प्रस्तावना
दिल्लीच्या तमाम लोकांनीं नजरा केल्या व सर्वत्र खुशहाली झाली. सुजाउद्दौला व नजीबखान ह्यांच्या मनांत अबदालीला पातशहा करावयाचें होते व वजीरी, बक्षीगिरी आपसांत वाटून घ्यावयाची होती (लेखांक २३६). बाबरशहा चकते यानें स्थापिलेल्या तैमुरियाच्या पातशाहीविषयीं ह्या दोघांच्या मनांत यत्किंचितहि भक्ति नव्हती. नजीबखान व सुजाउद्दौला दिल्लीच्या पातशाहीच्या संरक्षणार्थ भांडत नव्हते. मराठ्यांशी लढण्यांत त्यांचा मुख्य हेतु आपापल्या जहागिरी जतन कराव्या व पातशाहींत हवा तसा धांगडधिंगा घालता यावा, हा होता. अबदालीच्या हातांत दिल्ली शहर दहा महिने होतें; परंतु, त्याने दिल्लीच्या तख्तावर चकत्यांच्या कुळांतील कोणी पातशहा मुद्दाम बसविला नाहीं. स्वतःला पातशाही मिळाली तर पहावें ह्या हेतूनें अबदालीने तख्त रिकामें ठेविलें. परंतु, अबदालीचा हा हेतु अलीगोहराला पातशाहा करून सदाशिवरावानें समूळ विध्वंसून टाकिला. सुजाउद्दौल्याची वजिरी मिळविण्याची व नजीबखानाची बक्षीगिरी पटकावण्याची आशाहि सदाशिवरावाच्या ह्या कृत्याने विफल झाली. आगस्टपासून अक्टोबरपर्यंत सुजाउद्दौला मराठ्यांशी सलूख करण्याच्या मिळमिळीत गोष्टी बोलत होता; व अबदालीला सोडून जाण्याचाहि आस्ते आस्ते त्याचा विचार होत चालला होता; परंतु, तो विचार त्यानें आतां सोडून दिला आणि अबदालीची व नजीबखानाची कांस बळकट धरिली. १० अक्टोबर १७६० पासून अबदाली, नजीबखान व सुजाउद्दौला मराठ्यांच्या विरुद्ध एकसूत्रानें चालूं लागले. दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांच्या मनांत विश्वासरावाला बसवावयाचें आहे वगैरे ज्या बाजारगप्पा त्यावेळीं चोहींकडे पसरल्या होत्या त्याहि अलीगोहराला पातशाहा करून सदाशिवरावानें जागच्या जागीं बसवून टाकिल्या. चकत्याच्या कुळांतील कोणी तरी औरस पुरुष दिल्लीच्या तख्तावर बसवावयाचा व त्याची वजिरी आपण स्वतः करावयाची असा भाऊचा ह्यावेळी बेत होता. सातारच्या छत्रपतींची पेशवाई करून पेशव्यांनी महाराष्ट्रांतील सर्व सत्ता जशी आपल्या हातांत घेतली तशीच दिल्लीच्या पातशाहाची वजिरी करून सर्व हिंदुस्थानची सत्ता कायदेशीर रीतीनें, विशेष बोभाट न होतां व लोकांचीं मनें न दुखवितां मिळवावयाची असा सदाशिवरावाचा विचार होता. हा हेतु यवनांच्या ध्यानांत आल्याबरोबर ते आपले पूर्वीचे तंटे विसरले व एकजुटीनें मराठ्यांशी सामना करण्यास सिद्ध झालें.
इकडे सदाशिवरावभाऊनेंहि ज्या ज्या योजना करावयाच्या त्या त्या केल्या. यमुनेच्या दक्षिणतीराला कुंजपु-यास अबदालीचा समदखान म्हणून कोणी सरदार सुमारे वर्षभर पांच सहा हजार सैन्यांसह ठाणें देऊन बसला होता. पश्चिमोत्तरेकडून यमुना उतरून अंतर्वेदींत अबदालीच्या अंगावर जावयाला किंवा त्या बाजूनें अबदालीला बाहेर काढावयाला स्थळ म्हटलें म्हणजे हें कुंजपूरच होतें. हें स्थळ घेऊन सांरगपुरास यमुना उतरून अंतर्वेदींत शिरण्यास मार्ग होता (लेखांक २५८). तेव्हां कुंजपु-याकडे सदाशिवरावाने बळवंतराव मेहेंदळ्यांस व सरदारांस पाठवून दिलें व स्वतः आपण त्यांच्या पाठीमागून त्याच रोखानें चालला.