[३०२] ।। श्री ।। नोव्हेंबर १७६३.
पुरवणी सेवेसि शिरसाष्टांग नमस्कार विनंति. करारेयाजकडील श्रीमंताचें वर्तमान तहकीक तपशिलवार मुजरद काशीदाबरोबर लिहून पाठविणें ह्मणोन आज्ञा. न्यास, येथें राजश्री खंडो शामराज आले तें तों सविस्तर लिहिलेंच होतें. अलीकडील मजकूर तरी राजश्री विश्वासराव व गोविंद शामराज व चिमणाजी वामन यांनीं करारेयांत एके दिवशीं रुबरू विनंति केली कीं, आज दीड दोन महिने होत आले, फौजा येऊन कोणी सामील होत नाहीं, आपले हातचे पत्र कोणास जात नाहीं, यास्तव तरी साहेबीं मेहेरबान होऊन पुण्याच्या जोडया आल्या आहेत त्यांस पत्र एक आपले हातची चिटी द्यावी; व सागरीं कासी नरसी आहेत व गणेश संभाजी आहेत ऐशा तीन चिट्या द्याव्या. शेवटीं एक चिटी मनास येईल त्यास द्यावी. आज्ञा झाली कीं आजपासून चौ दिवशीं सर्व सांगाल त्याप्रमाणें करून देऊं. चिंता न करणें. चवथा दिवस आला ते समयीं प्रातःकाळीं उठोन तयारी करून कोणास न पुसतां शिकारीस गेले, ते नरवरच्या रोखें. पाठीमागे विश्वासराय गेले. तों हे नरवरी दाखल झाले. निमे वाटेहून चिमणाजी वामन नरवरी गेले. विश्वासराय मध्यें मुकाम करून राहिलें. संध्याकाळीं चिमणाजी वामन व खासे एक जागा राहिले. प्रातःकाळीं जाबसाल, करणें तों किल्यावर राजाचे भेटीस गेले. सांगोन पाठविलें कीं तुह्मी करारेयास जाणें. आह्माकडे न येणें. हे माघारे सर्व गेले. गोविंद शामराज डमलेरीस गेले. राजानें हत्ती एक, पांच घोडे नजर केले. सरंजाम दिला. चार दिवस मेजवानी केली. उपरांत पांच सातशें स्वार, बंदुकदार हजारापर्यंत राजानें आपला भाऊ देऊन सिरोंजचे रोखें आले. प्रस्तुत शहाडौरेयास आहेत. तेथून एक गृहस्थ राजश्री बाजी रघुनाथ चितपावन ह्मणून छोटेखानी गृहस्थ होते, त्यास येथें याजकडे पत्र कीं घेऊन येणें. पत्रें यांस आणिलीं ती कारकुनानें लिहिलीं. मोर्तब मात्र होतें. करारेयाहून पत्रें येत तीं पद्धतवार. यांत कांहींच ठिकाणा नाहीं. नकल पाठविली आहे. पावेल. खास दस्तूर तो नाहीं. गृहस्थ शपथ वाहतो अन्यथा नाहीं. पंरतु कागदापत्रांवरून कळत नाहीं. भाषण हिंदुस्थानी. दक्षणी भाषण नाहीं. कागदपत्रीं ठिकाणा नाहीं. याणीं कागद पाहिले. गृहस्थास शब्द लाविला, हें काय घेऊन आला ? शेवटी गृहस्थ जाब घेऊन गेला. तहकीक लागत नाहीं. तेथून गृहस्थ जो येतो खरें ह्मणतो. पत्रावरून कुंठित विचार होतो. लिहीत नाही, भाषण नाहीं. हल्लीं आतांच पत्र आलें. गणेश संभाजी जाऊन दाखल जाहले. भेटी जाल्या. त्यांणीं लिहिलेयांत आहे कीं दोन लाख रुपये श्रीमंतास नरसीगडचे ऐवजीं वगैरे पैकीं तूर्त खर्चास पाठवून देणें. गणेश संभाजीची ताकीद आली आहे. ऐसें वर्तमान झालें आहे. याचें जाणें होईल तेव्हा पहावें. हे विज्ञापना.