[२९६] ॥ श्री ॥ ५ आगस्ट १७६१.
पुरवणी सेवेसी शिरसाष्टांग नमस्कार विनंति. श्रीमंत भाऊसाहेब सि रीस आले. तेथें गणेश संभाजी जाऊन भेटले. तेथें गडी सिरसईची होती, ती घेतली. बंदोबस्त करून उभयतां नरवरास माघारे जाऊन तेथून दतियास गेले. दोन तीन हजार फौज बरोबर आहे. सिरोजेकडे यावयाचा मजकूर होता. तेथें इजतखान व अहीरखीची एकत्र होऊन श्रीमंतावर रोख केला. दगाबाजीचा विचार पाहोन नरवराहून दतियास गेले. राजश्री विश्वासराव लक्ष्मण करारेयास आहेत. अद्याप एक निश्चय गोष्ट समजत नाहीं. तेथें जाऊन गृहस्थ अथवा माणस कोणी जातो तो ह्मणतो निस्संदेह गुंता नाहीं. कागदीं पत्रीं दस्तक नाहीं. कशावरून जाणावें? येथून कोणी गृहस्त मायेचा जात नाहीं. बातमीहि ठीक लावून करीत नाहींत. परंतु कागदीं पत्रीं गोष्ट अटकलेंत येत नाहीं. गणेश संभाजीस हातीं घेतला आहे. कळावें. पेशजी आज्ञा आली आहे त्याप्रमाणें वर्तणूक करीन. यांस सोडून काय कारण जावयाचें? राजश्री बापूजी नारायण यास नरसिंगडची मामलत होती. त्यास तेथून सरकारांतून दूर करून श्रीमंत राजश्री बाबास दिली. सनद येथें आली. उपरांत मामलत गडींसुद्धां दादांचे हवाली करून शिलेदारीनें दोन महिने चाकर होते. उपरांत निरोप घेऊन देशीं जावयासी सागरीं गेले. राजांच्या भेटी जाहल्यावर गेले. राजश्री विसाजी गोविंद यांसि अद्यापवर सलुक नाहीं. गडीबाहेर सर्व जाग्यांत कारकून याचे बसोन वसूल घेतात. ठाणीं सर्व आठ नऊ आहेत, तीं विसाजी गोविंद याचे स्वाधीन आहेत. याज खेरीज पांचशें पागास्वार ह्मणून बरोबर आहेत. दोन महिने लश्करांत बरोबर होते; पंरतु सलुखाची गेष्ट न ठरली. शेवटीं घाटीखालीं उतरूं लागले, तेव्हां विसाजीपंत बोलिले कीं मला बरोबर नेतां तरी मामलत पूर्ववत् प्रमाणें माझी मजकडे ठेवणें. कारकून सर्व उठवून आणावे. मी बरोबर चाकरीस तयार. तें बनोन न आलें. सारांश, त्याची याची आडभारीयांस जागा घेणे. त्यांस न देणें, यांचा मजकूर तेथील स्वामी जाणतच असतील. मी काय लिहूं? तेथील लिहावयासि आज्ञा केली. शेवटीं हे घाटीखालीं आले. ते सागरास गेले. मागाहून विसाजीपंतास लिहिलें कीं तुमचे भरंशावर आह्मी इकडे आलों आहों. सर्व उत्तम प्रमाणें बंदोबस्त करणें. त्यांचें उत्तर आलें नाही. दहशत परगणेयांत विसाजीपंताची भारी आहे. या उपरि काय ठरेल तें पहावें. स्वामीस किती दिवस लागतील तें लिहावें. लौकर आलें पाहिजे. हे विज्ञापना.