[१९४]                                        ।। श्री ।।              ३० मे १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि:-

पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. ठाणें इटावें येथे तुह्मांकडून पदमसिंघ चौधरी राहातो. त्या ठाणियास रोहिल्यांची फौज येऊन वेढा घातला आहे ह्मणोन परस्पर कळलें. ऐशियास, तुह्मीं त्याचें साहित्य करून बंदोबस्त केलाच असेल. खासा स्वारीहि आज छ १४ सवाली२७८ ग्वालेरीस येऊन दाखल जाहाली. येथून दरकुच तिकडे येऊन सर्व गोष्टी उत्तमच होतील. ठाणेदारांस धीर भरंवसा देऊन दमानें राहे तें करणे. पेशजीं तुह्मांस ऐवजाकरितां लिहिलें आहे त्याप्रे॥ काही ऐवजाची तर्तूद जरूर होऊन येई ते करणें. बातमीचे वर्तमान वरचेवरी जलद जलद लेहून डाकेबरोबर पाठवीत जाणें. हाफीजखान, गंगाधरपंत मथुरेस आले. तोहि प्रकार कसकसा होतो तो कळेल. आह्मीहि आग्र्याचे सुमारे जाऊन अबदालीचें पारपत्य करूं. ईटाव्याच्या ठाणेदारास बहुत प्रकारें धीर भरंवसा देऊन ठाणें चांगले त-हेनें कायम राहे ते गोष्ट करणें. य+मुनेचे अंग मोकळे आहे. बेहेडा२७९ थोर आहेत. कुमक पावती करोन ठाणें न जाई तें करणें. ठाणें मजबूत. तुमचा बंदोबस्त. रोहिले दहा हजार फौज आहे, तोफा नाहीं. उगेच आवाईनें ठाणीं पळतात. हें कामाचें नाही. बहुत तरतूद करोन ईटावें राखणें. पंधरा रोजांत सर्व फौजा एक होऊन फडशा होईल. तुमचीं वारंवार बातमीचीं पत्रें आलीं तीं पावलीं. उत्तरेंहि वरचेवर गेलीं आहेत. सुजादौला तूर्त निकाल पाडून गेले. उत्तम. फिरोन अलीकडे गोहर येऊन त्यांकडे न येत, इकडील सूत्र मजबूत राही तें करणें. छ १४ सवाल. बहुत काप लिहिणें. हे विनंति.