प्रस्तावना
(८) भारतवर्ष, पत्रें, यादी वगैरे ३१ त मार्गशीर्ष शुद्ध १२ स दोनप्रहरीं मंदवार दिला आहे; जंत्रींत १२ शुक्रवारी आहे. ह्याच पत्रांत आणीक पांच ठिकाणीं सन, शक, राजशक, तीथ, वार, तारीख वगैरे दिलीं आहेत. त्यांपैकीं कांहींना कांहीतरी मूळपत्रांत किंवा लेखांकाच्या नकलेंत किंवा संपादकाच्या नजरचुकीनें चुकलें असल्यामुळें ह्या तीथवारांसंबंधीं माझे काहींच म्हणणें नाहीं. हें मासिकपुस्तक मोठ्या अव्यवस्थिपणें संपादिले जात असल्यामुळे ह्याच्यांतील आंकड्यांवर विश्वास ठेववत नाहीं.
पत्रांतील व जंत्रींतील फरक दाखविण्याकरितां आणीकहि पुष्कळ दाखले देण्यांत येतील; परंतु, एवढ्यावरच काम भागण्यासारखें असल्यामुळें जास्त विस्तार करीत नाहीं. प्रो. मोडकांनीं इ. स. १७२८ पासून १८९४ पर्यंत जंत्रीं तयार केल्यामुळें ह्या अवधींतील मराठ्यांच्या कागदपत्रांचा अभ्यास करणा-यांस मोठी सोय झाली आहे. जर प्रो. मोडक इ. स. १५०० पासून १७२८ पर्यंत दुसरी एक जंत्रीं छापतील तर त्या वेळच्याहि कागदपत्रांचा अभ्यास करण्याचें एक उपकरण तयार झाल्यासारखें होईल. शहाजी, शिवाजी, राजाराम व शाहू ह्यांच्या वेळची जंत्री अवश्य पाहिजे आहे. तींत दिल्ली येथील जुलुसी सनाच्या तारखा आल्यास फार उपयोग होईल.
ह्या पुस्तकाच्या टिपेंत व प्रस्तावनेत काव्येतिहाससंग्रह, ऐतिहासिकलेखसंग्रह व भारत वर्ष ह्या तीन मासिकपुस्तकांतील कांहीं लेखांचा उपयोग केला आहे. ज्या लेखांचा मला परोक्ष किंवा अपरोक्ष रीतीनें उपयोग झाला आहे त्यांचे सन मी प्रो. मोडक यांच्या जंत्रींवरून ठरवून टाकिले आहेत. ते बरोबर ठरले आहेत किंवा नाहींत हें तपासण्याचें काम इतिहासज्ञांचें आहे.
काव्येतिहाससंग्रहांतील पत्रें व यादी