[९४] ।। श्री ।। २९ सप्टेंबर १७५७.
पे॥ छ १४ मोहरम गुरुवार सा घटका दिवस प्रातः काळ
विनंति सेवक शामजी गोविंद सा।। नमस्कार विनंति. येथील ता। छ १२ मोहरम बुधवार आवशीची सा घटका रात्र होती. स्वामीचे कृपादृष्टीकरून मोरगांवावर यथास्थित असे. यानंतर मुकाम मजकुरास येतांच विनंतिपत्र शिवाजी दि॥ नारोजी न।। याब॥ पाठविलें आहे. पावलें असेल. अलीकडे सोफीबेग अर्जबेगी नवाब सलाबतजंग येथील नवाबाकडे कांहीं पैगाम घेऊन आले होते. त्यांणीं चार घटका खलबत करून मागती गेले. याचा आजचा मुकाम शहरानजीकचा होता. त्यास त्यांणीं सांगोन पाठविलें कीं वरुडावरून परभारेंच गधेलीवर जाऊन मुकाम करणें. त्यावरून वरुडापासून रव गधेलीकडे फिरविली. चिखलठाण्यापावेतों पोंचली. तेथून मागती मसलत फिरवून मुकाम नारेगांवावर आणिला. सोफीबेग अर्जबेगी याचें यावयाचे कारण मनास आणितां यांणीं मुलाजमतीस उदईक पांचसाशें स्वारांनीं जरोर यावें. बहुत फौज व तोफखाना न आणावा. त्यास हे गोष्ट यांणीं कबूल न केली. मातबर सरंजामानसी येऊन ह्मणोन परिच्छिन्न सांगितलें आणि उदईक मुलाजमत करणार. बहुधा बसालतजंग पेशवा येतीलसें दिसते. व येथून बमाय फौज व तोफखाना समेत कुच करून शहरानजीक जाऊन उतरणार. यांतहि त्याची खिलाक मर्जी दिसते. सेवेसी कळावें. नवाब शहरास पोहोंचले. मसलहतीस येईल तर एखादें पत्र नवाबास थैली पाठवावयाची असिली तर पाठवावी. मजकूर आगतस्वागत आणि सेवकाचे पत्रावर घालून ल्याहावें. तो ऐसा ल्याहावा कीं पत्र दाखवणें पडलें तर कार्यास येई. राजश्री जीवनराव व हकीमम॥अल्लीखान आजी शहरीहून रवाना जाले आहेत. सेवेसी आलेच असतील. छ मजकुरीं लष्करावर टोळधाडी उत्तरेकडून चौके वगैरे पहाडीकडून कोटीशा निखल अभ्राप्रमाणें येऊन पूर्वेकडे गेली. कांही अग्नईकडे गेली. लष्करावर दोन तीन घटका होते. विठोजी सुंदर दिवाण पांचशें स्वारांनसी बाळापुराहून उद्या येणार. सेवेसी विदित होय. हे विनंति.