[१३]                                                                ।। श्री ।।                                                               १३ नोव्हेंबर १७५१

 

पु ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

विनंति सेवक रघुनाथ गणेश कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपाद्दष्टीनें सेवकाचें वर्तमान तागायत छ ५ मोहरम पावेतों मे।। लष्कर नवाब सलाबतजंग यथास्थित असे. छ म।।रीं मौजे कुपटीहून५६ लष्कराचा कुच जाला सानवाकोशाचा. मौजे केदल व पाबल मुलखडीचे तीरीं मुक्काम जाला. दरकुच अहंमदनगरास जातात. तेथें जनाना ठेवून व बहुतेक बाहेर ठेवून जरीदा होहून पुण्यास येणार. खानअजम सैदलस्करखान यांचे डेरे दोन होते. पैकीं आजच येक माघारा पाठविला. कायगांवीं अगर पुढें दरयेक गांवी ठेवावयास सांगितला आहे. राजाजीनें खानास येक लक्ष रुपये पेशगी आज प्रात:काळी पाठविली. आज्ञा केली कीं स्वारास एकेक महिना पेशगी बिलाकसूर देणें. दोन महिनेयांची तलब राहिली तो ऐवज खजानेयावर देवविला आहे. याजाप्रमाणें लष्करांत वाटणी केली व करीत आहेत. हणमंतराव निंबाळकर काल छ ४ रोजीं लष्करदाखल जाले. दोन हजार राऊत बराबर आले आहेत. काल संध्याकाळापूर्वी महमद अनवरखान नवाबानें पुढें पाठविलेयावर रावमशारनिल्हे नवाबाचे मुलाजमतीस आले. सेवेसी विदित जालें पाहिज. सुभानजी थोरातहि दोन कोस स्वारांनसी कालच आले. पांढरेहि आले. सासात कोस स्वार आहेत. आघाडीस राहिले आहेत. हणमंतराव निंबाळकर यांची फौज खुदावंदखान खजाना घेऊन आले त्याजबराबर आली. हालीं खासा दोन हजार फौजेनसी आले. येकूण चार हजार फौज आहे. नवाबाची फौज जमावत चालली. आजत।। वीसेक हजार फौज जमा जाली आहे. आणीकहि जमा होतच आहे. आणीक वर्तमान आढळलें कीं राजाजीनें महाराव यांस पत्र पाठविलें कीं तुह्मी फौजसुद्धां येणें; सटवाजी जाधवराव यांस निरोप देणें व स्वामीसहि पत्र पाठविलें की तयार व्हावें; व खानास हरकारेयानें खबर दिली कीं महाराव जाधराव यांस घेऊन लष्करांत येत आहेत. ही गोष्ट खानच बोलत होतें. स्वामीजवळ फौज जमा जाली नाहीं. चार पाचेक हजार स्वार आहेत. स्वामीचा मुकाम पुण्यासमीप कळसावर आहे ह्मणोन येथें बातमी आहे. खानहि याचप्रमाणें बोलत होते. सेवकानें जाधवराव यांजकडे पत्र लेहून जासूदजोडी काल पाठविली ते अद्यापवर आली नाहीं. आज संध्याकाळपावेतों आली तर येईल. विनंतीपत्र लिहीत असतांच जाधवराव यांकडे जोडी पाठविली होती ते आतांच आली. जाधवराव यांनी सेवकास पत्र पाठविलें. तेथें लिहिलें आहे कीं, तुह्मी वर्तमान लिहिलें तें कळलें; स्नेहाचे विचारें त्यांनी आह्मास बोलाविलें त्यावरून आलों; आह्मी जवळच आहो; भेटीचे विचारें कडून जाल्यास होईल; न होय तर उत्तम; येथील बातमी मात्र वरचेवरी अंतस्थाची खबर आह्मांस व श्रीमंताकडे रोजच्या रोज लेहून पाठवीत जाणें, ह्मणोन छ ४ मोहरमचें पत्र आलें. जाधवराव व महाराव एकत्र आहेत. सिंगवेंपिंपळगावास उभयता होते. तेथून कालच कूच करून सातआठ कोश वरते निंबदेव्हारेयाचे रुखे मौजे राजेवाडीवर मुकामास आले ह्मणोन जासूद सांगत होते. विनंतिपत्र लिहीत असतां दर्याजी जासूद खानाचे जासुदाकडे पाठविला होता. त्यानें येऊन वर्तमान सांगितलें कीं खानाचे बातमीचे जासूद स्वामीचे लष्करातून आतांच आले ते सांगत होते कीं स्वामीचा मुकाम खेडानजीक वडगांवावर आहे. बराबर फौज वीसेक हजार आहे. हें वर्तमान आतांच कळलें तें सेवेसी विदित. व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. नवाबानें खानास आघाडी सांगितली. परंतु अद्याप आघाडीस गेले नाहींत, पिछाडीसच राहत असतात. खान आज जरीदा जाले. बहुतेक वस्तभाव माघारी लाविली. तुरकाबादेस ठेवावयास सांगितली आहे. नवबाबरोबर फौज पंचवीस हजार पावेतों जमा जाली आहे. आढळलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. हे विज्ञापना. या मुकामाहून वामोरी खालती तीन कोश आहे. विदित जाले पाहिजे. राजश्री शामजी गोविंद शहरांतून काल लष्करांत आले हे विज्ञापना. राजेश्री मनोहरपंतीं आज प्रात:काळी विनंतिपत्र लेहून दिलें. सेवक मजलीस५७ आलियावर विनंतिपत्र लिहिलें आहे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे हे विज्ञापना५८.