[७] ।। श्री ।। ४ अक्टोबर १७५१
श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-
विनंति सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेऊन स ।। नमस्कार. कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपाद्दष्टीने सेवकाचे वर्तमान त ।। छ. २४ माहे जिल्कादपावेतो मे ।। शहर औरंगाबादेस यथास्थित असे. स्वामीची आज्ञा पत्रें छ १४ मिनहूची खासदस्तुराची दोन-येक राजश्री शामजीपंत यांचे नावाचे व येक सेवकाचे नावाचे सादर जाली, ती छ १९ मिनहूस दोनप्रहरा प्रविष्ट जाली. स्वामीचे आज्ञेचा अर्थ सविस्तर विदित जाला. स्वामीची आज्ञा कीं किंबहुना हे पत्र खानास दाखवणे, आज्ञेप्रमाणे शामजीपंत व सेवक ऐसे खानाकडे जाऊन दोहो आज्ञापत्रांचा अर्थ सविस्तर खानास अवगत केला. खान बोलिले की आह्मास समजाविले याप्रमाणे तुह्मी उभयतां जाऊन राजाजीस समजावणे. इतके बोलोन नथमल वकील यांस समागमे देऊन राजाजींकडे पाठविले. छ २२ मिनहूस तृतीय प्रहरी नथमल व आह्मी उभयतां सेवक ऐसे राजाजीस भेटलो. खलबत जालें. खलबतात स्वामींचे आज्ञपत्राचा अर्थ सविस्तर राजाजीस निवेदन केला. पत्रे दाखविली नाही. राजाजी बोलिले की खजानेयाकरितां कलह प्राप्त जाला ह्मणोन श्रीमंत आज्ञा करितात. तर खजाना आह्मी द्यावा हे गोष्ट आह्मास योग्य नाहीच. अबदुल खैरखानाजवळोन बेज्या गोष्ट जाली. आह्मास गोष्ट कळताच आह्मी कोणे वजाने त्यांस ताकीद लेहून पाठविली आहे हें वर्तमान बाळाजीपंतास जाहीर असेल. या गोष्टीची लाज आह्मास जाली आहे. आह्मी न बोलता खजाना देत आहो. तीन लाख रुपये तो ब-हाणपुरी देवविले. राहिले दोन लाख चौतीस हजार ते उदैक येथे देववितो. तोंडाने देतो ह्मणावे आण देऊ नये हे गोष्ट सहसा घडणार नाही. पाच लक्षांचा विषय तो काय? याजकरिता श्रीमंती संशय मानावा ऐसे नाही. श्रीमंत आज्ञा करितील तर सहज पांच लक्ष रुपये पाठऊं सकतो. तेथे खजाना न देऊ हे गोष्ट कसी घडेल? या गोष्टीवरून कलह वाढावा ऐसे नाही. श्रीमंतांस अबरूची गरज आण आह्मास आपले अबरूची शरम आहे की नाही? गोष्ट अनुचितच जाली आहे. श्रीमंती आज्ञा केली की दिल्लीहून बाहालीची सनद आलियावर आह्मी जागीर देऊ ऐसे आमचे वचन गुंतले आहे. तर हे गोष्ट यथार्थ व श्रीमंताचेहि वचन आह्माजवळ गुंतले आहे की मोगलाई व गनीमाई दोन नाहीत. एकच आहेत. हा आमचा करार. याजकरिता जे आहे ते श्रीमंतांचेच आहे. येकात्मतेस पडदा नाही. श्रीमंताचे कमाविसदार आहेत. त्याजप्रमाणे आह्मी कमाविसदार आपल्यास समजोन हिशेब रुजू करितो तो श्रीमंती पाहावा. आमचे खर्चाचा सरंजाम करून द्यावा. राहिला ऐवज त्यांच्याच आहे. दुसरा पदार्थ नाही. वरकड हरएक