[२८८] ॥ श्री ॥ २७ जून १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री जनार्दनपंत स्वामीचे सेवेसि:
पोष्य ३३०बाळाजी गोविंद व गंगाधर गोविंद सा।। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता॥ जेष्ठ व॥ ८ पर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष . या प्रांतीचेे वर्तमान सविस्तर आपणास एक दोन पत्रीं लिहिलें, त्याजवरून कळलेंच असेल. आह्मी अंतरवेदींत आल्यानंतर सर्व ठाणीं सरकारचीं कायम झालीं. मंगळपुरास अहमदखान बंगस याजकडील फौज होती, तेथें थोडें बहुत झूंज जाहलें. तसेंच फफुंदेस रोहिले इटावे सकुराबादचे फफुंद तालगाव मिळोन अमलदार जमा होऊन हजार बाराशें राऊत, दोन हजार प्यादे एक जागा जमा जाहले होते. आठ दहा रोज झुंजले. शेवटीं निघोन गेले. इटावे, सकुराबादसुद्धा ठाणीं त्यांनी खालीं करून दिलीं. वरकड रार्व ठाणीं सलुखानेंच खालीं जाहलीं. एक गाजीपुरी रूपराय खीचर व कीरतसिंग राहिले. त्याणीं तेथें मातबर सरंजाम करून किल्ल्यांत बसले आहेत, यामुळें तिकडील महालीं अमळ सुरळीत चालत नाहीं. कृष्णाजी रायाजी, काशी गंगाधर, गंगाधर बापूजी वगैरे सर्व गाजीपूरचे शहावर सातशें राऊत, तीन अडीच हजारपर्यंत प्यादा जमा करून आहेत. ठाणीं मात्र बसलीं आहेत. परंतु खीचराचे दहशतीमुळें जमीदार भेटत नाहीं अमल चालत नाहीं. गल्ला तो राहिला नाहीं. माल खाऊन जमीदार बसले, त्याचें काय करावें ? फफुंदेस कुसळसिंग हमनाथ व पंचमसिंग चोबे वगैरे पहिल्याप्रमाणें जमीदारा जाहला. बलोरुरु आदिकरून गढ्या पूर्ववत् जाहल्या. फुफुंद कसब्यांत मात्र ठाणें बसलें आहे. तसेंच इटावयाचे चौधरी गढीबंद जाहले. माल सर्व भक्षिला. पैसा घेऊन कांही रोहिल्यां दिला. कांही आपण घेतला. एवंच रयतेकडे कांहीं राहिलें नाहीं. गढीबंद होऊन बसले आहेत. कांही दबाव करावा तर कामेथीस पळून जाणार. रोहिल्यांच्या फौजा गंगातीरानें आहेत. यामुळें आह्मांस येथून कोठें गाजीपुराकडे अगर गढीस लागायास फौज पाठवितां नये. सागराकडेहि मोठा दंगा जाहला होता. हटे, सागर, जटाशंकर, जयसिंगनगर, खेमलासे, येरणे, दुरई इतकीं मात्र ठाणीं राहिलीं. वरकड सर्व जागा गेली. राजे पिर्थीसिंग गढाकोटावाले देखील फिरले. सागर खालीं करून मागों लागले. झुंजहि जाहले. तेथें अपाजी विश्वनाथ सागरचे लिहिणार कामास आले. किल्ल्याबाहेर माणूस निघतां नये. हटयास मोर्चे लागले. एक महिना किल्ला जुजला. शेवटीं त्याणीं तळें फोडलें. एक दोन रोजीं हटे, जटाशंकर किल्ले जावे असा प्रकार जाहला. तेव्हां राजभी विसाजी गोविंद याणीं राजश्री जानोजी भोसले यांजकडे कारकून पाठवून त्यांस आणिलें. दहा हजार फौज जानोजीबावाच आले. हटयाचे मोरच्यांवर जूजहि त्यांसी व बुंदेल्याचे लोक व डांगी, गोंड तमाम दहा हजार जमा जाहले होते. पांच सातशें माणूस कापून काढिलें, तेव्हां मोरचे सोडून निघोन गेले. जागा सर्व लुटून जाळून फडशा केली. बुंदेल्यांशीहि सलूख तूर्त केला. तेजगड वगैरे ठाणीं लोध्यांकडे राहिलीं आहेत, तीं तूर्त येतां दिसत नाहींत. परंतु ते या बंडांतून निघोन दगा करतील यास्तव तूर्त सलूख करून घेऊन मग राजश्री जानोजीबावांची रवानगी करतील. तेहि नागपुराकडे जाणार. हिंदुस्थानांत कोणीहि राहत नाहीं. रोहिल्याची फौज फिरोन आली. सकुराबादेचें ठाणें उठवून दिलें. तें देवलीस आलें. फिरोन दंगा जाहला. उपरालांतील मात्र नाहीं. चोहीकडे दंगा याउपरि भार ईश्वरावर आहे. राजश्री गंगाधरपंततात्या जाटापाशीं आहेत. गाजदीखानास वजिरी जाटानें देविली. तेहि बरोबरच आहेत. तात्याबरोबर फौज ह्मणावी तरे हजार दीड हजार आहेत. राजश्री गणेश संभाजी बुंदेलखंडांत आहेत. त्यांचा एक राऊत आह्मांकडे येत नाहीं. आह्मीं तूर्त अहमदखानाशीं सलुख केला आहे, परंतु त्याचा विश्वास नाहीं. जाटानें आग-यास मोर्चे लाविले, परंतु किल्ला मजबूद; श्रम त्याचे सार्थक होतां दिसत नाहीं. पन्नास हजार पाऊण लक्षपर्यंत प्यादे मोर्चास आहेत. शहर घेतलें. मोर्चे बसले आहेत. हे विनंति.