[२२५]                                      ।। श्री ।।            ९ आगष्ट १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री मुकुंदपंत स्वामीचे सेवसी:

पोष्य गोविंद बल्लाळ सा॥ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त॥ प्रथम श्रावण वद्य १३ मुक्काम नदी सेगर जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. पठाण फरुकाबादकर कनवजेस हजार स्वार जमा झाला आणि चारशे स्वार बलबेर येथेंहि आहेत. त्याजला तेथून काहाडिलें पाहिजे. नाहीं तर, मागती मुलकांत फिसाद होणार. चार सा रोजांचें कार्य आहे. मी माघारा येतांच, तमाम सरदार माघारे येणार. कोणास नालबंदी पाहिजे; कोणास अर्जबाब; व कोणी आह्मी तेथेंच ते राहणार. असा प्रसंग! जर आह्मीं तपशील लिहावा तर फडनिसास संशय निर्माण होतो कीं हे महिना दोन महिने फिरावयास जातात. हें त्याजला भासतें. आणि येथें लढाईचा प्रसंग दिसतो. त्यास, तुह्मीं व जनार्दनपंत, चिरंजीव बाबा, उमरगडीं एकत्र होणें. कीं पठाणाकडील काम नासो अगर होवो तुह्मीं येणें. तर तैसेंच लिहिणें. अगर आठ रोजांत पठाणाचें पारपत्य करून फौज त्या शहवर ठेवून येणें, नव रोज लागणार नाहीं, तरी तसेंच लिहिणें. हे दोन्ही कार्यास न येत. आह्मीं जाऊंच नये माघारे उमरगडीं यावें तर तैसेंच लिहिणें. सत्वर उत्तर पाठविणें. फौजेचा रंग ह्मणावा तर जर मी उमरगडास चालिलों तर सर्व माघारे येतील. पाय कोणी घेत नाही. पुढें कोणी धजत नाहीं. असें संकट प्राप्त. जर फौज पुढें जाईना तर पठाण कसे दबतात ? आणि जावें तर तिकडे फडणीस श्रमी. याजकरितां दोनी पेंच आहेत. यांत तुह्मी लिहाल तें करून. बलबेर येथें गेलियानें आज नफा आह्मांस कांहीं नाहीं. तूर्त कांहीं मिळणें नाहीं. न गेलियानें त्यांचा फैलाव जालियास तमाम ठाणीं राहणार नाहींत. दंगा होईल. याजकरितां पठाणाचें पारपत्य जरूर पाहिजे. त्यास, याचा जैसा तुह्मी जबाब लिहाल त्याप्रमाणें करून. उत्तर सत्वर पाठवणें. नदीवर आहे. फडणिसांनीं समाधानें आठ रोजांत जाऊन यावें असें लिहिलें तर जाऊन. त्याणीं लिहिलें कीं जाऊ नये तर न जाऊन. उत्तर प॥ सविस्तर चिरंजीव बाबास लिहिलें तें तुह्मीं, फडणीस एकत्र होऊन उत्तर पाठविणें. नदीवर मुक्काम आहे. तुमचे लिहिलेप्रमाणें करून. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंति.