[२२६]                                      ।। श्री ।।            १२ आगष्ट १७६०.

पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः विनंति उपरिः

सुज्यातदौला याचे जमातदार व भाऊबंद बेराजी आहेत. त्यांचे अनुसंधान आलें होतें तें खरें करावयास गृहस्थ पाठविला आहे, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, ठीक जालियावरी लिहिणे. तशी तजवीज लेहून पाठवूं.

सुज्यातदौले याचे मतें जे आपले व नजीबखान यांचे मतें सला व्हावा. हाफीजमहमद व अहमदखान व गाजुद्दीखान हे त्यांत नसावे. ह्मणजे सर्व ठीक करून देऊं. ऐसा यांचा विचार आहे, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, सारेच जवळ आहेत. राजकारणें, वकीलहि येतात. याउपरि ज्यांत सरकारचें काम आणि उपयोग सर्व तेंच घडेल.

जमीदार सारे मिळोन गडबड करावी हा मनसुबा करितात. त्यांजकडेहि पत्रें पाठविलीं आहेत. जाब आलियावरी स्वामीस लेहून पाठवूं, ह्मणोन लिहिले तें कळलें. ऐशास, पक्का जाब येताच लिहिणें. सर्वांस उमेदवार अंतस्ते करणें. कोण्हास न तोडणें आणि प्रगटहि होऊं न देणें. जाणिजे.

अबदाली सुकरतालावरी जाऊन छावणी करील. त्यास, तमाम रोहिले यांस त्याणें सांगितलें की दोन मास आपले घरीं जाणें, बोलावूं तेव्हां येणें. यावरून कोणी दोन हजार, कोणी हजार, असे पार गेले. फैजुल्लाखान व सादुल्लाखान वगैरे कितेक पार गेले, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, सांप्रत शिकंदरियावरी आहे. तिकडे विशेष बातमी वर्तमान येत जाईल तर लिहिणें. जाणिजे.

एकूण चार कलमें. जाणिजे. छ ३० जिल्हेज. बहुत काय लिहिणे. हे विनंति.पे।। छ १५ मोहरम.