प्रस्तावना
(ब) ऐतिहासिकलेखसंग्रहांत बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंतचीं एकंदर ३२ पत्रें आहेत. हा संग्रह सबंध छापून झाल्यावर ह्यांत माधवराव बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, रघुनाथ बाजीराव, माधवराव नारायण व अंशतः बाजीराव रघुनाथ इतक्यांच्या कारकीर्दीचा एकदेशीय इतिहास येईल. आजपर्यंत माधवराव बल्लाळाच्या कारकीर्दीतील सुमारें तीनशें पत्रें ऐतिहासिकलेखसंग्रहांत आली आहेत.
(क) भारतवर्षांत आजपर्यंत एकंदर ४९ पत्रें छापिलीं आहेत. पैकीं लेखांक १९, ३९, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९ हीं आठ पत्रें बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीतील आहेत. लेखांक १९ हें पत्र विविधज्ञानविस्तारांत व लेखांक ४० हें पत्र थोरले शाहूच्या चरित्रांत पूर्वीच छापिलेलें आहे. ह्या मासिकपुस्तकांतील पत्रांतून व बखरींतून मोडी वाचनाच्या चुका अतोनात झाल्या आहेत. पत्रांना टीपा दिल्या आहेत त्याहि ऐतिहासिक माहितीला धरून नाहींत.
७. तेव्हां पुढील दहा वीस वर्षांतील इतिहासजिज्ञासूंचें पहिलें काम म्हटलें म्हणजे अस्सल कागदपत्रें शोधून काढून तीं छापण्याचें आहे.
ऐतिहासिक कागदपत्र महाराष्ट्रांत शेंकडो ठिकाणीं आहेत. हिंदुस्थानांतहि पुष्कळ ठिकाणीं आहेत. हिंदुस्थानच्या बाहेर म्हणजे अफगाणिस्थान, इराण इत्यादि देशांत व लिस्बन, पॅरिस, लंडन व आम्स्टर्डाम इत्यादि शहरांत मराठ्यांच्यासंबंधीं कागदपत्र सांपडण्यासारिखे आहेत. ब्रिक्स्, ग्रांट डफ्, म्याकेंझी इत्यादि गृहस्थांनीं विलायतेंत नेलेले कागदपत्र लंडन येथें जाऊन शोधिले पाहिजेत. सध्यां मिरजमळा येथें माधवराव बल्लाळ, नारायणराव बल्लाळ, रघुनाथ बाजीराव व माधवराव नारायण यांच्या कारकीर्दीतील पत्रें उपलब्ध झालीं आहेत. मेणवली येथें माधवराव नारायणाच्या सबंद कारकीर्दीसंबंधीं पत्रें शाबूत आहेत. शिवाजी, संभाजी, राजाराम व बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या कारकीर्दीसंबंधीं अजून कांहींच उपलब्ध झालें नाहीं. मुख्यतः शिवाजी महाराजासंबंधीं पत्रें सांपडलीं पाहिजेत. महाराजांना जाऊन कांहीं फार काळ झाला नाहीं. सव्वा दोनशें वर्षें अद्यापि व्हावयाचीं आहेत. शिवाजी महाराज व त्यांचे सरदार व मुत्सद्दी यांनीं लिहिलेलीं पत्रें लक्षावधि असलीं पाहिजेत. शिवाजी महाराजांचा पसारा केवढा! त्यांचा पराक्रम कसला अकटोविकट आणि त्यांचें धोरण किती लांबवर! तेव्हां त्यांच्या अद्भुत चरित्रपटाच्या लाखों धाग्यांचा यथास्थित उलगडा करण्यास त्यांचा व त्यांच्या मुत्सद्यांचा पत्रव्यवहार सांपडला पाहिजे. पहिल्या बाजीरावासंबंधीं व बाळाजी बाजीरावाच्या १७५० पर्यंतच्या कारकीर्दीसंबंधीं म्हणजे शाहूमहाराजांच्या सबंद कारकीर्दीसंबंधीं देखील अद्याप प्रायः काहींच सांपडलें नाहीं असेंच म्हणणें भाग पडतें. तसेंच, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, रघोजी भोसले, फत्तेसिंग भोसले, गोविंद हरी पटवर्धन, मुरारराव घोरपडे, संभाजी राजे कोल्हापुरकर, दमाजी गायकवाड, दाभाडे, यशवंतराव पवार, यमाजी शिवदेव, गमाजी यमाजी, बाबूजी नाईक बारामतीकर, आंग्रे, अंताजी माणकेश्वर, नारो शंकर, विठ्ठल शिवदेव इत्यादि पुरुषांचे पत्रव्यवहार सांपडल्यावांचून इतिहासाची गुंतागुंत नीट उलगडावयाची नाहीं. माझ्या मतें खालीं दिलेल्या स्थळीं बारीक शोध केला असतां उपयोग होईल.