प्रस्तावना
परंतु, मराठ्यांच्याप्रमाणें टिकाव धरून बसण्याइतका चिवटपणा बुंदेल्यांच्या अंगी नसल्यामुळें स्वराज्याचें बीं त्या प्रांतांत जसें रुजावें तसें रुजलें नाहीं. महाराष्ट्राबाहेरील हिंदुस्थानांतील इतर प्रांतांची ही अशी स्थिति होती. स्वत: त्या लोकांच्या अंगी स्वधर्माचें संरक्षण व स्वराज्याची स्थापना करण्याचे सामर्थ्य नव्हते. तेव्हां ह्या लोकांना यवनांच्या कचाटींतून सोडवून आपल्या अमलाखालीं आणावें व हिंदुधर्माचें व गोब्राह्मणांचे प्रतिपालन करावें असा महाराष्ट्रांतील कर्त्या पुरुषांचा त्यावेळीं विचार झाला. १७२० च्या पुढें मराठ्यांनीं आपल्या सतेचें जाळें जें सर्वत्र हिंदुस्थानभर पसरिलें त्याचें मुख्य कारण हा विचार होय. १६४६ पासून १७९६ पर्यंत कोणताहि महत्त्चाचा तह घेतला असतां त्यांत स्वराज्याचें व स्वधर्माचें कलम नाहीं असें बहुश: व्हावयाचें नाहीं.
मराठ्यांची सत्ता सर्व हिंदुस्थानभर पसरण्यास वर सांगितलेला विचार मुख्य कारण झाला. ह्या विचारानें प्रोत्साहित होऊन मराठ्यांनीं यवनांच्या हातून १७६० च्या सुमाराला बहुतेक सर्व हिंदुस्थान सोडविलें. परंतु सोडविलेल्या प्रांतांत आपली सत्ता कायम करण्यास जे उपाय योजिले पाहिजेत ते १७२० पासून १७६० पर्यंत योजिले गेले नाहींत. खुद्द महाराष्ट्रांत १६४० पासून १७०७ पर्यंत स्वराज्यस्थापनेच्या वेळीं जे उपाय योजिले गेले त्यांचा उपयोग महाराष्ट्रेतर प्रांतांत १७२० पासून १७६० पर्यंत जे मुत्सद्दी झाले त्यांनीं केला नाहीं. स्वराज्यस्थापनेची कल्पना महाराष्ट्रांतील विचारी पुरुषांच्या मनांत जेव्हा प्रथम आली तेव्हां यवनांच्यासंबंधीं द्वेष व स्वधर्मासंबंधीं प्रेम महाराष्ट्रांतील सामान्य जनांच्या मनांत भरवून देण्याकरितां कथा, पुराणें, यात्रा वगैरे संस्थांच्या द्वारें कित्येक पिढ्या प्रयत्न चालले होते. त्यांच्या योगानें महाराष्ट्रांतील लोकमत जागृत झालें व सर्व लोकांची एकजूट बनविण्याचें बिकट कृत्य साध्य होणें शक्य झालें. पुढें शिवाजी महाराजांनीं स्वराज्याची मुहूर्तमेढ १६४६ त रोविल्यावर निराळेंच एक संकट उद्भवलें. तें हें कीं, महाराजांच्या सेवकसमुदायांत म्हणजे मुत्सद्दीमंडळांत व सेनानायकांत परस्पर मत्सरभाव उत्पन्न होऊं लागला व स्वामिहित व देशहित साधण्याच्या कामीं व्यत्यय येऊं लागले (समर्थाचा सेवाधर्म, दासबोध). तेव्हां समर्थांसारिख्या थोर विभूति पुढें येऊन त्यांनीं त्या स्वामिद्रोहरूपी व देशद्रोहरूपी रोगांचें उत्पाटन केलें (सेवाधर्म, दासबोध). आयुष्याची इतिकर्तव्यता काय, स्वामिद्रोह व देशद्रोह केल्यापासून आपलेंच अहित आपण कसें करितों, वगैरे विषयांची चर्चा करून, कुचर सेवकांना ताळ्यावर आणण्यास, सुचर सेवकांची भाक्ति.दृढ करण्यास, लोकांचे विचार सन्मार्गास लावण्यास व राजाला नीतीनें वर्तन करविण्यास, समर्थांसारख्या थोर, विचारी महापुरुषांच्या ग्रंथांचा अत्यंत उपयोग झाला. महाराष्ट्रांत स्वराज्य स्थापण्याच्या कामीं मराठ्यांच्या शौर्याचें व मराठ्यांच्या जुटीचें जितकें सहाय्य झालें तितकेंच, किंबहुना त्यांहूनंहि जास्त, सहाय्य समर्थांच्या उपदेशाचें झालें, राष्ट्रांतील लोकांना दिशा दाखविण्यास असल्या महात्म्यांची आवश्यकता सदा असतें.