[२८५] ॥ श्री ॥ २४ जून १७६१.
सेवसि जोती गोपाळ३२८ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति विज्ञापना येथील
वर्तमान तागाईत जेष्ठ व॥ ५ मिती हिंदुस्थानी स्वामीचे कृपावलोकनेंकरून सेवकाचें यथास्थित असे. विशेष. स्वामीनीं आज्ञापत्र पाठविलें तें चैत्र शु॥ १४ श्री काशींत पावलें. त्याजवरी वैशाख व॥ ५ पंचमीस निघालों ते अयोध्येकडून ब्रह्मावर्तास आलों, तों तेथें अमल होऊन आठ दिवस झाले होते. तेथून वैशाख शु॥ ११ गुरुवारीं उंबरगडास दाखल झालों. आपले मंडळींची व श्रीमंत राजश्री बाबांची भेट झाली. माणसें श्रींतच ठेविलीं. सडे एक माणूस व तट्टू असे आलों. सोबती काशीकर ब्राह्मण पांच सात होते, ह्मणून मार्गीं निभाव झाला. अंतर्वेदींत बहुत करून अमल बसला आहे. कड्याकडे अद्यापि दंगा आहे. फर्काबादेपलीकडे रोहिल्यांची फौज आली आहे. ह्मणून वर्तमान आहे. व जाट व गंगोबातात्या मथुरेजवळ उतरून कौलास आले हेंहि वर्तमान आहे. नवाब सुज्यातदौला काशीस दाखल झाला. शहाजादाहि पाटणियाहून दोन मजली आलीकडे आला आहे. सुजातदौले व त्याची भेट होणार. त्यास, त्यांजमध्यें कांहीं विषम पडलें. ह्मणून वर्तमान आहे कीं मिरजाकोचक पूर्वी प्रयागीं होता तो शहाजादा याजकडे गेला होता. त्याजवरी सृज्यातदौला यानें तो तिकडे गेलियावर प्रयाग घेऊन त्याचीं माणसें धरलीं, ह्मणून तो शहाजाद्यापासून अयोध्येस आला. त्याजलाहि धरून बंदीस घातलें. त्यास हल्लीं दिल्लीकडून आलियावरी त्यास जिवें मारिला. त्याचीं मुलें बायका अशीं सातजण मारून टाकली. याकरितां शहाजादा यास विषाद आला आहे. पुढें जें होईल तें होवो. आज तागाईत राजकीय वर्तमान या प्रांतीं ये रीतीचें आहे. राजश्री मल्हारराव होळकर सुभेदार माघारे फिरले, ह्मणून वर्तमान आहे. जानोजी भोंसले सागर प्रांतास आले होते, तेहि मल्हारबा देशास गेले असें वर्तमान ऐकून नागपूराकडे गेले. बुंधेले यांचा सला मात्र करून देऊन गेला. सल्याचा करार करून हिंदुपतराजे यांनीं बाळाजीपंतास पत्र लिहून दिलें कीं तुमचा व आमचा पूर्ववत् प्रमाणें सलुख. कळावें. गुरसराई व कोच या प्रांतीं गव्हारांनीं द।। केला आहे. तूर्त या प्रांतीं गंगाधरतात्या मात्र आहेत. मथुरेजवळ उतरून अंतरवेदींत आले ह्यणोन खबर आहे. काय होईल तें पहावें. सेवेसि श्रुत होय. हे विज्ञापना.