गोष्टीने अडचण जालियास मग आमचा उपाय नाही. रघोजी भोसले यांस आमचे सिफारसीवरून जागीर दिली, आण आह्मास साफ जाब द्यावा हे उचित की काय? ह्मणोन श्रीमंत आज्ञा करितात. तर रघोजी येथे यावा हे खाईष आम्हास नव्हती. श्रीमंतीच त्यास पाठवून दिला. येविषईंची श्रीमंतांची पत्रें आहेत. रघोजी येथे आला त्यास आह्मी पुढे आणावयासहि कोणी पाठविला नाही, व वरचेवर त्याची मुलाजमातहि करविली नाही. पंधरा दिवस पडोन राहिला होता. मग त्याची मुलाजमत जाली. दाराजवळ भिकारी भीक मागावयास येतें त्यास मूठभर अन्न लागते. त्या प्रकारे रघोजीचा३२ विचार जाणोन त्यास जागीर दिली. ते त्याची अजिजी जाणोन दिली. त्याचे रहस्य कोणते गोष्टीने राहिले हे श्रीमंत जाणतच असतील. असे असोन आता आज्ञा करितील तर त्याची जागीर जप्त करावयास विलंब आहे ऐसे नाही. खजाना खर्च करून फौज ठेविली ह्मणोन श्रीमंतांची आज्ञा३३. तर कितेक काजकामें कर्तव्य आहेत तीं श्रीमंताचे सेवेसीं विदितहि असतील. यास्तव फौज जरूर ठेवावीच लागली. अबदुलखैरखान बिघाडाची मसलहत देतील ह्मणोन तर खान म।।रनिलेने बिघाडाची मसलहत काय देणे आहे? तेथे सर्वांचा भाव की जानबास हलके पाडावें, ह्मणोन श्रीमंतांस भास जाला. तर जानबास येथून आह्मी होऊन पाठविले नाही. श्रीमंती खाहीष करून बोलाविले ह्मणोन गेले. जानबावरच येथून सारा यख्तीयार आहे ऐसे असता श्रीमंतांकडून पृथक् पृथक् पैगाम येतात, तेथे पैगामात विपर्यास पडतो. आह्मी जाबसाल कोणाजवळ करावा? जानबास फिकें पाडावे हे गोष्ट आह्माकडून नाहीं. आताचं तुह्मी श्रीमंतांचे आज्ञापत्राचा अर्थ सांगितलांत आण आजच महाराव यांचे पत्र गोविंदराव वकिलास आले. त्याणें आह्मास दाखविलें. त्यामध्ये अभिप्राय भिन्नच आहेत. यास आह्मी काय करावे? एकाजवळ जाबसाल असेल तर बोलावे. याजकरिता जानबाचे फिकेपणाचा अर्थ तिकडूनच आहे. आह्माकडून नाही. इतकी बोली जाहाली. बाळाजी महादेवहि आह्मा उभयतांसमागमें गेले होते. परंतु खलबतसमयी बाहेर बैसले होते. सदर्हूप्रमाणे खलबतात बोली जालियावर मग राजाजीनें बाळाजीपंतास बोलाऊन सांगितले की तीन लाख रुपये तों ब-हाणपुरी तुमचे पदरी पडिले असतीलच. राहिले दोन लाख चौतीस हजार रुपये उदैक तुह्मास सावकाराजवळोन निशा करून देववितो. इतके बोलोन आह्मा त्रिवर्गास रुखसत करून आपण मिसला पहावयास गेले. तदनंतर आह्मी सेवक नसीरजंग याजकडे येऊन तेथील मजकूर सविस्तर निवेदिला. नथमलहि आले होते. खान बोलिले की राजाजीचे जाबसाल जे जाले आहेत ते रावसाहेबांस लेहून पाठवणे ह्मणून बोलिले. त्याजप्रमाणे जाला मजकूर सविस्तर सेवेसी विनंति लिहिली आहे. अबदुलखैरखान व महमद अनवरखान काल गुरुवारी छ २३ मिनहूस दोनप्रहरां शहरास आले. हरसुलाअलीकडे सराई आहे. ते सराईजवळ शहराचे महमुदी बागापलीकडे त्यांची फौज उतरली आहे. हरदोखान म।।