तें स्थळ सेवकास नेमिलें. तेथें येऊन राहिलों. दिनानाथपंत आपले बिराडास गेले. तदनंतरें घटकादोहोंनीं खासा रुमीखान पालखींत बसोन सेवकाजवळ आले. पांचशे रुपये नवाबानें जियाफत मेजवानी पाठविली ते सेवकास दिधली. विडे घेऊन गेले. छ १३ जिलकाद बुधवार पौर्णिमा भेटीस जावें तों नवाबानें सांगोन पाठविलें की आज दिवस फटकाळ आहे. उदैक भेट होईल. याजकरितां भेटीस न गेलों. छ १४ जिलकादीं गुरुवारीं दोनप्रहरां सेवकास चोपदार पाठवून बोलावून नेलें. दिनानाथपंतहि होते. भेटीनंतरें जाबसाल जाले ते अलाहिदा पुरवणीचे विनंतिपत्रीं लिहिले आहेत त्याजवरून सेवेसी विदित होतील. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना छ १३ जिलकादीं रुमीखान नवाबाजवळोन आपले घरास आले. त्यांस शरीरीं विकृती जाली. यास्तव छ१४ जिलकादीं खलवतांत बोलीचे प्रसंगीं खान म।।रनिले दरबारास आले नव्हते. नवाबाचे मुनशी अबदुल रहिमानखान मात्र होते. छ १४ जिलकादीं अगोदर दीनानाथपंत नवबाजवळ गेले होते. सेवकांस पाचारणें आलियावर गेलों. सेवेसी वि।। व्हावयाकरितां वि।। आहे. हे विज्ञापना.