[९]                                                                ।। श्री ।।                                                               ९ अक्टोबर १७५१

 

पु ।। श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

कृतानेक विज्ञापना. अबदुल खैरखान नवाबास भेटले. ते समयी खान मशारनिल्हेने नवाबास बिगाड करावया मजकुरांत नवाबास सला दिला की गनीमाईत या दिवसांत फितुर आहेत. प्रधानपंतहि बेफाम आहेत. हा समय उत्तम आहे. आपण सर्व गोष्टींने सगुदा४० आहोत यास्तव साधले प्रसंगांस आळस न करावा. आह्मी जइफ४१ जालो आहो. बहुत दिवस वाचत नाही. सरकार कामावर खर्च व्हावे हे आपली उमेद आहे. ये-हवीं त-हीं आपण बहुत दिवस वांचत नाहीं. व्यर्थ मरावें ते साहेब४२ चाकरीवर हक व्हावें यांत उत्तम आहे, ह्मणोन कितेक प्रकारें मसहलत दिली. नसीरजंग व राजाजीहि होते. खान मशारनिले दुर्बुद्धि सांगोन गेलियावर मागें नसीरजंग व राजाजी बैसोन महसलत करितां, नसीरजगांनीं बहुत प्रकारें परिमार्जन केलें कीं हे गोष्ट उत्तमांत दिसत नाहीं. मागें थोरलें नवाबानें४३ बहुत यत्न केला होता तो व्यर्थ जाला ह्मणून सख्य संपादून होते. आतां तुह्मी विरुद्ध करून ह्मणतां; ऐशास तुमच्यानें गनीमाई मोडवत नाहीं व गनीमाच्यानेंहि तुह्मांस मोडवत नाहीं. नाहक लौकिक करून घ्यावा. सीबंदीं खालें यावें. मुलुकाचा पाटावरवंटा होईल. बरा दिसत नाहीं. ऐसें बहुत प्रकारें परिमार्जन केलें. हें वर्तमान दरबारचें शहरांत आवई फुटली. पांचासाता ठायीं आईकिलें. खरें खोटें कळत नाहीं. बहुतां मुखीं आईकिलें ह्मणून सेवेसी विनंति लिहिली आहे. अबदुल खैरखानाजवळ पांच हजार फौज आहे. त्यामध्यें कांही लोक राजश्री हरी दामोदर याजकडील आहेत व कांही मानाजी निकमाकडील आहेत. राऊत चांगले नाहींत. बारगीर भरतीचा आह ह्मणोन लोक बोलतात. सवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली असे. अबदुल खैरखानहि व्यथेंत आहेत; आरोग्य नाहीं. समाप्त४४ होतील ह्मणोन लोक बोलतात. सेवेसी विदित जालें पाहिजे. हे विज्ञापना. सरकारची कासीद४५ जोडी हुजरून राजश्री मल्हारजी होळकर याजकडे जात होती ते येथें शहाचे चौकीवर आढळली. ते जोडी येक व मल्हारबा कडून कासीद जोडी हुजूर जात होती तेहि येथें चौकस आढळली. येकूण दोन्ही कासीद जोडिया राजे रघुनाथदास यांहीं अटकवून बैसविल्या आहेत, ह्मणोन सरकारचे जासूद दरबारचे बातमीवर असतात. त्यांनी सांगितलें. जासूद बोलिले कीं हे वर्तमान मनोहरपंतास विदित केलें. मनोहरपंत बोलिले कीं दरबारास गेलियावर मनास आणूं. सेवेसी विदित जालें पाहिजे. हे विज्ञापना.