[१२]                                                                ।। श्री ।।                                                               १४ अक्टोबर १७५१

 

पु ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना. खजाना येथें दोन लक्ष अठ्ठावन हजार रुपये पोतापैकीं देववून मग नवाब रोजेयांस गेले. त्यापैकी दहा हजार रुपये राजश्री बाळाजी महादेव यांही मोजून घेतले. अरकाटी, गंजीकोटी रुपये देतात. तदनंतर खजनियाचा दरोगा रोजेयांस गेला होता तो अद्याप आलाच नाहीं. खजाना द्यावयाची घालमेल दिसते. परंतु देतील. ब-हाणपुरीं पावणेतीन लाख रुपये देवविले ते हरबाजीराम वकील याचे मारीफत बाळाजी पंताचे कारकून व खजानची याचे पदरीं पडिले. तेथून हरबाजीरामानें अहमद मीरखानचें दस्तक घेऊन बदरका मागोन खजाना रवाना करावा ते त्यांच्यानें न जालें. नवाबाचे दस्तक पाठवाल ह्मणोन त्यांणीं बाळाजीपंतास लिहिलें. येथें खानास वर्तमान विदित करितांच खानांनीं राजाजीस सांगोन दस्तक व अहमद मीरखानास बदरकेयाबाबे पत्र ऐसीं राजाजाचीं घेतलीं. राजाजीनें आपले मोहरेनसीं दस्तक व अहमद मीरखास पत्र दिलें. हीं पत्रें नबाब रोजेयांस गेले होते तेथें राजाजी व खान गेले होते तेथें घेतलीं. छ४ तेरीखेस बाळाजीपंती आपलें पंचवीसेक राऊत व पनस प्यादे देऊन दोन कागद ब-हाणपुरास पाठविले आहेत. या उपरी खजाना येईल. राजश्री मानाची निकम यास बदरकेयास स्वार पाठवावयाकरितां बाळाजीपंतीं लिहिलें होतें व सेवकाजवळीने लेहविलें होतें. त्याचा जाब काल आला, मशाहरनिल्हेचे कारकुनाचा. त्यांत लिहिलें आहे कीं आह्माजवळ राऊत नाहींत. याच प्रकारचें वर्तमान आहे. मशारनिलेचे राऊत व प्यादे गेले आहेत. स्वामीचा पुण्यप्रताप समर्थ आहे. खजाना५५ येईल व कितेक जिन्नस सुटींत गेला त्याची यादबस्त खानाचे मारिफत राजाजीजवळ गेली आहे. त्याचा जाबसाल करून देतों ह्मणोन राजाजी बोलत आहेत. सेवक खानाजवळ या गोष्टीकरितां नित्य वालीद आहेच. आजहि बाळाजीपंताचे कारकून खजनियांत पैका द्यावयास गेले आहेत. दहा-वीस हजार आज पदरीं पडितील ह्मणोन बोलत होते. खजनियांत ऐवज नाहीं. मेळवामेळव करितात. हैदराबादेचे खजानेयाची वाट पाहत आहेत. हा ऐवज आठा चहूं रोजांत देतील ह्मणून बाळाजीपंत बोलत होते. हे विज्ञापना.