[५७]                                                                          श्रीगणराज.                                                 ७ मार्च १७५७

 

पे॥छ११९ १८ जमादिलाखर सन सबा. संध्याकाळीं सांडिणी स्वारा ब॥ आलें. सेवेसीं गोपाळ* गोविंद व मल्हारराव१२१ भिकाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. स्वामींनी दस्तुरें पुरवणी लिहिली तेथें आज्ञा जे बिदनुरचें तुह्मी उरकिलें तेंच प्रमाण. परंतु पैक्याची निशा व हुंडया व जातखत देणें तें चौकसीनें निभावें सारिखें करणें ह्मणून आज्ञा. ऐशास जें करणें तें चौकशीनेंच करितों येविषयी अलाहिदा परवणी लिहिली आहे त्यावरून विदित होईल. तूर्त प्रयोजन नसतां लिहितों हें बहुत गुप्त मनन करणें. तुमचे फौजेपैकीं निमे लोक घरास जाऊन आले असतील ते लोक व कांहीं नवे ठेविलें असतील ते व तुर्त राजश्री त्रिंबकराव तुकदेव तुमचें लगामींच आहेत. वरकड तोफखानियास छावणी करणें योग्य. आधीं राजश्री यशवंतराव यांनींच राहावें, अथवा त्यांचे स्थळीं राजश्री केशवरावहि योग्यच आहेत. हुजरात पे॥ राजश्री विसोबा१२२ व हरबा व किरकोळ पागेचे पतके व हुजरात मिळोन पांच हजार तुमचे तेथील फौजे पे॥ अजमासें निमे येकूण बारा तेरा हजार फौज जेथून छावणी करून पट्टणकराजवळून पैका मातबर घ्यावा. तैसाच चिकबालापूर, सिरें, कडपें, वेंकटेश पावेतों स्वारी करावी. तुमची सलाबत बहुत पडली आहे. येक वर्ष मेहनत सांगितल्या प्रो। केली पाहिजे. किती लौकिक वाढला व सरकार कामाचें ओझें उचललें यामुळें आह्मास बहुत आनंद वाटला. आणखी येक वर्ष खासा राहिल्यास बहुत काम होईल. हिंदुस्तानांत चिरंजीव दादानीं दोन छावण्या१२३ केल्या. दत्तबांनीं तीन केल्या. अंताजी माणकेश्वर वगैरे दोन छावण्या करीतच आहेत. परंतु कर्नाटकांत मागें फत्तेसिंग व रघूजी भोसले यांची जाली. गु॥ पर्जन्य अतिवृष्टी जाली. तथापि श्रीकृपेनें निभाऊन सीरटी व कोपल येथील काम सर करतांच चहूंकडे चौका बसला. जे लोक बहुत काहिली करितील त्यास निरोप द्यावा. नवे व जे घरास जाऊन आले असतील व हुजूरचे फौजे पे॥ पांच हजार ताबीजात करून घेऊन येक वर्ष मेहनत करून पूर्तें काम फौजेचे उस्तवारीचें करून सरकारचें कर्ज वारावयास पंचवीस उरवून देशास जावें. येक वर्ष तुह्मास अधिक राहणें पडतें. त्यास खावंदाचे कामासाठीं व आपल्या लौकिकासाठीं प्रवास करणें मर्दासच योग्य आहे. गु॥ आग्रह करून बहुत बुध्दिवाद सांगोन राहविलें. यंदा कांहींसें फळास आलें. आतां राहाच ह्मणून आग्रह करणार नाहीं. हौसेनें राहाल तरी फौजेचें साहित्य उत्तम प्रकारें करून देऊन जर नच बनेल तरी अति होष तुह्मावर नाहीं. यंदा सर्वहि उत्तमच तुह्मी केलें. यंदा तुमचे राहणें न जालिया ईकडे जुनें राखावयास व कांहीं तरी मेळवावयास सात-आठ हजार फौज हरयेकसा बरें. चिरंजीव नाना राहिले तर ते अथवा बलवंतराव याजबरोबर ठेवावे लागतील. परंतु नवे नीट जथत नाहीं. एतद्विषयीं तुमचें विचारें कसें तें लिहोन पाठवणें. तुमचें विचारें होईल तैसें कर्तव्य योजना करूं ह्मणून आज्ञा. ऐशास स्वामीची आज्ञा छावणीस राहावयाची आलिया सेवक लोकांस उजूर कोणे गोष्टीचा? मुख्यत्वेंकरून लोक छावणीस राहिले आहेत. त्यांच्या घरास पैसा प्रविष्ट नाहीं. आणि दुसरी छावणी कबूल करितील न करितील हा भरंवसा वाटत नाहीं. तथापि मध्यें स्वामीची आज्ञाच जरूरीची जाली तरी लोकांस सांगावयाचे रीतीनें सांगोन राहतील ते राहतील. बाकी या प्रांतांत छावणी राहून पुढें कामास उपयोगी पडेसी फौजेची नेमणुक करून दिलिया छावणीस राहणें अगाध काय? जे स्थलीं आपलेंच फौजेनसीं राहावयाची आज्ञा होते ते समयीं लोक राहतील न राहतील हा भरवसा पुरत नाहीं. यास्तव न राहाण्याचा आग्रह करावा लागतो. हल्लीं तों हुजरातची फौज द्यावयाची आज्ञा जाली. याशिवाय आमचे फौजे पे॥ राहतील ते. येणेप्रमाणें स्वामींनीं कृपाळूं होऊन बेजमी केलिया श्रीव्यंकटेशाजवळ छावणीची आज्ञा जाली. तरी राहूं. मुख्य गोष्टी ज्या सेवकाचे स्वरूप स्वामीचे कृपेकरून वाढलें त्यापेक्षां प्रतिदिनीं अधिकोत्तरीं स्वामींनीं वाढवावयाचें. धन्यानीं चित्तांत आणिलें असतां सेवकानें न राहून पुढें काय मेळवावें? सेवकानें धन्याची मर्जी संपादावी यांतच सेवकाचें स्वरूप व जें आपणांस योग्य त्यापेक्षां विशेषोत्कारें सेवा करून दाखवावी. मुख्य गोष्टी तोफखाना व फौज मातबर व चौमासी पोटाची बेजमी करून दिलिया कोणे गोष्टीचा उजूर तिळतुल्य नाहीं. अगर राजश्री नानासच ठेऊन आह्मांसी त्याजवळ राहावयाची आज्ञा जाली तथापि उजूर नाहीं. स्वामीचे जागां राजश्री नाना आहेत. हुजरास चाकरी करितों अगर स्वतंत्र असतां करितों त्यापेक्षां राजश्री नानांजवळ राहून त्यांची कृपा संपादून ते स्वमुखें स्वामीजवळ तारीफ करीत असें करून दाखवूं. सेवेसी विदित होय हे विज्ञापना.

*गोपाळ१२०