[११]                                                                ।। श्री ।।                                                               १४ अक्टोबर १७५१

 

पु ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

विनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेवून स।। नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपाद्दष्टीनें सेवकाचें वर्तमान त।। छ ५ माहे जिल्हेज पावेतों. मे।। शहर औरंगाबादेस यथस्थित असे. स्वामीचें आज्ञापत्र खासदस्तुरच्या पुरवण्या दोन-एक राजश्री शामजी गोविंद यांचे नांवची व एक सेवकाचे नांवची – छ२९ जिलकादच्या सादर त्या छ ३ जिल्हेजीं चतुर्थ प्रहरीं प्रविष्ट जाल्या. लखोटा फोडून शामजीपंताची पुरवणी त्यांस दिली. सेवकानें आपले नांवची पुरवणी अक्षरशा वाचून मनन करून कृतार्थता मानिली. आज्ञेप्रमाणें कोणाजवळ कांही बोलत नाहीं. खानाजवळ नित्या जावून आज्ञेप्रो।। स्नेहभाषणच करितों. व जें वर्तमान आढळतें तें विनंतिपत्रीं लेहून पाठवितों. स्वामीचे आज्ञेविरहित अणुप्रमाण कार्य करीत नाहीं. पूर्वील खासदस्तुराचे पुरवणियांचा अर्थ शामजीपंतांचे विचारें विदित करावयाचा जाला तो म।रनिलेहींच खानांस व राजातीस निवेदिला. सेवक सन्निध मात्र होतों. म।।रनिलेहींच आपले व सेवकांचे आज्ञापत्रांचा अर्थ एकत्र करून निवेदिला. सेवकांचे आज्ञापत्रीं आज्ञाच होती कीं हें पत्र वाचून दाखवणें. सेवकास स्वामीचे आज्ञेविना दुसरें कर्तव्य नाहीं. सेवक अज्ञान आहे. स्वामी कृपाद्दष्टीनें पालन करून परवर्दा करीत आहेत. वरकड येथील वर्तमान तर नवाब रोजेयांस छ१ जिल्हेजीं गेले ते छ ३ मिनहूस रात्रो शहरदाखल जाले. आतां बाहेर डेरे करावयाची बोली आहे. जागा जागा तयारी होत आहे. कोणी ह्मणतात कीं उदैक सावे तेरिखेस पेशखाना बाहेर निघणार. कोण्ही ईद जालियावर ह्मणतात. या प्रकारचे येथील वर्तमान. परंतु येथे सिबंदीचा गवगवा बहुत जाला आहे. सिबंदी दिलियाविरहित फौज बाहेर पडत नाहीं. सिंबदी द्यावयास येथें ऐवज नाहीं. खुदावंदखान हैदराबादेहून चाळीस लक्ष रुपये खजाना घेऊन येत आहेत. ते आलियावर सिबंदी देतील. येथूनहि कांहीं लोक खुदावंदखानास आणावयास रवाना होत आहेत. येथें आज दोन-तीन दिवस हुल्लड झाली आहे कीं श्रीमंतीं यशवंतराव पवार दहा हजार फौज जरीदा करून खुदावंदखानावर पाठविले आहेत. खजाना अटकावून आणावा हे वार्ता येथें दाट राजाजी पावेतों आहे. या वर्तमानावरून कितेकांचा आव गेला आहे. जर हे गोष्ट सत्य असली, खजाना सरकरांत हस्तगत जाला, तर हे सहजच गर्वहत होत आहेत. व येथें लोक ह्मणतात कीं दोन महिने श्रीमंतीं असेंच यांस दबकाऊन राखिलियास हे आपलेयांत आपण मरतात. यांस मारावें लागतच नाहीं. लौकर दारमदार जाला तर यांची स्थिती राहेल ह्मणोन सर्वत्र ह्मणतात. यांस सिबंदी व खानगी खर्च मिळोन नित्य लक्ष रुपये खर्च आहे. दरमहा तीस लक्ष रुपये पाहिजेत. खजान्यांत तो पैका नाहीं. हैदराबादचा खजाना आणविला आहे. द्यावा तर तोहि आला तरी तितक्यानें बेगमी होत नाहीं ह्मणोन लोक ह्मणतात. यास्तव या दिवसांत यांस प्रतापाचें दर्शन जालियानें याचा गर्व हत होईल. स्वामींचा पुण्यप्रताप यांजवर गालिब आहेच. काल छ ४ रोंजी सलाबतजंग व राजाजी ऐसे अबदुलखैरखानाकडे गेले होते. डेरे बाहेर करावयाचे विचारांत आहेत. नवाबाचे बहिणीचें लग्न आहे व नवाबहि आपलें लग्न करणार. हीं कार्ये करू घ्यावीं; ईद करावी; पश्चात् निघावे ह्मणोन घालमेल आहे. काय करितील पाहावें. रिक्तपाणी पडिले आहेत उगाच आव मात्र धरितात. प्रसंगास गंधर्वनगराभास४७ दिसतो. याजकरितां यांजवर या दिवसांत