प्रस्तावना

ह्या अवधींत अबदालीशी दोन बरीच मोठीं युद्धें झाली परंतु ह्या दोन्ही युद्धांत स्वत: अबदाली लढाईला मुळींच आला नाहीं व त्याची बदनक्षी जी व्हावयाला पाहिजे होती तीहि झाली नाही मराठ्यांना ह्या दोन्ही युद्धांत जय मिळाला हें निर्विवाद आहे; परंतु त्या जयापासून अबदालीचें फारसे नुकसान न होतां मराठ्यांचाहि मोठासा नफा झाला असें नाहीं. मराठ्यांची जी १५ नोव्हेंबरला स्थिती होती तीच किंवा त्याहून अधिक निकृष्ठ अशी दशा ७ डिसेंबराच्या पुढें झाली. ह्या वेळीं दुस-या मार्गाचा अवलंब, म्हणजे अबदालीची फळी फोडून दिल्लीकडे जावयाचा प्रयत्न, भाऊनें करणें जरूर होतें व कित्येक सरदारांनीं ही सूचना केली देखील होती. ती अमलांत आणण्याचें सामर्थ्य भाऊच्या अंर्गी नव्हतें असें नाही. भाऊ जर सडा असता व कबिल्या बुणग्यांनी त्याच्या हालचाली जखडल्या नसत्या तर अबदालीची फळी फोडून न जाणें अशक्य नव्हतें. बुणग्यांचें लटांबर टाकून निघून जाणें शोभण्यासारखें नव्हतें हें कबूल आहे; परंतु, एकंदर सारासार विचार करितां बुणग्यांना सोडून किंवा त्यांना पानिपतच्या गढींत ठेऊन देशावर येणारी आत्यंतिक हानि टाळण्याकरितां, सदाशिवरावानें जर अबदालीची फळी फोडून दिल्लीकडे कुच केलें असतें, तर त्याला कोणी त्यावेळीं किंवा पुढें मागें दोष देतें असें वाटत नाहीं. जसजसे जास्त दिवस लोटूं लागले तसतशी अबदालीची फळी फोडून जाण्याची भाऊची हिंमत कमी होत चालली व दाणागल्ल्यांच्या टंचाईमुळें मराठ्यांचें शरीरसामर्थ्यहि खालावत चाललें अन्नापाण्यावांचून उपाशीं मरण्यापेक्षां व शत्रूच्या पुढें मृत्यूची स्वस्थ वाट बघत बसण्यापेक्षां फळी फोडून निघून जाणें सर्वस्वीं रास्त होतें. परंतु, तें त्या वेळीं साध्य होतें किंवा नाहीं हे कळण्यास कोठें आधार नाहीं भाऊने कबिले बुणगे बरोबर घेतले ही कदाचित चूक केली असें नारो शंकरानें ध्वनित केलें आहे (लेखाक २४३) व त्यासंबंधानें “ निदान ” हा शब्द उपयोजिला आहे. आतां भाऊला स्वतःला कबिल्या बुणग्यांची अडचण वाटत होती किंवा नव्हती हें निश्चयात्मक सांगतां येण्यास कांहीच आधार नाहीं. इतकें मात्र खास विधान करितां येतें कीं २३ डिसेंबरपर्यंत भाऊची हिंमत काडीमात्रहि खचली नव्हती. गोविंदपंत वारल्यावर समाधानार्थ बाळाजी गोविंदाला भाऊनें जें २३ डिसेंबरीं पत्र पाठविलें त्यांत “आम्ही आहों, सर्व नीट करूं” ह्या धीराच्या व आश्वासनाच्या शब्दावरून अबदालीचें भय सदाशिवरावाला विशेष वाटत होतें असें दिसत नाहीं (लेखांक २७२).