[२११]                                        पे॥छ २० जिलकाद।। श्री ।।             २७ जून १७६०.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यांसिः-

पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. येथें ऐवजाची निकड फार आहे ह्मणोन तुह्मांस वारंवार लिहीत असतां कांहीं तरतूद करून ऐवज रवाना केला आहे ह्मणोन तुह्मीं लिहितां. त्यास, पन्नास हजार रुपये रवाना केले आहेत ह्मणोन बातमी कळली. ऐशास, तुह्मी मातबर मामलेदार. जे समयीं असा पैका आणवूं तसा तुह्मांकडून यावा. दिरंग लागो नये. ऐसें असोन तुह्मीच दिरंगावरी घालों लागल्याम दुस-या मामलेदारांस काय शब्द लावावा? तुह्मीं याप्रें।। करूं नये. तुह्मांकडून चवदापंधरा लाख ऐवज यावा. त्यापैकीं तुर्त पांचसात पाठवणें ह्मणोन लिहिलें असतां अद्याप ऐवज येत नाहीं हें अपूर्व आहे! याउपरि दिरंग न लावितां सदर्हू ऐवजाची तरतूद करून ऐवज सत्वर रवाना करणें. येथील वोढीमुळें परिछिन्न विलंबावरी न घालणें. आतां वाटेचेंहि ठीक आहे. तर ऐवज जलदीनें पाठवणे. जाणिजे. छ १३ जिलकाद, सु।। इहिये सितैन मया व अलफ. + बहुत काय लिहिणें. भदावरचे वाटनें अगर ग्वालेरवरून सत्वर चांगला ऐंवज यावा. लाख पन्नासानें होणें काय? हे विनंति. जो जमा होईल तो वरचेवर पाठवणें. त्या (विलंब) लागल्या चाकरीस फार शब्द लागेल. हे विनंति. एकादो महिन्यांत रसदेचाहि भरणा इकडेच२९२ करणें. हे विनंति.