[२२७]                                      ।। श्री ।।            १२ आगष्ट १७६०.

पु॥ राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यास:

विनंति उपरि पत्रें पाठविलीं तीं पावली.
बंगालियाचा सुभा मिरजाफरखान व राजे रामनारायण पटण्याचे सुभेदारीचे नायब यांजकडे पत्रें बातमीस हमेश जात असतात. अलीकडे त्यांचीं उत्तरें पारसी आलीं. त्यांत सविस्तर बंगालियाचें वर्तमान लिहिलें आहे. तीं पत्रें सेवेसी पाठविलीं आहेत. त्यावरून सविस्तर कळेल. व या दोघांस पत्रें पाठवावीं जे तुमचे येखलासीचें वर्तमान गोविंदपंतांनीं लिहिलें, त्यावरून कळलें त्यास तुह्मी आपली खातरजमा राखणें. कोणे गोष्टीचा वसवसा न धरणें. ऐसीं पत्रें यावीं ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशियास मिरजाफरखान व मीरनचा पुत्र मेल्याची खबर आली आहे. पुढें रामनारायण तेथें सर्वाध्यक्ष जाहले असेत, ह्मणून खबर आहे. त्यास पुरती खबर आलियावरी पत्र पाठविणें तें पाठवूं.

नवाब सुज्यातदौले यांणीं आह्मांस पत्र पाठविलें आहे व स्वामीसहि पाठविलें आहे. तीं पत्रें रवाना केलीं आहेत, त्यावरून सर्व कळेल. त्याचा भावार्थ हाच कीं आपण अबदालीकडे आलों ह्मणून कांहीं श्रीमंतांनीं वसवसा धरूं नये. सर्व प्रकारें त्यांचें कार्य होय तेंच करीन. ऐसा त्यांचा आशय ह्मणून लिहिले ते कळलें. ऐशान, दिल्लीस खासा स्वारी आली. दिल्ली घेतली. सर्व बंदोबस्त सरकारचा जाहला. सुज्याअतदौला व नजीबखानहि पार आले, हा जाबसाल त्याचाहि आहे. होईल तो करूं शिकंदरियावरी गिलज्याहि आहे. कळावें. तुह्मीं तिकडील बंदोबस्त करून कधीं येणार तें लिहिणें. बाकीचे ऐवजीं दहा लाख व रसदचे ऐंवजी पंधरा लक्ष एकूण पंचवीस लक्ष रुपये सत्वर पोहोचावणें. जाणिजे.

अलीगोहर शाहाजादे याजकडे शिऊभट आहेत. त्यांजलाहि पत्रें पाठविलीं आहेत. शाहाजादे फार फजित जाहले. ते अबदालीकडे व सुज्यातदौले यांजकडे येत नाहींत. त्याजकडे कासीद पाठविले आहेत. स्वामीकडे यावयाविशीं त्यास व शिवभटास लिहिलें आहे. उत्तरें आलियावर सर्व लिहून पाठवितों ह्मणून लिहिले तें कळलें. ऐशियास, तिकडील उत्तरें काय येतील तीं लिहून पाठविणें. त्यासारखें लिहिलें जाईल.

मजवरी स्वामींनीं किरकोळ वराता न कराव्या. ऐवज नाहीं. मुलखांत बखेडा जाहला आहे. बंदोबस्त करून मीच सेवेसी हिशेब घेऊन येतों, ह्मणजे ऐवज आहे नाहीं कळेल. तेथें आल्यावर जे आज्ञा होईल त्याप्रमाणें वर्तणूक करीन. येथील बंदोबस्त आटोपून लौकरच येतों, ह्मणून लिहिलें तें कळलें. ऐशास, सरकारांत मसलतीमुळें बाहेरील शत्रुचा पेंच. या दिवसांत सर्वापेक्षां तुमचा भरंवसा, आणि न मिळे ऐवज तेथून पैदाहि कराल. असें असतां तुह्मी याप्रमाणें हिशेब दाखविता. अपूर्व आहे ! सरकारचें काम होऊन येईल. परंतु तुमचे कदीमीस व निष्ठेस एकप्रकारें दिसेल. तपशील सहसा न लावितां दहा पंधरा लाख रुपये, व रसदेची तरतूद जरूर करणें. दूरं देश. मर्जीणारे? तुह्मी आहे. आळस न करावा. 

चार कलमें लिहिल्याप्रमाणें करणें. जाणिजे. ३० जिल्हेज. हे विनंति..