रनिले xxxx दाखल राहिले आहेत. शहरात आले नाही. अबदुल खैरखानाबरोबर फौज पाच हजार स्वार आहेत. त्यामध्ये चारशे करोल आहेत. हत्ती तीन आहेत, निशाणाचा येक व नगारेयाचा येक, व खासा खान म।।रनिलेचे स्वारीचे हौदेयाचा येक, ऐसे तीन आहेत. बाणाचे कौच्यांचे उंट सात व रहकले बारा व दमानची सवाशे आहेत. महमद अनवरखानबराबर स्वारीचा हत्ती एक व स्वार चाळीस व पंचवीस करोल आहेत. खान मानिले डेरेदाखल जालियावर राजे रघुनाथदास भेटीस गेले होते. अबदुलखैरखानांही दोन घोडे निळे व दहा खोन पारचे३४ राजाजीस नजर केली. पैकी एक घोडा व पाच खोन पारचे घेतले. महमद अनवरखानांनी दोन घोडे व काही वस्त्रे नजर दाखविली. त्याज पे।। एक घोडा व वस्त्रे घेतली. तदनंतर राजे शहरात आपले हवेलीस आले. खान म।।रनिलेची फौज बाळाजी महादेव यांनी पाहिली. ते फौजेचा म।।र बाळाजी महादेव येथे सांगत होते की तिसा रुपयांची किमतीपासून पाचशे रुपयांचे किमतीपावेतो घोडी आहेत. बहुतकरून खोगीरभरतीच फार आहे. सेवेसी विदित व्हावयाकरिता विनंति लिहिली आहे. काल संध्याकाळी छ २३ मिनहूस खानकडे गेलो होतो. तेथे खानाजवळ मोगलिये आले होते. त्याजमध्ये एक मोगल अबदुखैरखानास भेटोन आला. तो खानाजवळ पारसी भाषेत बोलत होता की खान म।वरानिले बहुत मुमूर्षु आहेत. आह्मी भेटावयास गेलो तेव्हा निद्रिस्त होते. आह्मी गेलियावर उठोन बैसले. नेत्र पीतवर्ण जाले आहेत. तबियत बहाल नाही. दोन तीन दिवस तबियत बहाल होतपर्यंत नवाबाची मुलाजमत करीत नाही. समाधान जालियावर नवाबाची मुलाजमत करतील ह्मणोन बोलत होता. सेवेसी विदित व्हावयाकरिता विनंति लिहिली आहे. राजश्री मोरोपंत महायात्रेस परवांचे दिवशी येथून रवाना जाले. संन्यास द्यावयाचा विचार होता परंतु राहिला. सेवेसी विदित जाले पाहिजे. नासरकुलीखान मोगल मातबर येथे आहे. त्याणें कमाणगराचे चौधरी यास काही चीज विकावयास दिली होती. रुपये न पावले ह्मणोन त्याचे घरास चौकी पाठविली. चौधरी सांपडला नाही ह्मणोन त्याचे बायकोस नेऊन कैद केले आण घरी चौकी बसविली. हे वर्तमान राजेयास विदित जालियावर राजाजीनें बकशीस आज्ञा करून नासरकुलीखान यास बेअब्रू करून पादचारी नेला. पालखीत बैसो दिला नाही. नेऊन फजित करून सोडिला. नेते समयी दोन चार माणसे जखमी जाली. हंगामा जाला होता. सेवेसी विदित व्हावयाकरिता विनंति लिहिली आहे. सेवेसी श्रुत जाले पाहिजे हे विज्ञापना. राजश्री शामजीपंत येही सेवेसी विनंतिपत्र लिहिले आहे त्याजवरून विदित होईल, हे विज्ञापना.