[१०]                                                                ।। श्री ।।                                                               ९ अक्टोबर १७५१

 

पु ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना. नळदुर्गवाले यांचा कासीद दिल्लीस गाजुदीखानाकडे कागद व पांच मोहरा नजर व कांही वस्त्रें घेऊन जात होता तो ब-हाणपुरास आढळला. तेथून येथें पाठविला. त्याचा शिरच्छेद करावयाची आज्ञा राजाजीनें केली. नवाब बोलिले कीं इतका त्याचा अपराध नाहीं. शिरच्छेद न करावा. मग त्यास गाढवावर बैसवून विपत्य करून सोडिला. नळदुर्गवाले याचा कासीद ह्मणून लोक ह्मणतात. सत्य मिथ्या काही कळत नाहीं. आढळलें वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. राजश्री शिवराम गोविंद भिडे यांचे मारिफत कांही बाणदार सरकारांत चाकर आहेत. त्यांजपैकीं चौघेजण बाणदार तनखा न पावली ह्मणोन निघोन आले. ते येथें राजे रघुनाथदास यांजकडे नोकर जाले. ते चौघेजण आपले बराबर दुसरे वीसपंचवीस बाणदार घेऊन शिवराम नाइकाचे दुकानीं जाऊन म।।रनिलेचे गुमास्ते चिंतामण केशव यांजपाशी तनखेकरितां बहुत हंगामा केला. त्यांनी जाबसाल करावयाचा तो करून पंधरा रोजांचा वाइदा केला आहे. हें वर्तमान सेवकास विदित जालें त्याजवरून सेवेसी विनंति लिहिली आहे. चिंतामण केशव यांनींहि सेवेसी विनंति लिहिलीच असेल. पाजी लोकांचा विचार आहे. त्यांची तनखा राहिली असली तर देववणार खामी धनी आहेत. हे नाजूक गोष्ट येथें बाभाट जालियास अब्रूसी गाठ पडेल. खामीधनी समर्थ आहेत. सेवेसी श्रुती व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. नासरकुलीखान याची अप्रतिष्ठा राजाजीनें केली, हें वर्तमान पूर्वील विनंतिपत्रीं सेवेसी विनंति लिहून पाठविली आहे, त्याजवरून विदित झाले असेल. अलीकडे शोध मनास आणितां निजामअली नवाबाचे बंधू हे राजे रघुनाथदास यांजवर रुष्ट आहेत. त्यांनीं राजेयास मारावयाचा प्रयोग करून महजर केला. त्याजवर मातबराच्या मोहरा घेत चालिले. या प्रयोगास पांच सातजण मिळोन मोहरा केल्या. त्यामध्ये नासरकुलीखानानें मोहर केलीं होती. पुढें ही गोष्ट प्रकट होऊन राजेयांस विदित जाली. त्याजवरून निजामअली यांस निग्रह केला व नासरकुलीखानास बेवकर केलें. वरकडांचे तलासांत राजे आहेत. हें वर्तमान एका मातबर कायतानें सांगितलें. तें सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. येथें शोध घेतां राजातीवर अवघे रुष्ट आहेत. कोण प्रसंगीं काय होईल कळत नाहीं. राजाजीस मोठा भरवसा फरंगीयाचा आहे. सेवेसी विदित जालें पाहिजे हे विज्ञापना. नवाब आज बुधवारी४६ प्रतिपदेस रोजेयास जाणार होते, परंतु आज राहिले. उदैक जाणार आहेत. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. हे विज्ञापना.