प्रस्तावना

ग्रांट् डफ् चा इतिहास अपूर्ण व जुनापुराणा होण्याचीं हीं अशीं कारणें आहेत. हीं दाखवून दिलीं नसतीं तरी देखील चालण्यासारिखें होतें. कारण, ग्रांट् डफ् च्या ग्रंथांत चुका आहेत असा संशय आल्याचीं चिन्हें अलीकडील १०|२० वर्षांतील लिहिण्यांत व बोलण्यांत थोडथोडीं दिसूं लागलीं होतीं. परंतु, कोणींहि स्पष्टपणे ग्रांट् डफ् च्या ग्रंथांत अमुक अमुक चुका आहेत असे दाखवून दिलें नव्हतें. ह्या एवढ्याच कारणाकरितां मला हे दोष दाखवून देण्याचे कष्टाळवाणे काम निरुपायानें करावें लागलें आहे. शिवाय, आणीकहि एक आनुषंगिक कारण झालें. तें असें कीं, ग्रांट् डफ् नें आपला इतिहास भौतिकपद्धतीनें लिहिला असल्याकारणानें वाचकांचा मराठ्यांच्या कृत्यासंबंधीं कांहीं एक चमत्कारिक ग्रह होऊन जातो. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला प्रारंभ होण्यापासून तो नाना फडणिसांच्या अखेरीपर्यंत मराठ्यांनीं शेंकडों मोहिमा हिंदुस्थानांतील सर्व प्रांतांतून केल्या. इ. स. १६४६ पासून १७९६ पर्यंत एकहि वर्ष कोठेंनाकोठें तरी मुलूखगिरी केल्याशिवाय मराठ्यांनीं सुनें जाऊं दिलें नाहीं. ग्रांट् डफ् च्या ग्रंथांतील ह्या मुलूखगि-यांची कोरडी जंत्री पाहिली व त्यानें ह्या मुलुखगि-यांची केलेली थट्टा वाचली म्हणजे वाचक क्षणभर स्तब्ध होऊन आपआपल्याशींच विचार करितो कीं, काय हो हा चमत्कार आहे! एक सारिखें दीडशें वर्षें एक वर्षाचीहि खळ पडूं न देतां ह्या सैतानांनीं सर्व हिंदुस्थानभर केवळ हुतुतू कीं हो घातला! शेतें, वाड्या, गांवें, शहरे, जाळून व पोळून प्रांताचे प्रांत ह्या राक्षसांनीं उद्ध्वस्त करून टाकिले! लढाईच्या वेळेस शत्रूला हातघाईस आणण्यास संस्कृत राष्ट्रें हीं असलीं कृत्यें कधीं कधीं किंवा वारंवारहि करितात; परंतु त्यांत त्यांचा कांहीं तरी स्तुत्य हेतु असतो. ह्या मराठ्यांचा मात्र प्रकार काहीं विलक्षणच! हेतु म्हणावा तर लूट मिळविण्याखेरीज दुसरा काहींच नाहीं! ह्या मोहिमेचा पता त्या मोहिमेला नाहीं! कांहीं कारण नसतां, पावसाळा झाल्यावर ह्या दुष्टांनी पुण्याहून जें तडक निघावें तें कांहींनीं श्रीरंगपट्टणावर घाला घालावा, कांहींनीं अमदाबादेवर झांप टाकावी, कांहीनीं अवरंगाबादेला बुचाडावें व कांहींनीं खुद्द दिल्लीच्या पातशाहाच्या मानगुटीस बसावें! एका काळीं ह्या दरोडेखोरांनीं हिंदुस्थानचें सार्वभौमत्व पटकावून बसण्याचा प्रसंग आणिला होता, परंतु, खरोखर देवाचीच करणी! म्हणून हा अघोर प्रसंग हिंदुस्थनाच्या निरुपद्रवी प्रजेवर आला नाही. हे असले विचार कल्पक वाचकांच्या मनांत ग्रांट् डफ् चा इतिहास वाचून येतात, हें मेकॉले, गोपाळराव हरी देशमुख इत्यादींच्या लिहिण्यावरून ध्यानांत येण्यासारिखे आहे. ह्या असल्या विचारांचा पगडा अजूनहि गेला नाहीं, हेंहि सप्रमाण सिद्ध करून दाखवितां येईल. मराठ्यांच्या अमदानींत जिकडे तिकडे दंगेधोपे, लढाया व मुलूखगि-या ह्यांचा सुळसुळाट होऊन शांतता म्हणून माहित नव्हती असें प्रतिपादन केलेलें अद्यापहि अनेक लोकांच्या तोंडून ऐकू येतें. ह्याला कारण ग्रांट् डफ् चा इतिहास व त्याची भौतिक पद्धति हीं होत अज्ञ किंवा नवख्या प्रेक्षकाच्या दृष्टीला भासणा-या मराठ्यांच्या ह्या सैरावैरागतीला कांही व्यवस्थित धोरण होतें किंवा नव्हतें, १६४६ पासून १७९६ पर्यंत ह्या महाराष्ट्रांतील लोकसमूहांत कोणत्या विचाराचें प्राधान्य होतें व परराष्ट्राशीं मराठ्यांच्या ज्या लढाया होत त्यांना कांहीं सयुक्तिक व समाधानकारक कारणें होतीं किंवा नव्हतीं ह्या गोष्टींचा आत्मिकरीत्या ग्रांट् डफ् ने विचार न केल्यामुळें ह्या असल्या मतांचा प्रसार झाला आहे. पद्धति, धोरण, विचार व नीति मराठ्यांच्या कृत्यांत होती किंवा नव्हती ह्याचा ग्रांट् डफ् नें विचार न केल्यामुळें व त्याच्याखेरीज मराठ्यांचा दुसरा इतिहास अद्यापपर्यंत लिहिला गेला नसल्यामुळें ह्या दुराग्रहाचें साम्राज्य सध्यां झालें आहे. परंतु ह्या दुराग्रहांना जागा असण्यास, माझ्या मते, बिलकुल कारण नाहीं. मराठ्यांच्या कृत्यांना कांहीं धोरण होतें हें सप्रमाण दाखवितां येतें; ह्याच प्रश्नाचा विचार पुढील विवेचनांत केला आहे.