[२८६] ॥ श्री ॥ ६ जुलै १७६१.
स्वामींचे सेवेसी सेवक त्रिंबक बाबूराव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. विशेष. पीरखानाबरोबर पत्र पाठविलें तें पावले. बारा हजारांच्या हुंड्यांचा ऐवज गणेशपंतास पाववून जाब पाठविला आहे. आह्मांबरोबर हुंडी सहा हजारांची तेहि सकारली व नक्षा रुपये वीस हजार त्याची याद अलाहिदा आहे. यावर दरबारचें वर्तमान. श्रीमंतांस देवआज्ञा झाली हें तों जगप्रसिद्ध कळलेंच असेल. मरणाचे पूर्वी दोन दिवस पर्वतीसच होते. तेथेंच मृत्यु आला. तेथें मृत्यु होतांच शहरची बंदोबस्ती केली. जागा जागा दहा दहा वीस गाडद्यांच्या चौक्या ठेवून वाड्याभोंवते हजार बाराशें गाडदी चक्की ठेवून बंदोबस्ती केली. मंगळवारचे दिडा प्रहरा रात्रीस. दुसरे दिवशी बुधवारी अग्नि दिला. परंतु ते दिवशी शहरात मोठा आकांत झाला. ईश्वरजीस करणें कीं तशामध्यें कोण्ही परसैन्य नव्हतें; नाहींतर मोठा प्रळय झाला असता. इतकें असतां जो आंग-या३२९ कैदेमध्यें आहे, त्याणें इम्राहिमखां गारदी याचा भाचा चाकरीचे उमेदगारीमुळें सात आठ हजार गारद्यांनिशीं आला आहे, त्याणें श्रीमंत सावध असतांच पैगाम केला होता की याचा काळ होतांच तूं व आपण मिळून शहर लुटावें, आणि गर्दी करावी. ऐसा पैगाम होतांच तो इकडे काल होयास (झाले). आणि आंग-यानें त्यास पत्र पाठविलें कीं आतां हे वेळ आहे. गारदी व तुह्मीं येऊन पोहोंचणें. त्यानें तें पत्र बजिन्नस नेऊन श्रीमंत दादासाहेबांस दाखविलें त्यावरून गारदी याजवर बहुत मेहेरबान झाले, आणि आंग-यावर आणखी चौकी मजबूत गारदियांची ठेवून बंदोबस्ती केली. आणखी जीवनराव वकील याणें मोगलास पत्रें पाठविलीं होतीं तीं धरलीं, कीं तुह्मीं या वेळेस येऊन पोहोंचणें. त्यावरून त्याची अप्रतिष्ठा केली. परंतु कोण्ही देखिली नाहीं. जनआफवा आहे. अस्तु. प्रस्तुत कामकाज कुल याखत्यारी र॥ र॥ बाबूराव फडणीस व र।। सखारामबापू हे दोघेजण आहेत. यांजवेगळें काडीमात्र कामकाज होत नाहीं. श्रीमंत दादासाहेब चौदावे दिवशीं सोमवारचे बारा घटका रात्रीं वाड्यामध्यें मुहूर्त करून दाखल झाले. तोंपर्यंत पर्वतीस होते. श्रीमंत माधोराव व बाईसाहेब बुधवारीं दाखल होणार. पर्वतीस आहेत. पुढें मानस हा आहे कीं साता-यास जाऊन ताराबाईचे विद्यमानें राजापासून पांघरुणें घ्यावीं, व नवे शिक्के करावे, मग पुढें राज्याचा जो बंदोबस्त करायाचा तो करावा. जर ताराबाईनें आपले खुशीनें राजापासून पांघरुणें दिलीं तर उत्तमच आहे. नाहींतर आपला आपणच कार्यभाग संपादून सत्वरच यावें, ऐसा निश्चय आहे. मंगळवारीं जेजुरीचा मुकाम होता. पुढें राजश्री चिटकोपंतनाना साहित्यास सोमवारचे रात्रीं पुढें स्वार होऊन गेले, तों मागें फिरून मनसुबा राहिला. चार दिवस मुकाम झाला. चौदिवसा करार जातील. सारांश कारभार उभयतांकडे आहे. प्रस्तुत मुलकाची बंदोबस्ती यथास्थित करावी. मग महाल वगैरेचे हिशेब मखलाशी ज्या होणार त्या होतील.