[१९५] ।। श्री ।। २ जून १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासिः-
स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. खासास्वारी आज छ १७ सवालीं ग्वालेरीहून कुच होऊन पुढें आग-याकडे जावयास दर कुच चालली. पांच चार दिवसां सरदाराची भेट होऊन पुढें नजीबखान व जाहानखान वाढोन आले आहेत त्यांचे पारपत्याची तजवीज होऊन येईल. सर्व गोष्टी ब-या होऊन येतील. तुह्मी आपलेकडील तमाम ठाणेदारांस ताकीद करून, ठाण्यांठाण्यांत दम धरून कायम राहात निकड पडल्यास चांगले त-हेनें जुंझत, ऐसें करणें. केवळ दुरील अवाईनें ठाणी टाकून पळोन जातात ऐसें नसावें. जो ठाणें टाकून अवाईनेंच येईल त्याचे पारपत्य तुह्मीं उत्तम प्रकारें करावें;ह्मणजे दुस-या ठाणेदारांस असे वाटेल की ठाणें टाकून गेल्यानें अबरू राहत नाहीं; तेव्हां ठाणें टाकून निघूं नये, जुंझून मरावें हेंच बरें आहे. अबरूनें दम धरून राहून जुंझतील तेव्हां इकडीलहि कुमक चांगली पोहचून शह वारेल. त्याजपाशीं तोफखान्याचीहि ईबारत नाहीं, ऐसें आहे. तरी याप्रमाणें सारे ठाणेदारांस ताकीद करणें. बंदोबस्त ठीक राखणें, वरिचेवरी वर्तमान सर्व लिहित जाणें. + चमेल ढवलपुराचे खालीं चार पांच कोशीं उतरून सरदारांकडे जाऊं. यमुनेस उतार जाहाल्यास नजीबखान वाढला आहे त्याचें पारपत्य करणें हेंच काम आहे. मुख्यत्वें मोठें पारपत्य जाहालियावरी ठाणींठुणियांचा बंदोबस्त उत्तम प्रकारें होऊन येईल. तूर्त आपल्या जागा मात्र खबरदार राखणें. असेंहि करितां एखादे जागा ठाणियास पेच पडला तर कांहीं चिंता नाहीं. परंतु थोडी फौज पाठवून कामहि नाहीं, येथेंहि नाहीं, असें नसावें. याजकरितां पाठवीत नाहीं. अगरियाचे सुमारें जाणें जाहलें ह्मणजे या दबदबियानें ते सर्व येकत्र होतील, तिकडे राहाणार नाहींत असेंहि वाटतें. वरचेवरी बारीक मोठें वर्तमान बातमीचें सर्व लिहिणें. जाणिजे. छ १७ सवाल. चवथे रोजीं चमेल पार होऊं. सरदारहि मथुरेचे२८१ सुमारें येतील. मग सर्व मिळोन पार यमुना होऊं अगर तुह्यांकडे फौज पाठवणें तरी पाठवूं. तोंपर्यंत ठाणीं काईम राखणें. फौज प्यादे जमाव असून ईटाव्यासारखे ठाण्यांतील कमाविसदार पळतात, अपूर्व आहे! ठाणेदारानें मरावें तेव्हां निघावें नजीबखान फौज थोडी. तोफखाना नाहीं. आह्मी चमेल पार जालिया तेहि माघारे फिरतील. तुह्मांकडे मातबर मामला. तुमची पत असोन आह्मांस ऐवज मिळेना! बंगसाचे२८२ वेळेस बापूजी नाईकानें२८३ पाईं पैजारा चढवून रु।। कर्ज मेळविलें. आतां सर्व अनुकूल असून न मिळे यांत परिच्छिन्न तुह्मांस शब्द लागेल. निकडीचे समयीं तरतूद न होई तर मातबरी काय कामाची ? सत्वर पांच लाख रवाना करणें. सर्व त्यापुढें समजावणें. तूर्त पांच लाख महिनाभरांत. दोहोंत आणखी दाहा लाखांची तरतूद करणें. छ मजकूर. बहुत काय लिहिणें. हे विनंति. सुजादौलाकडील सूत्र बळकट करणें कीं तिकडे न जात. हे विनंति.