प्रस्तावना

विवेचन पहिलें.

कोणत्याहि संस्कृत राष्ट्राच्या चरित्राचा सांगोपांग विचार करावयाचा म्हटला म्हणजे तो अनेक दृष्टींनीं केला पाहिजे. धर्म, नीति, विद्या, समाज, व्यापार, कृषि, कलाकौशल्य, कायदेकानू, राजकारण, व तत्सिद्धयर्थ केलेल्या अत स्थ व बहिःस्थ खटपटी इतक्या सर्वांच्या प्रगतीचा किंवा विगतीचा कालक्रमानें यथास्थित, बांधेसूत, पद्धतवार व सप्रमाण विचार केला जाऊन तो पुनः आत्मिक व भौतिक रीत्या झाला म्हणजे राष्ट्राचें चरित्र समग्र कळलें, असें होतें. येथें आत्मिक व भौतिक हे शब्द कोणत्या अर्थाचे वाचक आहेत तें सांगितलें पाहिजे. धर्म, नीति, विद्या, राजकारण, इत्यादि राष्ट्राच्या चरित्राचीं जीं निरनिराळीं अंगें सांगितलीं त्यांचा विचार दोन त-हेनें करितां येईल. हीं अंगें कार्याच्या रूपाने फलित झालेलीं पाहून त्या फलित रूपांचें पद्धतवार वर्णन करण्याची एक त-हा आहे व हींच अंगें कारणरूपानें असलेलीं पहाणें म्हणजे वर सांगितलेल्या फलित कार्यांचीं कारणें म्हणून त्यांचा विचार करणें म्हणजेच दुस-या त-हेचा अंगीकार करणें होय. पहिल्या त-हेला मी भौतिक म्हणतों व दुसरीला आत्मिक म्हणतों. भौतिक पद्धतीनें कोणत्याहि धर्माचा विचार करावयाचा म्हणजे त्या धर्मांतील निरनिराळ्या पंथांचें जीवनवृत्तांत द्यावयाचें; म्हणजे ते पंथ किती आहेत, त्यांचीं स्थलांतरें कोठें कोठें झालीं, निरनिराळ्या पंथांच्या कलहांचें स्वरूप काय होतें इत्यादि बाह्य रूपांचीं वर्णनें करावयाचीं; आणि आत्मिक पद्धतीनें कोणत्याहि धर्माचा विचार करावयाचा म्हणजे त्या धर्माचीं मूलतत्त्वें काय आहेत, आत्म्याच्या अनेक वृत्तींतून कोणत्या वृत्तीचें त्या धर्मांत प्राधान्य आहे, इत्यादि अंतःस्थ व गूढ प्रश्नांचा ऊहापोह करावयाचा. भौतिक पद्धतीनें कलाकौशल्याचा विचार करावयाचा म्हणजे त्याच्या शाखा किती आहेत, निरनिराळ्या शाखांचा संकर किती झाला व शाखांचीं स्थलांतरें कोठें कोठें झालीं हें सांगावयाचें आणि आत्मिकरीत्या कलाकौशल्याचा विचार करावयाचा म्हणजे आत्म्याच्या कोणत्या वृत्तीपासून कलाकौशल्याचा उगम होतो वगैरे अंतःस्थ व गूढ प्रश्नांचा उलगडा करावयाचा. त्याचप्रमाणें भौतिक पद्धतीनें कोणत्याहि राष्ट्राच्या राजकीय गतिस्थितींचा विचार करावयाचा म्हणजे त्या राष्ट्रांत झालेल्या अंतःस्थ कलहांचीं व बहिःस्थ कलहांचीं वर्णनें द्यावयाचीं; म्हणजे राष्ट्रांतील बंडांची, निरनिराळ्या पक्षांच्या, वर्गांच्या व जातींच्या चढाओढींचीं व परराष्ट्रांशीं झालेल्या लढायांचीं वर्णनें द्यावयाचीं आणि आत्मिक पद्धतीनें राष्ट्राच्या राजकीय गतिस्थितींचा विचार करावयाचा, म्हणजे अंतःस्थ व बहिःस्थ कलहांच्या उत्पत्तीचीं कारणें, त्या राष्ट्रांतील एकंदर लोकसमूहांत आत्म्याच्या उन्नतावनत वृत्तींपैकीं कोणत्या वृत्तीचें विशेष प्राबल्य आहे त्याचा सूक्ष्म विचार, त्या राष्ट्रांतील मोठमोठ्या तटांच्या पुरुषांच्या राजकीय मतांचें सशास्त्र दर्शन इत्यादि प्रश्नांची चर्चा करावयाची. राष्ट्राच्या राजकीय गतिस्थितींचा भौतिक व आत्मिकदृष्ट्या जो विचार त्यासच राष्ट्राचा राजकीय इतिहास म्हणतात. धर्म, नीति, विद्या, समाज, व्यापार, कृषि, कलाकौशल्य ह्यांतील एक किंवा अनेक अंगांचें प्राबल्य किंवा दौर्बल्य होऊन राष्ट्राच्या राजकीय चरित्रावर त्यांचे आघात व परिणाम होऊं लागले म्हणजे त्यांचाहि विचार राष्ट्राच्या राजकीय इतिहासांत करावा लागतो. येणेंप्रमाणें कोणत्याहि राष्ट्राचा सर्वांगांनीं संपूर्ण असा राजकीय इतिहास लिहावयाचा म्हटला म्हणजे तो भौतिक व आत्मिक अशा दोनहि पद्धतींनीं लिहिला पाहिजे. आतां प्रस्तुतच्या विवेचनाचा विषय जो ग्रांट् डफ् चा इतिहास त्याची पद्धत पाहिली तर निव्वळ भौतिक आहे हें सर्वत्र ग्राह्य होण्यासारिखें आहे असें वाटतें. आत्मिकरीत्या मराठ्यांच्या इतिहासाचा विचार करण्याच्या खटपटींत पडण्याची आपली इच्छा नाहीं व योग्य शिक्षण न मिळाल्यामुळें आपल्या अंगीं सामर्थ्य नाहीं असें ग्रांट् डफ् आपल्या इतिहासाच्या प्रस्तावनेंत स्वतःच प्रांजलपणें व विनयानें कबूल करितो.