सलाबत गालीब जालियानें यांची गुर्मी राहणार नाहीं ऐसें आहे. स्वामी समर्थ आहेत. सरकारच्या कासीद जोडिया दोन येथें राजाजीनें अटकावून ठेविल्या आहेत. हे वर्तमान सेवकानें खानास हटकिलेयावर बोलिले कीं आह्मास विदित नाहीं. याउपर राजाजीस सांगोन सोडवितों. आज उद्यांत कासीद सोडवून घेतों. येथें राजाजीनें शहरचे गर्दनवाईस मोठी खबरदारी मांडिली आहे. चौकीदारांस ताकीद जाली आहे कीं कोणाचा जासूद येईल अगर शहरांतून जाईल त्या रुजू करावें यास्तव लोकांस कागदपत्र पाठवावयाचा संशय निर्माण जाला आहे. कालच सरकारची जोडी खासदस्तुराच्या पुरवण्यांचीं आज्ञपत्रें घेऊन आली. त्या जासुदांनी झोळणे बाहेर ठेऊन सडे होऊन चौकीवरून निभाऊन शहरांत आले. त्यास वाजपूस चौकीदारांनीं केली. खाली पाहिलें ह्मणोन सोडिले. ऐसा प्रसंग येथें जाला आहे. याजकरितां हुजरून जोडी रवाना होईल तिणें सातारियास यावें. तेथें झोळणें ठेवून खालीं होऊन पत्र येथे पोंचवावें. ऐसी आज्ञा जासुदास जाली पाहिजे. येथूनहि याच रीतीनें विनंतिपत्रांची रवानगी करीत जाऊं. सेवेसी श्रुत जाले पाहिजे. येथें एक पडेगोसावी बेगमीबेगमपुरियांत आहे. खानाकडे जातां वाटेवर आढळतो. त्याणें अकस्मात् एक दिवस सेवकास सांगितलें कीं तुह्मी पेशवे यांचे वकील आहां. आह्मीं स्वप्न पाहिलें कीं बारामतीवाला४८ कोणी आहे तो घालमेलींत आहे. तर हें वर्तमान तुह्मी जरूर आमचें नांव घालून श्रीमंतास लेहून पाठवणें. त्याजवरून सेवेसी विनंति लिहिली आहे. राजश्री बाबूजी नाईकांकडील वकील कृष्णाजी रघुनाथ राजाजीकडे जात येत असतां कांही उत्तेजन देतात ह्मणूनहि येथें लोक बोलतात. सारांश येथें वळवळ४९ करीत आहते. सप्तरुषीवरील५० मातुश्रीचेहि५१ येथें कागदपत्र येतात. जाबसाल जात असतात. लक्ष्मण खंडागळा नवाबकडील याचा व रघूजी भोसल्याचा हर्षामर्ष५२ जाला ह्मणोन येथें गप उठली आहे. सत्य मिथ्य कळत नाहीं. गायकवाडाचें भावांनीं५३ सोनगडाकडे फौज जमविली आहे. दहा-वीस हजार जमा झाला आहे. नवाबास सामील होणार. त्यांचा भरोसा राजाजीस बहुत आहे. ह्मणोनहि येथें लोक बोलतात. मागें सेवेसी विनंति पत्रीं लि।। होती कीं नळदुर्गवाल्याचा कासीद दिल्लीस गाजूदीखानाकडे जात होता तो ब-हाणपुरीं सांपडला. येथें आणून गाढवावर बैसवून सोडिला. ऐशास वर्तमान मनास आणितां तो कासीद चित्रदुर्गवाल्याचा होता. पांच मोहरा नजर व पत्र घेऊन जात होता. चौघेजण होते. त्यांत तिघे पळाले. त्यांत एक सांपडला. त्याची गत येथें सदरहू प्रे।। जाली. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. येथें शहरांत सजगूरजोंधळें§ दर रुपयास तीस शेर मिळतात. हरभरे पंधरा शेर, गहू १६ शेर, तूप भाद्रपदांत रुपयाचे निम शेर होतें. मग पाऊण शेर जालें. मग शेरभर, मग सवा शेर, आतां दीड शेर आहे. तेल चार शेर आहे. दूध नवदहा शेर. लांकडें रुपयाची एक मण, चारा फार महर्ग झाला आहे. एका जनावरास पावल्याची वैरण पुरत नाहीं. याप्रे।। वर्तमान आहे. राजश्री शामजीपंत सांगत होते कीं राजाजीचे५४ चित्तांत बिगाड करणें हा निश्चम जाला आहे. खान मध्यें परिमार्जन करितात यास्तव यांस हरएक मसलहत कळों न देता कलह आरंभावा. निमित्य कीं पेशवे नित्य दबावितात. आज समय आहे. या समयी अनमान केलियास पुढें पेशवे यांच्या फौजा जमा जालियावर आह्मास सोडितात हें होत नाहीं. यास्तव कलह करावा. मग होणें तें होऊंदे. हा निश्चम झाला आहे. शाहनवाजखान व राजाजीचें एक मत आहे. शहानवाजखानकडील एका मातबर गृहस्थानें सांगितलें ह्मणोन बोलत होते. ते सेवेसी विनंति ल्याहावी लागली. सेवेंसी श्रुत जालें पाहिजे. स्वामी धणी समर्थ आहेत. हे विज्ञापना.