[६०]                                                                      ॥ श्री ॥                                                       १३ मार्च १७५७

 

अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्यराजश्री बाळाजी गोविंद गोसावी यांसीः-

सेवक रघुनाथ बाजीराऊ: नमस्कार. सु॥ सबा खमसैन मय्या व अल्लफ. चिरंजीव सगुणाबाई१२८ महायात्रेस गेली आहेत. त्यांचे खर्चाची नेमणूक करून नवद हजार रुपये तुह्मांकडून देविले. त्यास, वरात तुह्मांकडे पाठविली. त्यास रा. गोविंद बल्लाळ देशास गेले. तुह्मीं जाबसाल केलात कीं ऐवज आह्मांकडे नाहीं; याप्रमाणें जाबसाल केले. दोनचारदां तुह्मांकडे पत्र पाठविलीं. परंतु, ऐवज द्यावयास तुह्मांस अनुकूल न पडे. आह्मी सरकारचे चाकर१२९ नाहीं, गोविंदपंताचे चाकर, याप्रमाणें नानाप्रकारच्या गोष्टी सांगितल्या. निदान पंचवीस हजार रुपये दिले. बाकी ऐवज नाहीं ह्मणोन जाबसाल केला, ह्मणोन वर्तमान कळलें. ऐशीयास, तीर्थरूपांनीं नवद हजार रुपयांची वरात तुह्मांवर केली. श्रीमध्यें१३० खर्चास ऐवज देविला असतां तुह्मीं ऐवज न दिला ही गोष्ट उत्तम न केली. सरकारचा ऐवज तुह्मांकडे असतां अशा गोष्टी सांगाव्या हें तुमच्या स्वरूपास उत्तम नव्हे. कदाचित् ऐवज नसला आणि सरकारची वरात झाली तरी तुह्मी मातबर मामलेदार. हर प्रयत्न करून ऐवज द्यावा. त्यास, हे वरात आणीक कोणाची नव्हे ऐसें जाणत असतां फार वाईट गोष्ट केली. बरें, जें केलेंत तें उत्तम केलेंत. हल्लीं हें पत्र लिहिलें असे. तरी पंचवीस हजार रुपये दिले ते वजा करून बाकी पासष्ट हजार रुपये राहिले ते झांशीस यात्रेहून आलीं आहेत त्यांजकडे पत्र पावतांच पावते करणें. यास अंतर केलेंत तरी परिछिन्न खावंदाची अवकृपा तुह्मांवर होईल. ऐसें समजोन ऐवज प्रविष्ट करणें. जाणिजे. छ २२ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें.