[१९६] ।। श्री ।। ४ जून १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः -
पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. खासास्वारी नजीक चमेलकुवार नदीवर आली. येकादे दिवशीं चमेल उतरून पलीकडे जाऊ. लौकरीच सरदाराची भेट होईल. हाफजीरहिमतखान आले आहेत. त्याचाहि जाबसाल होणें तो होत आहे. कांही ठहरून गेले तर जातील. राहिले तरी त्याचे पारपत्याचा विचार उत्तम रीतीनें केला जाईल. सुजाअतदौला यांणीं वजिरीचीं वस्त्रें व पातशहा शाजादियास करावा हें अबदालीनें केलें तें कबूल केलें आहे ऐसें, वस्त्रें घेतलीं त्यांत निघतें. आणि माघारे गेले होते तेहि फिरोन आले, असेंहि आहे. याजवरून त्याचा प्रकार एक प्रकार दिसतो. त्यास, अबदालीजवळून वजिरी घ्यावी, अलीगोहर याची स्थापना करवावी, रोहिले यांचे तलडूं राखावें, हे कांहीं सुजाअतदौलास उचित नाहीं व याचा आमचा घरोबा, सरदारांशी स्नेह, व हे हिंदुस्थानचे पातशा, यांणी त्या पातशाचे हातें स्थापना करून घेणें हे सहसा करणार नाहींत असें वाटते. याप्रें।। संदेह प्राप्त होतात. तरी, याचा मजकूर कसा आहे. तो मनास आणणें. त्याचा त्याचा बनाव न पडे तें करणें. सरदारांनींहि त्यास खोलून लिहिलें असेल. आह्मी व सरदार एक जाहालियावरी याविशीं लिहून पाठऊं. त्यास सर्व प्रकारें सुजाअतदौला यांणी ईकडील लक्षाप्रें।। करणें हें उत्तम. याच डौलावर त्यास राखणें. त्याचे मातुश्रीचें राजकारण तुह्मांसी आहे. तिकडूनहि त्यांस बोध करवणें. वर्तमान लिहिणें. ईटावे येथील ठाणें कायम आहे, झुंजत आहे. आतां ईकडील उपरामुळें रोहिले ठहरूं पावणार नाहींतसे वाटतें. तुह्मी त्यास हिंमत देऊन लिहिणें. ज्यांत दमधरी तें करणें. रामचंद्रभट पुराणिक यास दोन तीन पत्रें पाठविलीं. परंतु त्याचें उत्तर येत नाहीं. त्यास, ते कोठें आहेत, श्रीस गेले न गेले, तें सर्व लिहिणें. + जाणिजे. छ १९ सवाल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.