[२९२]                             ॥ श्री ॥        ६ जुलै १७६१.

अपत्यें चिटकोबानें चरणावरी मस्तक ठेवून सा। नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान त।। आषाढ शुद्ध ५ पावेतों मुकाम पुणें येथें यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. दरबारचें वगैरे सविस्तर वर्तमान तीर्थरूपांस तजविजीनें पुसोन सत्वरच यावें किंवा आठाचौ दिवसांनी आले तरी कार्यास येईल ऐसा खुलासा काढून आह्मांस लेहून पाठवणें. त्यास तीर्थरूपांनीं पेशजी पत्र आपल्यास पाठविलेंच आहे. तीर्थरूपांचें मानस आहे कीं तुह्मीं सत्वरींच यावें. दरबारचा कारभार एक प्रकारचा जाला आहे. यास्तव त्यांचें मानस आहे कीं लौकर यावें. राजश्री बाळाजी गोविंद यांस मुजरत पत्रें पाठविलीं आहेत कीं तुह्मीं सत्वर येणें. श्रीमंत राजश्री दादासाहेब व माधवराव सातारियास जाणार. यास्तव आह्मी साहित्याबद्दल जेजूरीस गेलों. टोपी व चार गज सकलाद हिरवी गहिरी रंगाची पाठवणें. त्याजवरून सकलाद गज चार एकूण किंमत आठरा रु॥ व टोपी एक पाठविली आहे. प्रविष्ट होईल. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंति. श्रीमंत राजश्री चिटकोपंतनाना साहित्याबद्दल जेजूरीस गेले. मजला जाब लेहून देणें. ह्मणून सांगितलें. त्याजवरून पत्र लिहिलें आहे. श्रीमंत उभयतां सातारियास जाणार. त्यास, ताराबाईस बरें फार वाटत नाहीं. यास्तव दोन दिवस राहिले. एकादो दिवसांनी मुहुर्त आहे. जातील. श्रीमंत राजश्री नानाचे मनांत होतें कीं पंढरपुरास जाऊन दोन महिने राहावें. त्यास राजश्री सखारामपंताकडे गेले होते. निरोपाचा विचार पुशिला. निरोप देईनास, यास्तव राहाणें जालें. दरबारीं कारभारी सखारामपंत व राजश्री बाबूराव फडणीस हे उभयतां आहेत. उभयतांचें चित्त एक जालें आहे. राजश्री सखारामपंत करार ह्मणतात. राजश्री दादा द्यावें ह्मणतात. देणें अद्यापि बंदच आहे. द्या द्या वरीच चालतें. कमाविसदारांस रसदेचें मागणें लाविलें आहे. राजश्री नारो शंकर यांचा पहिला करार जाला होता तो आपल्यास कळलाच होता. अलीकडे त्यास ह्मणतात कीं, आह्मास कर्जवाम फार जालें आहे. सबब रसद मागतात. ते कांहीं कबूल होत नाहींत. शेवट कसा होईल तें पहावें. राजश्री शिंद्याकडील मामलत आहे ती तुकोजी शिंदे याचा भाऊ महादजी शिंदे आउंधकर याचे नांवें सरदारी करावी, राजश्री रामचंद्र गणेश दादासाहेबांपाशी होते. त्यांस दिवाणगिरी सांगावी, ऐसे घाटत आहे. शागीर्दपेशा व इमारती व कामाठी व हशम यांचा बंदोबस्त होत आहे. कार्याकारण ठेवितात. वरकड दूर कांही केले, कांही करणार. इमारती तुर्त चालत नाहींत. सर्वाध्यक्ष उभयतां आहेत. दादांचें व गोपिकाबाईंचें व दोघे कारभारी यांचें एक चित्त एकत्र जालें आहे. पुढें कसकसें चालेल पहावें. राजश्री आबा व नाना पुरंधरे येथेंच आहेत. तेहि सातारियास जाणार. सातारा गेलियानंतर पुढें कसकसा मजकूर होईल तो पहावा. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. मागें जे मुत्सदी होते त्यांची चाल कांही विशेष दिसत नाहीं. शिलेदारांस व खर्चास ऐवज पाहिजे यास्तव कर्जपट्टी करावी ऐसी वार्ता आहे. विदित जालें पाहिजे. श्रीमंत सातारा जाणार. तिकडे कितेक दिवस लागतील तें पहावें. श्रीमंतांचें मानस आहे कीं लौकरींच यावें, मग पहावें. सेवेसी विनंति. पीरखान प्यादा याजब।। नवी सकलाद चार गज व जुनी टोपी नानांची पाठविली आहे. पावेल. यादीचे कामास माणसें प।। आहेत. कळावें. सेवेसी विनंति.