प्रस्तावना
अबदालीला उजवी स्वतः घालण्याचा विचार करून डावीकडून त्याला शह देण्यास भाऊने गोविंदपंतास हुकूम केला. भाऊनें गोविंदपंताला कामगिरी मोठी महत्त्वाची सांगितली होती. अबदाली, नजीबखान, सुजाउद्दौला शिकंद-यावर गोळा झाले होते. भाऊ दिल्लीवरून यमुनेच्या दक्षिणतीरानें जसजसा उत्तरेस जाऊं लागला तसतसा अबदालीहि यमुनेच्या उत्तर तीरानें कुंजपु-याकडे रोख करून चालला. कुंजपु-यास जाऊन आपले तोंड धरून ठेवावयाचा भाऊचा बेत आहे हें अबदाली समजला. तेव्हां अबदालीच्या उत्तरेकडच्या गतीला प्रतिरोध करावा म्हणून गोविंदपंताला भाऊनें खालील कामगि-या पूर्वीप्रमाणें पुन्हा सांगितल्या. गोविंदपंताने सोरमच्या घाटीं गंगा उतरून रोहिलखंडांत जाण्याची अवाई घालावी; कोळजळेश्वराच्या बाजूनें येऊन अबदालींच्या पाठीमागें पायबंद द्यावा; अंतर्वेद, रोहिलखंड व सुजाउद्दौलाचा प्रांत ह्या प्रदेशांतींल गांवे, खेडीं, शहरें शेतें लुटावीं, जाळवीं व पोळून फस्त करावीं; व तेथील जमीदार व गडकरी ह्यांच्याकडून दंगा करवावा; ह्या इतक्या कामगि-या अवश्य व ताबडतोब गोविंदपंताने कराव्या असा भाऊचा हुकूम होता. सर्वांत अबदालीच्या पाठीमागचा मुलूख वैराण करून, अबदालीला रसद पोहोंचूं देऊं नये अशी भाऊची साग्रह व सोत्कंठ गोविंदपंताला विनवणी होती. किरकोळ गढ्या घेत बसून व्यर्थ काल हरण करूं नये अशीहि सूचना भाऊनें पंताला केलीं. रसद बंद होऊन अंतर्वेदींत अबदालीला फाके पडूं लागले म्हणजे तो तडफडून यमुनेच्या अलीकडे येईल किंवा गोविंदपंताच्या अंगावर उलटून जाईल अशी भाऊची अटकळ होती. भाऊ कुंजपु-याकडे गेल्यामुळें फारकरून तो कुंजपुष्या-याच्या दिशेनेंच कुंच करील असा भाऊचा तर्क होता. तो कुंजपु-याकडे आला तर गोविंदपंतानें त्याच्या पाठोपाठ येऊन मागील व भोंवतालचा मुलूख वैराण करावा व त्याची रसद मारावी अशीं भाऊची इच्छा होती. तो गोविंदपंतावर उलटून धांवून गेला तर सदाशिवराव यमुना उतरून त्याच्या पाठीवर चालून जाण्यास तयार होता. येणेंप्रमाणे अबदालीला दोहींकडून बतंग करून पिसाळवून सोडावयाचा भाऊचा इरादा होता व ह्या कामीं गोविंदपंतानें नेटानें व उत्साहानें मेहनत करावी अशी भाऊची विनवणी होतीं. ह्यावेळीं मोहिमेची सर्व गुरुकिल्ली गोविंदपंताच्या हातांत होतीं. रान उठवून व अडवून शिकार सदाशिवरावाच्या हातांत बिनचूक आणून सोडण्याचें काम गोविंदपंताचें होतें. सारांश, ह्या मोहिमेत जयापजय येणे सर्वथा गोविंदपंताच्या हुशारीवर व चलाखीवर अवलंबून होतें.