[१९]      पै ।। छ १० र।।वल                                     ।। श्री ।।                                                               ५ जानेवारी १७५४

 

श्रीमंत राजश्री            पंतप्रधान
स्वामीचे सेवेसीः-

विनंती सेवक रघुनाथ गणेश चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार कृतानेक विज्ञापना. स्वामीचे कृपादृष्टीनें सेवकाचें वर्तमान त॥ छ ४ माहे रबिलावल पावेतों मे॥ काळाचौतरा समीप शहर औरंगाबाद येथें यथास्थित असे. येथील वर्तमान तागायत छ २३ सफर हुजूर विनंतिपत्रीं लेहून पाठविलें आहे त्यावरून विदित जालें असेल. नवाब सलाबतजंगांहीं त्वरेनें बाहेर निघावें हा मुसाबुसी यांचा विचार. याजकरितां नवाबानें छ २७ सफरीं वेदमूर्ती राजश्री सखंभट जोशी व उमापती जोशी वगैरा जोशी ऐसे पुणतांबेकर चारपांच जोशी मेळऊन मुहूर्त पाहिला. जोशांनीं छ १९ र॥वल व छ २५ र॥वल ऐसे दोन मुहूर्त सांगितले. हे मुहूर्त लांब. यास्तव शहानवाजखान वगैरे मोगलिये यांहीं छ ३० सफर करार केला. छ ३० सफरीं डेरेबाहेर होतात ह्मणोन आवई गरम होती. निदान ते दिवशीं बाहेर निघाले नाहीं. मुख्य गोष्ट द्रव्य नाहीं. याजकरितां बाहेर निघणें होत नाहीं. फीलखाना व अस्तबालास व उंटास दाणा नाहीं. फाके गुजरतात. सफसीलानखानास हैदराबादचा मामला सांगितला. सालाख रुपये तूर्त घ्यावयास करार केला; पे॥ तीन लाखाच्या कबजा व तीन लाख रुपये रोख. त्याचा सरंजाम अद्याप नाहीं. कालिकादास, नवाबाचा मोधी, त्याचे देणें पांचसालाख रुपये नवाबाकडे आहे. द्यावयास ऐवज नाहीं. यास्तव कालिकादासास सफसीलान खानाची पेशकारी सांगितली. इतकेयानेंच तूर्त त्याची समजावीस केली. लष्करास तूर्त दुमाहा तलब देणें. नवाबाचा खास खर्च दरमहा लाख सवालाख. रुपयेयास जागा नाहीं. याजकरितां बाहेर निघत नाहीं. पुढें काय मनसबा करितील तो पाहावा. नवाब सलाबतजंगाच्या चित्तांत बाहेर निघावयाचें नाहीं. मुसाबुसी नवाबास बाहेर काढणार. मीरमहंमदहुसेनखान यांचा पेशकार ब्रीजलाल व त्याचा भाऊ गुलाबराय उभयतांस छ १ र॥वलीं शहानवाजखानांहीं कैद करून मुसाबुसी यांजकडे पाठविलें. पेशकार मजकुरानें हैदराबादेस पैका बहुत मेळविला आहे. याजकरितां त्याजजवळ पैका मागत आहेत. सेवेसी विदित जालें पाहिजे. सुरतेकडून फरासिसाचा सामान पांच सात हजार बंदुका व चाळीस पन्नास तोफा व गरनाळा ऐसा सरंजाम येत आहे. सुरतेहून सामान निघाला ह्मणोन छ २ र॥वलीं मुसाबुसीकडें पत्रें आलीं. त्याजवरून खुशबाली केली. दाहावीस तोफा मारिल्या. सेवेसी विदित व्हावयाकरितां विनंति लिहिली आहे. हे विज्ञापना.