[२९१] ॥ श्री ॥ ४ जुलै १७६१.
तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सवेसी:
आपत्यें हरीनें साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल त॥ आषाढ शुद्ध द्वादशी जाणून स्वकीय लेखन आज्ञा केली पाहिजे. पुण्याहून माणूस आलें त्याजबरोबर राजश्री त्रिंबकपंत कारकून तेथें आहे त्याचें पत्र आलें. राजकीय वर्तमान लिहिलें आहे. तें पहावयासि पाठावलें तें पहावें. जबानी प्यादियाबरोबर निरोप आला कीं निजामअल्लीपासून वकिलाचा सांडणी स्वार आला. जप्ती करावयाबद्दल तेथून रवानग्या जाहल्या. त्या प्रांतीं जाहल्या. इकडेहि लवकरीच येणार. याजकरितां सावध असावें ह्मणोन निरोप आला, त्याजवरून आपणास लिहिलें आहे. मी उद्यां संध्याकाळ पावतों येतों. अजमास हिशेब कांहीं समजाविला. कांहीं आज समजावितों, आणि उद्यां येतों. बहुत काय लिहिणें. हे विनंति.