[८]                                                                ।। श्री ।।                                                               ९ अक्टोबर १७५१

 

श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

विनंती सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेऊन स।। नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपाद्दष्टीने सेवकाचे वर्तमान त।।छ २९ माहे जिलकाद पावेतों मे।।शहर औरंगाबादेस यथास्थित असे. स्वामींची आज्ञापत्रे छ १८ जिलकादची कित्ते दोन ती छ २४ जिलकादी प्रविष्ट झाली. तेथे आज्ञा की खजाना देविला ह्मणतात आण देत नाही याचा विचार काय? महाराव जानोजी जसवंत निंबाळकर३५ यांस निरोप देणे लागतो. खराखुरा खजाना देवविला असिला व पदरी पडत असेल तर तैसेच लिहिणे. म।।रनिलेस निरोप देऊं. खानासीं इतकेंच बोलणें कीं येथून खजाना रवाना जाल्यास पुढील स्नेहांत मजा पडेल. देतों देतों ऐसें मात्र बोललां आण मातबर इकडून येईल तेव्हा द्यावा ऐसें मनांत असिलें तर तें उत्तम नाहीं. खजाना येऊन पावलियावर अगर तेथून रवाना जालियावर सर्व जावसालांत जीव पडेल. लौकिक विरुद्धचा वारेल. विठ्ठलराव येऊन पावले नाहीत ह्मणोन तपशिलें स्वामीची आज्ञा. आज्ञेप्र।। अर्थ सविस्तर खानास विदित केला. खान बोलिले की खजाना देतात यांत संदेह नाहीं. परंतु अद्याप निशा करून देत नाहीं. यास्तव राजाजीस पैगाम पाठवून निशा करून देववितां. ब-हाणपुरास तीन लाख रुपये देवविले ते पदरी पाडिले की काय ह्मणोन खानांनी सेवकास पुसता उत्तर दिलें कीं बराणपुरीं तीन लाख रुपये देवविले. त्याजपैकीं एक लक्ष चाळीस हजार रुपये मात्र वकिलास मोजून दाखविले. परंतु पैका अबदुलखैरखानाचे हवेलींतच आहे. वकिलाचे तावडीला पैका जाला नाही. खानांनी स्वामीचे आज्ञेप्रे।। अर्थ राजाजीस नथमल वकिलाबराबर सांगोन पाठविला. सेवक खानाजवळ या गोष्टीचा मजकूर नित्य करितो की जासूद जोडी रवाना व्हावयास खोटी आहे. आपण सांगतील त्याप्रे।। लेहून पाठवितो. या मजकुराचा जबाब जलद आणविला आहे. छ २७ जिलकादी खान सेवकास खलबतात बोलिले की खजना देतात; परंतु थोडकीसी दिकत आहे. तो मजकूर उदैक सांगो. छ २८ जिलकादीखानाकडे गेलो. मजकूर पुसता बोलिले की खजाना खामखा देतात. दिकतीची गोष्ट आहे ते तुह्माजवळ सांगतां येत नाहीं. परंतु तुमची निशा झाली पाहिजे याजकरिता बोलतो. परंतु तुह्मी हे गोष्ट कोणाजवळ न३६ बोलावी व रावसाहेबांस लेहून न पाठवावी. खुलासा हाच की येथे खजानेयात पैका३७ नाही. इतकी दिकत. खजाना आणविला आहे. चहू पांचां रोजांत येऊन पोचेल. आलियावर निशा करून देतील. पांचा सातां रोजांची दिरंगी खजानेयाचे येण्याकरिता मात्र आहे. याजकरिता तुह्मी रावसाहेबास मोघमच लिहिणे की पांचासाता रोजांत खजाना देतात, संशय नाही. हे हलकी गोष्ट न लिहिणे ह्मणोन बोलिले ते वर्तमान सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. मग त्यांचा अंतर्भाव काय आहे तो कळत नाही. बहुधा ऐवज नसेल हेच खरे. येथे सिबंदीकरिता बहुत गवगवा आहे. खान बोलत होते की रावसाहेबांचे डेरे जालेयाचे वर्तमान येथे आले आहे. आता नवाबहि लवकरच कूच करणार आहेत. सेवेसी विदित जाले पाहिजे. छ सविसांचे रोजी रविवारी फिरंगी यांचा सण होता. फरंगी येथे आमखासांत राहतात. रविवार प्रात:काळी फरंगी यांनी वीस एकवीस तोफा सोडिल्या. तद्नंतरे सर्व फरंगी पैठण दरवाजाबाहेर बाग आहेत त्या बागांत गेले होते. तेथे आपला सण केला. नृत्यांगना नेल्या होत्या. संध्याकाळचे समयी राजे रघुनाथदासहि नृत्य पहावयास गेले होते. तिकडून दीड प्रहर रात्रीस मोठे जुलुसाने फरंगीयांसह वर्तमान शहरात आले. सेवेसी विदित व्हावयाकरिता विनंति लिहिली आहे. दुसरी उडवार्ता ऐकिली की राजश्री मल्हारबा होळकर फौजसुद्धा झांसीस३८ दाखल जाले. ब-हाणपुरी खजाना अटकाविला हे वर्तमान ऐकोन बहुत संतप्त आहेत. जरीदा होऊन ब-हाणपुराचे पारिपत्यास येणार ह्मणोन वर्तमान आढळले. स्वामींचे सेवेसी कासीदही आले आहेत. आढळले वर्तमान सेवेसी विनंति लिहिली आहे. सत्य मिथ्य कळत नाहीं. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. दमाजी गाईकवाड यांचा भाऊ केदारजी ह्मणोन कोणी गुजराथेत आहे. त्याणे व बाणराव दि।। मजकूर या दोघांनी फौजबंदी बहुत केली आहे३९. ह्मणोन येथे दाट अवई आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.