[२६४]                                      ॥ श्री ॥       ४ नोव्हेंबर १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसः

पोष्य सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. येथील खर्चाचे ओढीकरितां ऐवजाविशीं तुह्मांस वारंवार फारच लिहीत गेलों. परंतु ह्या गोष्टी तुमच्या चित्तात किमपि न येतां चालढकलीवरी हा कालपर्यंत नेलें. धातुपोषणार्थ मात्र लिहितां कीं मजला ऐवजाचे तर्तुदीशिवाय दुसरा अर्थ नाहीं, तर्तूद केली, करतों, एका दो दिवशी रवानगीहि करितों, येतों, कार्यावरी आज्ञेप्रमाणें जातों. ऐशा गोष्टी रिकाम्या लिहितां. मात्र निदर्शनास यांतील एकहि येत नाहीं. यामुळें तुमच्या कर्तृत्वाची तारीफ वाटते ! ते कोठपर्यंत लिहावी ? लिहितां लिहितां भागलों ! हें तुमच्या कर्तृत्वास उत्तम नाहीं. याउपरि पत्र पावतांच रसदेचा व बाकीचा ऐवज मातबर भरणा करूनं अविलंबे रवाना करणें. दिरंग एकंदर न लावणे. कदाचित् अबदाली यमुनेच्या दक्षिणतीरीं आल्यामुळें मार्ग सुद्धां नाहीं, ऐवज कसा रवाना करावा, हें निमित्य ठेवाल. आणि हा तपशील लिहावा तरी असें न करणें. अबदालीची आमची गांठ पाणीपताजवळ पडली आहे. तोफखान्याचा आराबा रचून लढाई करावयास तयारी केली आहे. त्याच्यानें इकडे तिकडे जावत नाहीं व कांहीं करवत नाही. पावणेदोन कोस दीड कोसाची तफावत आहे. पेंढारी व लुगारे राऊत वगैरे नित्य उंटें, घोडीं, तट्टें, बैल अघाडी पिछाडीवरी जाऊन गोटापासून घेऊन येतात. त्याचे कोणी पाठीवरहि निघत नाहीं. याप्रमाणें आहे. तुह्मीं या गोष्टी भयाच्या कोण्हेविशीं चित्तांत न आणितां सत्वर ऐवज दिल्लीस रवाना करणें. तेथें आलियावरी आह्मी हरतर्तुदेनें घेऊन येऊं. विलंब न लावणें. जलद जलद ऐवज दिल्लीस येऊन पोहोंचे तें करणें. तुह्मींहि पत्र पावतांच अंतरवेदींतून पटपटगंजावरी यांच्या पछाडीस येऊन पोहोंचणें. सावकास याल तरी ठीक नाहीं. लांब लांब मजलीनें येणें. रसद त्याजकडे जावयाची आढळेल ते लुटणें, दबाव पाडणें, ह्मणजे चहूंकडून घाबरा होईल. हेहि युक्त तुह्मांस बहुत वेळ लिहिली. परंतु तुह्मी येत नाहीं. सारीच डोळेझाक करितां. परंतु असा समय चाकरी करून दाखवावयाचा पुढें कदापि येणें नाहीं. या हंगामीं जो आपले शक्तीपेक्षां चाकरी आधीक करून दाखवील त्याचें रूप आहे. हें दूरंदेशी ध्यानांत आणून सर्व गोष्टी लिहिल्याप्रमाणें करणें. ऐवज पाठवणें. तुह्मीं येणें. लहान सहान गढ्यामुळें गुंतोन मोठ्या कामाच्या उपयोगांतून जाल असें करून न घेणें. + तुह्मीं दरमजल बागपतचे सुमारें अंतरवेदींतून येऊन रसद मारणें. नजीबखानाचा मुलूक जाऊन लुटून फस्त करणें. ऐवज रसदेचा पांच सातशें राऊत देऊन आगरियावरून जलदीनें दिल्लीस येऊन पोहोंचेसा करणें. जाटाच्यानें अटकाव होत नाहीं. वेडेंवाकडें तो करणार नाहीं. मातबर एकदाच यावा. त्यांत दोन तीन लाख एकेकदां उंटें चांगले राऊत देऊन रवाना करावे. दिल्लीस पावलियावर जसें दिसेल तसें पुढें आणून घेऊं. दोन चार हजार चांगली निवडक फौज लांब लांब मजली करून लिहिलेप्रमाणें रोहिलियांच्या मुलुकांत दंगा व रसद बंद करणें. कांहींच न झालें तरी परिछिन्न तुह्मांवर शब्द येइल. वारंवार लिहिलियाची, आपले अबरूची इरे धरून काम बजावून आणणें. या दिवसांत तुह्मी येऊन लिहिलेप्रमाणें पावलां असतां तर किती काम होतें ! अजून तरी करून दाखवणें. गंगापार जमीदारांकडून दंगा करवणें. गोपाळराव गणेश फौजसुद्धां गंगापार उतरून जमीदार सामील करून सुजादौला रोहिले यांचा अंमल उठवावा. याप्रमाणें करणें. मसलत मोठी. या दिवसांत ज्यास जें लिहावें त्याप्रमाणें होऊन न येई मग तुह्मी आमचे कामाचे काय ? याउपरि आज्ञेची व चाकरी करून दाखवावयाची सीमा झाली ! लिहिलेप्रमाणें सत्वर करणें. रवाना छ २५ र।।बिलावल. बहुत काय लिहिणें. हे विनंति.