[२९७]                             ॥ श्री ॥      ५ आगस्ट १७६१.

पु।। राजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसिः 

विनंति उपरि नजीबखान रोहिले यांणीं इंद्रप्रस्थ सर्व किल्ल्याचा सुद्धां बंदोबस्त करून पाणीपताकडे जाऊन बहादखानबलोच्याशीं स्नेह संपादून बागपताकडे अंतरवेदींत आले. शिकंदराबादेकडे येणार. रोहिलेचार, बलोच, सुजातदौला, पठाण, साताचें येक मत आहे. पटण्यास पातशाह आहे, त्यास आणून दिल्लीस स्थापना करून बंदोबस्त करावा. गाजदीखानास जाटाचे विद्यमानें वजिरी दिली. परंतु त्याशीं व रोहिले सुज्यातदौत्याशीं पेंच. किल्यांत बंदोबस्त नजीबखानाचा. पातशाह स्थापिला. यासि वजिराशीं द्वेष. याची वजिरी कोण रीतीनें चालेल ? किल्यांत जाणें तर पांच माणसांनिसीं वजिरानें जावें. असा प्रकार जाहल्यानंतर गाजदीखान किती दिवस राहतील, तें कळतच आहे. जाटाशीं रोहिल्याशीं पेंच पडला. तशाहिमध्यें आग-याचे किल्ल्यास मोरचे लाविल्यानें पातशाही हरामखोरी ठहरली. पातशाह पटण्याहून तीन मजली अलीकडे आला. तो फिरंग्याचे स्वाधीन. सर्व अधिकार फिरंग्याचा तेथें आहे. हिंदुस्थानी कोणी नाहीं. मिरजा कोचक प्रयागचा किल्लेदार सोडून देणें ह्यणून पातशाहाचा हुकूम जाहला असतां सुजातदौल्यानें जिवें मारिला. यामुळें पातशाहासीं सुजातदौल्याशीं पेंच जाहला. यास्तव सुजातदौला पातशाहास आणावयास जीवनपूरपर्यंत गेला होता तो एक मजल माघारा अयोध्येचे रोखें फिरला, ह्यणून बातमी आली आहे. फिरोन वकीलहि परस्परें गेले आहेत. चोंहीकडे दंगाच आहे. ईश्वर काय करील पहावें. आपण आजपर्यंत पुण्यास दाखल जाहलेच असतील. तिकडील तपशिलवार वर्तमान सर्व लिहून पाठवावें. आह्मीहि इकडील कांहीं स्वस्थता झाली ह्यणजे महिना पंधरा रोजीं एकजण येऊं. भेटीनंतर सविस्तर कळेल. सागरचे आपाजीपंत ठार जाहले, यामुळें तेथील हिशेब आले नाहींत. आह्मीं पत्रें बहुत पाठविलीं. विसाजीपंत सागरीं गेले ह्मणजे हिशेब सत्वर पाठवितील. राजश्री मल्हारजीबावा या प्रांतांतून गेले. प्रस्तुत इकडे तात्या आहेत. रोहिल्याची गडबडेचा प्रसंग आहे. याबद्दल ईश्वर इच्छा असेल तें प्रमाण. मागाहून सविस्तर लिहून पाठवूं. तुमचीं दोन तीन पत्रें पावलीं. मजकूर कळला. सदैव पत्रीं कुशलोत्तर संतोषवींत जावें. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. हे विनंति.

राजश्री दादोपंत, धोंडोपंत, नारोपंत, सखोपंत, वेंकाजीपंत यांस नमस्कार लि। परिसिजे. लोभ असो दीजे. हे विनंति.