[२९०] ॥ श्री ॥ ४ जुलै १७६१.
वडिलाचें सवेसी सा। नमस्कार विनंति येथील क्षेम त।। छ १ जिल्हेज पावेतों आशीर्वादेंकरून पुणेंत सुखरुप असो. आपण (पत्र) पाठविलें कीं सांप्रत कारभारी कोण? त्यास, र॥ सखारामपंत, बाबूराव फडणीस. वरकडहि आहेत. परंतु दोघे तुर्त कामकाजाचा बंदोबस्त करितात. श्रीमंत उभयतां मंगळवारी निघोन सातारेस जातात. मंगळवारी जेजूरीस मु॥, बुधवारी दहीगांव, गुरुवारीं माहुली, येणेंप्रमाणें मु॥चा ठराव जाहाला आहे. तेथूनहि लवकरच येणार. तीन दिवस तेथें राहावें, मागती यावें सारखा तुर्त येथें निश्चय आहे. तीर्थरूपांनी पंढरीस जावयाचा छंद धरला आहे. आपण लवकर यावें. चार वरसें जाहालीं वडील अवघडांत घालून गेले. ज्या दिवशी भेट होईल ते समयीं सर्व काळजी हारवेल. तुर्त येथें स्वारीचा व दानधर्माचा समय, याजमुळें माणसांस एकदोन दिवस अधिक लागेल. हिशेबाच्या एकदोन कलमांचा तफावत लिहिला; तर आपण एकादो दिवशीं येतील. सर्व येथें नीट होईल. तीर्थरूप नाना खासगत यादी समजावयाचे व किरकोळ सरकारी हिशेब समजावणें, सरकारकून कारखाने तमाम मना होता, त्याहि यादीबिदी अवघा वेळ नेऊन, सरकारांत दाखवून, करारमदार करून नवे घ्यावे. तेणेंप्रें॥ खर्चवेच करावा. पागा अवघ्या मोडून पांचपांच प्यादे करावे. कामाठी देखील दूर करितात. दोनचारशें कामाठी कार्याकारण ठेवावे. असे नानाप्रकारे बंदोबस्त मांडिले. चिरंजीव सौभाग्यवती बगाबाई आणविली तर तिकडून अवघी महिना पंधरा दिवशीं आणावयाची आहेत. मग तातड काय ? सेवेसी. हे विनंति.