[२]                                                                ।। श्री ।।                                                              २ जुलै १७५०*

 

सेवेसी विज्ञापना: देशीं मल्हारबांनी व आपणाकडील लोकांनी किल्ले घेतले. मल्हारबा मजलदरमजल सेंधव्यास आले. मोगलाकडे त्याचें राजकारण आहे. त्याच्या सूत्रे किल्ले घेऊन हिंदुस्थानास जातात. इकडे मोगलानें सल्ला बिघडावा. रघोजी भोसल्यास मोगलाने दबवून राखिलें. पुढें खामखा सैदलष्करखान, जानवा यांच्या मनांत एकवेळ उत्पात करून दिल्ही जहागीर फिरोन घ्यावी अथवा कांही तरी आपलेंसें करावें हा मनसबा परस्परें कळों आला. दुसरें सांप्रत जायाप्पाचे कागद येतात त्यांत मल्हारबाची व त्याची चित्तशुध नाहीं; वोढ करून, स्वतंत्र जाऊन उत्पात करावा ऐसें दिसतें. याचप्रमाणें मल्हारबाकडीलहि पत्रें येतात त्यांतहि भाव हाच आहे. जायाप्पाचें केलें शेवटास न जावें. ऐसें परस्परें स्वजन विरोध व परराज्यांतील कलहाचें मूळ अजीपासूनच लागलें आहे. आह्मी भोड गांवास आलों तों राघो लक्षुमण मल्हारबाचे सूत्रें गंगोबांनीं पाठविले. त्यांनी कित्येक मजकूर सांगितले. त्यांत सारांश पाहतां जायाप्पाच्याच पेचाचा मजकूर आहे. आह्मांस येथून नेऊन त्यास दबवावें; आपली मातब्बरी हिंदुस्थानांत आहेच; आमची भेटी झाली, एकत्र झालों ह्मणजे खावंद हातास आले; सर्व गुंता उरकला; पुढें चित्तास मानेल तो मनसबा केला तरी कार्यास येईल; ऐसें दिसोन आलें. आह्मीं आपले जागा विचार पाहतां केवळ जायाप्पाचें कार्य नच व्हावें; मल्हारबाकडे होऊन त्यांसच खालें आणावें तरी त्याचेंहि स्वरूप राहात नाहीं, व सांप्रत देशींहि पेच मातबर. मोगलाच्या विचारें पहातां हे उभयता सरदार देशीं असावे ह्मणजे मोगलाशी सालजाब होऊन बंदोबस्त होईल. दुसरे दोघांचा पेच आहे. तोहि वारेल. जायाप्पास दुराभिमान रामसिंगांचा१० आहे. तरी जशी स्वामीची मर्जी असेल तसें शेवटास न्यावें लागेल. यासाठीं तूर्त राघो लक्षुमणास सांगितलें कीं मल्हारबांनींचार मजली माघारें यावे; आह्मी तापीतीरास येतों तेथें भेटी व्हावी; जायाप्पासहि बोलावणें पाठवितों; हरप्रकारें मल्हारबास सांगावें आणि तीर्थरूपाकडे घेऊन जावें; दोन महिन्यांत इकडील बंदोबस्त होऊन पुढें जो मनसबा करणें तो करावा. याप्रमाणें बोलोन आर्जीच पत्रें त्यांजकडे रवाना केलीं. आह्मी रनाळ्या११ आसपास चार मुक्काम करून राहातों. भेटी होतील. चार गोष्टी बोलोन तहास आणावें. स्वामींनी पत्र गंगोबास लिहिलेंच आहे. त्याचअन्वयें दुसरीं पत्रें गंगोबास व मल्हारबास ल्याहावीं कीं चिरंजीव पाठविले आहेत; इकडे दोन महिने राहून एकदा भेट घेऊन जावें. ह्मणोन याअन्वयें करून एकामागेंएक दोन चार पत्रें ल्याहावीं. त्याचप्रमाणें जायाप्पासहि ल्याहावीं. मल्हारबा खामखा येतीलसें दिसतें. परंतु जायाप्पाची मर्जी कळत नाहीं. स्वामींनीं त्यास क्षेपनिक्षेप ल्याहावें. ह्मणजे उभयतांसहि घेऊन येऊं. जर जायाप्पा न आले तर मल्हारबा कांही अगोदर येणार नाहींत. ऐसें आहे. तरी जायाप्पास पत्रें परस्परेंहि पाठवावीं व आह्मांकडेहि दोन तीन पाठवावीं. ऐसें आहे. सारांश, इतका अटाहशा न करावा. परंतू तूर्त हे दोघेजण परस्परें कलह करून कोणी एक तरी बुडतो. दुसरें आपणास देशीं पेंच मोगलाचा. दोन्हीहि गोष्टी दोलतेस पेच पडावयाच्या आहेत. तुर्त आढळला मनसबा टाकून यावें हें कामाचें नाही. यासाठी आठपंधरा दिवस तापीतीरें आहों. पत्रें वरचेवरी पाठवावीं. साहित्य करावें. इतकें करून कदाचित् दोघांतून एक ना ऐके तरी कसें करावें तें सविस्तर ल्याहावें. इकडे होईल तें वर्तमान वरचेरवी लेहून पाठवूं. तेथून माणसें पाठविणें तीं जलद पाठवीत जावीं. दोघांसहि चार चार पत्रें देशीं येणें ह्मणोन आह्माकडे पाठवावीं. ह्मणजे आह्मीं याचा उपर त्यास, त्याचा उपर यास दाखवून घेऊन येतों. नाही तरी मोगलासीं तो* कलह होईलसे वाटतें व हे मदतीस येत नाही.

रघोजीबावाचा यंदां संशयच आहे. आह्मी दोघांमध्यें शिरोन दोघांसहि परस्परें उपर दाखवून आणितों. काम मातब्बर. पुढें हातचें जाईल. हे भांडलें तरी मग दोघांचा एकच होईल. तें कामाचें दिसत नाहीं. यास्तव याप्रमाणें करतों. उदैक कुच करून प्रकाशाकडे तापीसुमारें तीन कोस जाऊं. मल्हारबा आठा दिवशीं तेथें येतील. आमची त्यांची भेटी होत्ये तो आपले कागद यावे कीं दादा बराबर खामखा येणें. पुढें घरचेदारचे किल्याकोटाचे सारेच पेच एका जागा झाल्यावरी वारतील. बहुत काय लिहिणें. हे विनंति. चहूं मजलीवरी मल्हारबा असतां व त्यांणीं बलाविलें असतां न जावे तरी तोहि शब्द कीं आपल्यामध्यें गृहकलह असतां समजावीस कशी न केली. यास्तव आठपंधरा दिवस गुंता पडेल. हे विज्ञापना.


पै ।। छ ८ साबान.

 

*२ जुलै १७५०