प्रस्तावना

भाऊ दिल्लीहून निघाले ते १५ अक्टोबराच्या सुमाराला कुंजपु-यास आले. हें स्थल फार मजबूत असून नाकेबंदीचें होतें. आत समतखान म्हणून अबदालीचा सरदार पांच सात हजार फौजेसुद्धां होता. कुंजपु-याची गढी सोडून डावाडोल होऊन मराठ्यांच्या सैन्याला दमवावयाचा समतखानाचा विचार होता. मराठ्यांच्या सैन्याला अंगावर घेऊन आपण पळत सुटावें व अबदालीनें पाठीमागून येऊन मराठ्यांना कचाटीत धरावें अशी समतखानाची योजना होती (लेखांक २५८). परंतु, बळवंतराव मेहेंदळे व जनकोजी शिंदे यांनी त्वरा करून गढीभोंवती वेढा घातल्यामुळें व समतखानाची दोन हजार फौज बाहेर पळून जात होती तीं वाटेंतच लुटल्यामुळें (लेखांक २५५) ही समतखानाची योजना जागच्या जागींच जिरली. सदाशिवराव आल्यावर मराठ्यांनीं कुंजपुरा १७ अक्टोबरला घेतला व आंतील पांच सहा हजार प्यादा लुटला (टीप ३१६). कुंजपुरा घेतल्यावर भाऊच्या मनांत पूर्वी ठरल्याप्रमाणें सारंगपूरच्या घाटानें यमुना उतरून अबदालीवर जावयाचें होतें. त्याप्रमाणें यमुना उतरण्याकरितां सदाशिवरावानें कुंजपु-याच्या उत्तरेस कुंच करण्याचा घाट घातला; तों अशी बातमी आली कीं अबदाली बागपताजवळ यमुना उतरून अलीकडे दक्षिणतीराला आला. ह्या वेळच्या अबदालीच्या व सदाशिवरावाच्या हालचाली वाचकांच्या स्पष्ट ध्यानांत याव्या म्हणून दिल्लीपासून कुंजपु-यापर्यंतच्या काहीं गांवांचीं अंतरें देणे जरूर आहे. दिल्लीपासून उतरेस यमुनेच्या तीरीं बागपत २० मैल, सोनपत २६ मैल, गणोर ३६ मैल, संभाळकिया ४५ मैल, पानिपत ५४ मैल व कुंजपुरा ७८ मैल आहे. अबदाली बागपतास अक्टोबरच्या २५ तारखेला उतरला व २८ अक्टोबरास गणोरावरून संभाळकियास येऊन पानिपतच्या रोखानें तीन कोस पुढें आला. ह्याच सुमाराला भाऊ कुंजपु-याहून निघून पानिपतास अबदालीच्या समोर येऊन पोहोंचला (लेखांक २६१) भाऊनें कुंजपुरा घेऊन समतखानाला जमीनदोस्त केल्यामुळें व तेथून अबदालीचें तोंड दाबिल्यामुळें अंतर्वेदींतून कोठून तरी बाहेर पडणें अबदालीला जरूर होतें. कुंजपु-याच्या बाजूचे सर्व घाट मराठ्यांनीं धरल्याकारणानें तिकडच्या बाजूला कुच करण्याची अबदालीची सोय नव्हती. दिल्लीस नारो शंकर व सबळगडास सुरजमल जाट असल्यामुळें आणि शिकोराबाद, इटावें, आग्रा वगैरे यमुनेच्या अलीकडील व पलीकडील ठाणीं मराठ्यांच्या ताब्यांत असल्याकारणानें दिल्लीच्या दक्षिणेसहि अबदालीचा पाड लागण्यासारखा नव्हता. दिल्लीपासून कुंजपु-यापर्यंतचेहि यमुनेचे सर्व घाट मराठ्यांच्या हातांत होते. त्यांतल्या त्यांत पानिपतापर्यंत भाऊचा दबाव विशेष होता. पानिपताच्या अलीकडे संभाळकियापासून बागताच्या पलीकडे कांहीं कोसपर्यंत मराठ्यांची लहान लहान ठाणीं होतीं. त्यांपैकीं एखादे फोडल्याशिवाय यमुनेच्या अलीकडे येणें अबदालीला शक्य नव्हतें.